Mahadayi Water Disputes Tribunal: म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिल्याचे 29 तारखेला जाहीर झाले. त्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी भाजपसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीकेची झोड उडवली. शिवाय याविरोधात एकत्रित येऊन लढा उभारण्याची भीमगर्जनाही काहींनी केली.
परंतु आठ दिवस झाले तरी राज्यातील विरोधी पक्ष म्हादई प्रश्नावर स्वतःचाच अजेंडा चालवत आहेत. त्यामुळे या सर्वांना एकत्र येण्यापासून कोणी रोखले आहे काय? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.
कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला मान्यता दिल्यानंतर दोन दिवसांनी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आणि ‘म्हादई जागोर’चा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी काँग्रेसनेही विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
दुसरीकडे गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, रिव्होल्युशनरी गोवन्स, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन म्हादईवरील प्रेम व्यक्त केले. हे करताना त्यांनी भाजप सरकारवरही तोंडसुख घेतले.
शिवाय म्हादईप्रश्नी सर्वांनी एकत्र यावे, असा नाराही दिला. आता आठ दिवस झाले तरी कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्र यायचे किंवा कोणी पुढाकार घ्यायचा, यात विरोधी पक्षांचे एकमत झालेले नाही.
‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’ संघटनेने दोनदा पत्रकार परिषद घेऊन म्हादईप्रश्नी लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ‘आप’च्या आमदारांसह नेत्यांनी कळसा प्रकल्पाची कणकुंबी येथे पाहणी केली. तत्पूर्वी शिवसेनेने केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा राजीनामा मागितला. तृणमूल काँग्रेसने आपली भूमिका मांडली आणि राज्यपालांना निवेदनही सादर केले.
एकमेव आमदार असलेल्या गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांनी सरकारने बोलावलेल्या आमदारांच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी आमदारांबरोबर बहिष्कार घातला आणि आपला विरोध स्पष्ट केला. परंतु या सर्वांनी एकत्रित येऊन भक्कम लढा उभारणे अपेक्षित होते, ते झाले नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कर्नाटकमध्ये मोजकेच पक्ष आहेत; पण गोव्यात अनेक पक्ष असल्याने ते म्हादईच्या विषयावरून टीका करीत आहेत. परंतु ते सर्व पक्ष एकत्रित येऊन जो जनरेटा उभारायला हवा, तो उभारला जात नसल्याने त्याविषयी समाजात एकीचा नव्हे, तर बेकीचा संदेश जात आहे. कर्नाटकला अशीच फाटाफूट हवी असते, हे यापूर्वीही दिसून आलेले आहे.
येत्या दोन दिवसांत आम्ही सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहोत. ‘सेव्ह म्हादई-सेव्ह गोवा’ या संघटनेबरोबर एकत्रितरित्या येण्याचा आमचा प्रयत्न असेल. - समील वळवईकर, नेते, तृणमूल काँग्रेस.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.