पणजी: मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत यांना मांद्रे गट काँग्रेसने पक्षप्रवेश दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ॲड. सावंतांच्या पक्षप्रवेशालाच गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, यांच्यासह तीन आमदारांनी विरोध केला आहे. तरीही मांद्रे गट काँग्रेस पक्षप्रवेशाचे समर्थन करीत असल्याने सावंतांच्या पक्षप्रवेशावरून काँग्रेसमध्ये काय पडसाद उमटतात, हे पहावे लागणार आहे.
या प्रकरणी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी या पक्षप्रवेशावर टीका केली आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशावरून काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पक्षांकडून राजकीय तमाशाचेच दर्शन होऊ लागले आहे.
जमीन गैरव्यवहार प्रकरणात संबंध असल्याच्या कारणावरून ॲड. सावंत याला तीन दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाने पक्षातून काढून टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस पक्षाने त्याला आपल्या पक्षात सामावून घेतले. तो प्रवेश होतोय, तोच आमदार सरदेसाई यांनी त्यावर टीका केली.
मांद्रेचे माजी सरपंच असलेले ॲड. सावंत यांचे मांद्रे मतदारसंघात राजकीय वजन असल्याने दुसऱ्याच दिवशी तेथील गट काँग्रेसने त्यांना काँग्रेस पक्षात सामावून घेतले. त्यांच्या प्रवेशामुळे मांद्रे गटात काँग्रेसची ताकद वाढेल, असे वाटले. त्यामुळेच ही पक्ष प्रवेशाची प्रक्रिया त्यांनी पार पाडली.
या पक्षप्रवेशावरून गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी ट्वीट करीत काँग्रेसवर टीका केली. शिवाय हे प्रकरण येथेच थांबले नाही. तर काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकाराव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशाची दखल घेतली.
त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना हा पक्षप्रवेश थांबवा, असे स्पष्ट बजावले. ठाकरे यांच्या कानावर वकिलांनी केलेल्या कारनाम्याची बाब पोहोचली असल्यानेच त्यांनी तत्काळ त्यांचा प्रवेश थांबवा असे सांगितले, अशी माहितीही पुढे आली आहे.
काँग्रेसचे प्रभारी ठाकरे यांनी केलेल्या विरोधाची बाब तत्काळ पक्षातील इतर नेत्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता आणि आमदार कार्लोस फेरेरा यांनीही वकीलबाबूंच्या प्रवेशाला विरोध केला. तिन्ही आमदारांनी या एखाद्याच्या पक्ष प्रवेशावेळी त्यांची सर्व बाजू तपासायला हवी, असे म्हटले आहे.
ॲड. सावंत यांना गोवा फॉरवर्ड पक्षातून काढताना त्या पक्षाचे उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कळंगुटकर यांनी त्यांना ‘लँड माफिया‘ म्हणून संबोधले आहे, त्याबाबत एक पुरावा तरी पत्रकारांना सादर करावा, असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिले आहे. लँड माफियांकडे जर सावंत यांचे संबंध असते तर ‘गोवा फॉरवर्ड'मध्ये प्रवेश देताना माहिती घेतली नव्हती का? असा सवालही त्यांनी केला आहे. काँग्रेस गट समितीने पक्षप्रवेशाचे समर्थन केले असल्याने प्रदेश काँग्रेस काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.