Sonali Phogat : म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हणजुणा पंचायतीच्या उपसरपंचा ऍग्नेस डिसोझा रा. पेढे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.
अर्जदार ऍग्नेस मागील 3 सुनावणींसाठी कोर्टासमोर हजर न राहिल्याने न्यायालयाने कार्यवाही बंद केली आहे. सोनाली फोगट हत्या प्रकरणात त्यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
हरियाणाच्या भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणी हणजुण येथील कर्लीस क्लब वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याच क्लबमध्ये फोगट यांना अंमली पदार्थ जबरदस्तीने पाजण्यात आले होते. याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले.
दरम्यान याच कर्लीस क्लबमध्ये ऍग्नेस डिसोझा गेल्या 12 वर्षांपासून क्लबच्या स्वयंपाकघरात काम करत होत्या. त्यांना या प्रकरणात सीबीआयकडून अटक होण्याची भिती वाटत होती. याच कारणाने त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
या प्रकरणी जामीन अर्जावर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात 3 वेळा सुनावणी घेण्यात आली. मात्र, या सुनावणीवेळी अर्जदार ऍग्नेस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने या अर्जावरील कार्यवाही बंद केली आहे.
गेल्या पंचायत निवडणुकीत ऍग्नेस डिसोझा उपसरपंचपदावर निवडून आल्यानंतर त्यांनी कर्लीस क्लबमधील काम सोडले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.