म्हापसा: कुशे-खोर्जुवे येथे घराच्या नूतनीकरणाच्या बांधकामावेळी दगडी भिंत कोसळली. या भिंतीच्या खाली गाडला गेल्यामुळे रमेश मावसकर (२७, मूळ मध्यप्रदेश) हा कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी दि. २० रोजी सायंकाळी उशिरा घडली.
कुशे येथील हे पोर्तुगीजकालिन घर दुबईस्थित घराच्या मूळ मालकाने दिल्लीतील एका व्यक्तीला दिले आहे. सदर व्यक्तीने हल्लीच या घराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या घराच्या मागच्या बाजूला दोन खोल्यांचे लहान घर होते. ते पाडण्याचे काम चार कामगारांमार्फत सुरू होते.
मंगळवारी घराची दुर्घटनाग्रस्त दगडी भिंत पाडली जात होती. ही भिंत चुकून आतील बाजूने कोसळली व तिथे असलेला कामगार या भिंतीखाली चिरडला गेला. इतर सहकारी तिघा कामगारांनी त्यास भिंतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत तो मरण पावला होता.
या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर व सहाय्यक उपनिरीक्षक अजय गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.