Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: लोबोंनी आरोलकरांना डिवचले!

Khari Kujbuj Political Satire: पोलिस निरीक्षक ते उपअधीक्षक यांच्या देखत पूर्ण टिंटेड कारमधून दबंग स्टाईलने पंचायतीत एन्ट्री घेणारे अर्जुन साळगावकर हे एकमेव पंच नव्हते. आणखीनही एक दोन आजी माजी सरपंच टिंटेड कारमधून सोमवारी पंचायतीत दाखल झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

लोबोंनी आरोलकरांना डिवचले!

आमदार मायकल लोबो यांनी आपण मांद्रेतून विधानसभेची निवडणूक लढणार असे सांगितले. कदाचित लोबो यांना आपल्या मुलाला राजकारणात स्पेस निर्माण करण्यासाठी २०२७ मध्ये शिवोली किंवा कळंगुटमधून निवडणूक रिंगणात उतरवावे असे वाटत असावे. दोन्ही मतदारसंघापैकी एका ठिकाणाहून मुलाला उतरविल्यास स्वतःसाठी मतदारसंघाचा शोध त्यांना घ्यावा असे वाटत असावे. एका बाजूला मांद्रे मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार जीत आरोलकर आहेत आणि ते मगोपचे आहेत. याशिवाय मांद्रे मतदारसंघाला इतिहास आहे, या मतदारसंघातून निवडून आलेला आमदार त्या पक्षाची सत्ता राज्यात असल्यास मुख्यमंत्र्यांपर्यंत मजल मारू शकतो. त्यामुळेच कदाचित तडजोड करून भविष्यात मांद्रे मतदारसंघ झोळीत पाडून घेण्याचा त्यांचा डाव असावा असे वाटते. परंतु सोमवारी म्हणे आरोलकरांना विकासकामे करण्यासाठी जागे केल्याचे लोबो यांचे म्हणणे म्हणजे त्यांना डिवचल्यासारखे आहे. अजून तरी आरोलकरांचे त्यावर उत्तर आले नाही, कदाचित रात्री उशिरा किंवा मंगळवारी आरोलकर लोबोंना प्रत्युत्तर देतील असे दिसते. ∙∙∙

धारगळमध्ये लोक उपाशी आणि पंच तुपाशी!

पोलिस निरीक्षक ते उपअधीक्षक यांच्या देखत पूर्ण टिंटेड कारमधून दबंग स्टाईलने पंचायतीत एन्ट्री घेणारे अर्जुन साळगावकर हे एकमेव पंच नव्हते. आणखीनही एक दोन आजी माजी सरपंच टिंटेड कारमधून सोमवारी पंचायतीत दाखल झाले. धारगळच्या पंच सदस्यांची बातच न्यारी. त्यांचा रुबाब, त्यांच्या महागड्या गाड्या या आमदार मंत्र्यांनाही लाजविणाऱ्या. एवढी माया या पंचांकडे आली कुठून हा प्रश्न पडणे साहजिक असतानाच एका गोष्टीची जोरदार चर्चा सोमवारी पंचायतीकडे जमलेल्या लोकांमध्ये सुरू होती. ज्या जागेत धारगळमध्ये सनबर्न करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ती जमीन स्वच्छ करून त्या ठिकाणी कुंपण घालण्याचे काम म्हणे सनबर्न समर्थक धारगळ पंचायतीच्या एका पंचाला मिळाले आहे. हे कंत्राट एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता ही अशी जोड असेल तर दबंगगिरी करण्यास पंचांना पोलिस तरी कसे अडवू शकतात. धारगळची जनता उपाशी आणि पंच तुपाशी अशीच ही स्थिती नाही का? ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा टोमणा

महिलांवर लगेच लोक विश्वास ठेवतात आणि महिला विश्वासाचे सार्थक देखील करतात. म्हणूनच तर आज कर्ज घेतल्यावर बँक रिकव्हरीमध्ये महिलांची टक्केवारी ८० टक्के आहे. आता काही महिलांवर विश्वास ठेवून त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहे तो भाग वेगळा, असा टोमणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लगावला आहे. त्यामुळे महिलांच्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी महिलांनाच सुनावले अशी चर्चा राज्यात सुरू आहे. ∙∙∙

पेडणे पोलिसांची फसवेगिरी उघड!

