रस्त्यांवर मोकाट फिरणारी गुरे वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. फोंडा शहरातही अशा गुरांचा मुक्त संचार दिसतो. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे हे नित्याची बाब बनली आहे. विशेष म्हणजे कितीही हॉर्न वाजवला तरी ही गुरे आपली जागा सोडत नाहीत. त्यामुळे मग या गुरांना हाकलण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. त्यातून छोटे-मोठे अपघात घडतात. वाहतूक रोखणारी ही गुरे वाहतूक पोलिसांचे काम करत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
रात्रीची वेळी रस्त्यावर बसलेली गुरे अंधारात दिसत नसल्यामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेले आहेत. शेजारच्या कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रात तर ही बाब जास्तच अधोरेखित होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. कधी कधी ही गुरे अकस्मात वाहनचालकांसमोर येतात तर कधी कधी दोन गुरांच्या भांडणामुळे अपघात घडतात. यावर खरे तर कोंडवाडा हाच एक पर्याय असून फोंडा नगरपालिकेने त्यासाठी पावले उचलल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी कुर्टी-खांडेपार पंचायतीने मोकाट गुरांना गो-शाळेत पाठवण्याचा उपक्रम आरंभला होता. त्यामुळे काही प्रमाणात गुरांचा रस्त्यावरील मुक्त संचार कमी झाला होता. मात्र गेल्या सहा महिन्यांत परत हा संचार वाढला असून त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येतेय. गुरांबरोबरच मोकाट फिरणारी कुत्रीही वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत. अचानक येणाऱ्या कुत्र्यांमुळे कितीतरी दुचाकीस्वार तोल जाऊन पडताना व जखमी होतात. त्यांच्यामुळे गुरासारखी वाहतूक खंडित होत नसली तरी त्यांचे आक्रमण अपघातांना निमंत्रण देणारे ठरते.
पूर्वी ‘पीपल्स फॉर ॲनिमल’ ही संस्था बेवारशी कुत्र्यांना नेऊन त्यांचे निर्बीजीकरण करणारे इंजेक्शन देऊन सोडत असे. पण सध्या ही मोहीमही थंडावल्यासारखी झाली आहे. एकंदरीत मोकाट सुटलेली गुरे व बेवारशी कुत्रे यामुळे सध्या फोंड्यातील समस्यांत अधिकच भर पडलेली आहे. नगरपालिका व पंचायतींनी या समस्येचे निवारण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुरांच्या भांडणात दोन विद्यार्थिनी जखमी
अलीकडेच घडलेल्या एका घटनेत आकस्मिकपणे पुढ्यात आलेल्या गुरांमुळे व त्यांच्या भांडणामुळे हवेली येथे शाळेत जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यापैकी एका मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. यापूर्वीही असे अनेक अपघात होऊन कित्येक जखमी, जायबंदी झालेले आहेत तर काहींना आपला प्राण गमवावा लागला आहे. यातून ही समस्या किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.
मी सरपंच असताना कुर्टी-खांडेपार पंचायतीने सिकेरी येथील गोशाळेबरोबर करार केला होता. त्यामुळे त्यांचे लोक मोकाट गुरांना नेत असत. पण गेल्या तीन महिन्यांत हा उपक्रम थंडावला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोकाट गुरांची संख्या वाढायला लागलीय. पंचायतीने पुन्हा एकदा त्या कराराला ऊर्जा देऊन ही मोहीम प्रभावीपणे राबविली पाहिजे.
- भिका केरकर, (कुर्टी-खांडेपारचे माजी सरपंच व विद्यमान पंच)
फोंडा शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांची नगरपालिकेने गंभीर दखल घेतली असून बेतोडा-निरंकाल येथे ‘काऊ शेड’ बांधणार आहे. लवकरच ती कार्यान्वित होईल. त्यानंतर पालिका कक्षेत फिरणाऱ्या मोकाट गुरांना तेथे स्थलांतरित केले जाईल. साहजिकच फोंडा शहराला भेडसावणारी ही समस्या कायमची दूर होईल.
- विश्वनाथ दळवी (फोंड्याचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.