Goa Beach Party : राज्यातील ध्वनिप्रदूषणाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या निर्देशास तिलांजली देत कथित राजकीय आश्रयाखाली मांद्रे येथील आश्वे किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्याच्या परिसरात एका रिसॉर्टकडून कथित मोठ्या कर्णकर्कश आवाजात संगीत पार्टी वाजविण्यात आली. वागातोर किनाऱ्यावरही शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कर्णकर्कश पार्टी वाजली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सीआरझेडचे उल्लंघन केल्याबद्दल आणि ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्याच्या परिसरात अडथळा आणल्याबद्दल राज्य वन विभागाने शुक्रवारी आश्वे येथील एका बीच रिसॉर्टच्या आयोजकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कासव संवर्धन क्षेत्र
ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांकडून या किनाऱ्याचा वापर अंडी घालण्यासाठी केला जातो. या अनुषंगाने हा किनारा कासव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्राच्या लगतच असलेल्या या कथित रिसॉर्टकडून ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करत कर्णकर्कश आवाजात संगीत पार्टीचे आयोजन केले होते.
सोशल मीडियावरून जाहिरातबाजी
शिवोली मतदारसंघातील वागातोर परिसरातील वझरान परिसरात क्लब तसेच आस्थापनांकडून मध्यरात्रीनंतर देखील लाऊड म्युझिक वाजवून पार्ट्या केल्या जाताहेत. याकडे पोलिस तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता कारवाई होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, या कथित पार्ट्यांची सोशल मीडियावरून जाहिरातबाजी केली जात आहे.
ऑलिव्ह रिडलेंच्या घरट्यासाठी राखीव
परिक्षेत्र वन अधिकारी, वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन, मोरजी यांनी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की, पाहणीदरम्यान संबंधित रिसॉर्टकडून आंतरभरती रेषेमध्ये सनबेड लावले होते. याशिवाय दिवे लावून रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते.
या रिसॉर्टद्वारे आश्वे-मांद्रे किनाऱ्यावर किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन, याशिवाय रिसॉर्टमध्ये मेटॅलिक स्टँड व बांधकाम उभारलेले आढळले.
हा समुद्रकिनारा ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यासाठी राखीव आहे आणि कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून या रिसॉर्टचे ठिकाण अगदी जवळ आहे. या रिसॉर्टला पुढील तीन दिवसांत कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.