धारगळ पंचायतीच्या सोमवारी झालेल्या खास बैठकीत पोलिसांसमोर पूर्ण टिंटेड कारमधून पंच अर्जुन कांदोळकर यांनी दबंग स्टाईलमध्ये पंचायतीत एन्ट्री घेतली. धक्कादायक बाब म्हणजे गोवा पोलिस सर्वसामान्यांना टिंटेड कारसाठी चलन ठोकतात आणि तिथल्या तिथे ते काढतात. मात्र, अर्जुन कांदोळकर टिंटेड कारमधून पंचायतीत एन्ट्री घेतेवेळी तिथे पीएसआय, पीआय ते उपअधीक्षक सर्वजण हजर असताना कोणीच कांदोळकरांना चलन देण्याचे धाडस केले नाही. मात्र, दै. ‘गोमन्तक टीव्ही’च्या कॅमेऱ्यात ही बाब कैद होणे चुकले नाही. ‘गोमन्तक टीव्ही’ने व्हिडिओ ब्रेकींगच्या माध्यमातून ही बाब उघड केली आणि पोलिसांचे पितळ उघडे पडले. आश्चर्याची बाब म्हणजे पेडणे पोलिसांनी सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेमुळे शेवटी संध्याकाळपर्यंत चलन काढले. मात्र, त्यात चालक म्हणून भलत्याचेच नाव घुसवले. या प्रकारामुळे पेडणे पोलिसांचा फसवेगिरीचा कारभार आणखीन एक्स्पोज झाला एवढे मात्र खरे. ∙∙∙

सनबर्न दारी, तोचि दिवाळी अन् दसरा!

सनबर्नच्या आयोजनावरून सध्या राज्यात रणकंदन पेटले आहे. यात सोमवारी धारगळ पंचायतीने सनबर्न आयोजनाला मान्यता दिली. मात्र, ही परवानगी वगैरे दिखावा असे विरोध करणारे पेडणेवासीय म्हणताहेत. कारण लोकप्रतिनिधींना आधीच सेट केले होते व त्यानुसार केवळ औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे! परवानगी मिळावी यासाठी आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. त्याशिवाय हे काही शक्य नाही, अशी गावांमध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र, किती आकडा यावरून अनेकजण आपापले तर्क काढत आहेत! पण काय सत्य अन् काय खोटे हे देवा परमेश्वराला माहिती! पण जिथे कुठे सनबर्न भरतो, तिथे काहींची दिवाळी व दसरा अशी नवीन म्हण गोव्यात आता हळूहळू प्रचलित होऊ लागली आहे, एवढे नक्की... ∙∙∙

लोबोंची धडपड

सनबर्न महोत्सव धारगळ येथे होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. धारगळ पंचायतीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, परंतु. कित्येक वर्षानंतर महोत्सवाची जागा बदलली जाणार असल्याने कळंगुटचे आमदार मायकल लोबो हेसुद्धा चलबिचल झाले आहेत. या महोत्सवामुळे होणारी कोट्यवधींची उलाढाल व त्यातून अनेक व्यावसायिकांना होणारा फायदा यासाठी काहींना तो वागातोर येथे व्हावा असे वाटते. लोबो यांनी या महोत्सवाला कोणी जागा देण्यास तयार नाही, तर कळंगुटमध्ये तो करावा असे मत काही महिन्यांपूर्वी व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्याकडे सरकारने लक्षही दिले नाही. ∙∙∙

भ्रष्टाचार संपता संपेना!

पोलिस खात्यातील वाहतूक पोलिस विभागात गेल्या काही महिन्यांपासून किनारपट्टी भागात पर्यटकांची सतावणूक व बोकाळलेला भ्रष्टाचार काही संपता संपेना. पर्यटकांना विनाकारण अडवू नका असे सरकारने वारंवार सांगूनही त्याची गंभीर दखल वाहतूक पोलिसांनी घेतलेली नाही असे हणजूण येथे आयपीएस अधिकाऱ्याच्या पर्यटक नातेवाइकांना आलेल्या अनुभवावरून समोर आले आहे. हेल्मेट नसल्यास पर्यटकांना अडवून कारवाई करा, पण त्यांना अडवून त्यांच्याकडे दस्तावेज तसेच इतर कारणांसाठी सतावणूक करू नका अशा सूचना केलेल्या आहेत. मात्र, अजूनही पोलिस सुधारलेले नाहीत. कारवाईचा बडगा दाखवून पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड देण्याची भीती या वाहतूक पोलिसांकडून दिली जाते. त्यानंतर समझोता करत लुबाडणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत. गोव्यातील आयपीएस अधिकाऱ्याचे नातेवाईक असलेल्या पर्यटकांनी ही बाब त्यांच्याकडे मांडली. त्यामुळे पोलिस खात्यातील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भ्रष्टाचारी पोलिसांमुळे मात्र पोलिस खाते बदनाम होत आहे. या पोलिसांवर निलंबनाची कारवाई नाममात्र केली जाते व काही महिन्यांनी ते सेवेत रुजू होऊन राजकारण्यांच्या मदतीने पुन्हा वाहतूक पोलिस विभागात हजेरी लावतात. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT