Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : भाजपमधील मोहरे धोक्यात; लोकसभा निवडणूक निकालानंतर ठरणार नेते-पदाधिकाऱ्यांंचे राजकीय भवितव्य

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निकालानंतर मंत्रिमंडळ फेररचनाही केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

पणजी, लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. त्याच दिवशी सत्ताधारी भाजपमधील अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्यही ठरणार आहे. भाजपच्या या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची पूर्ती झाली नसल्यास त्यांना त्याची राजकीय किंमत चुकवावी लागणार आहे.

लोकसभेच्या  निकालानंतर मंत्रिमंडळ फेररचनाही केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. 

भाजपमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नाही. दोघांनीही जाहीरपणे आपण मित्र आहोत, असे भासवण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला असला, तरी  नेमके सत्य काय आहे, याची पुरती जाणीव प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला आहे. खासगीत बोलताना या संघर्षाची अनेक रूपे त्यांच्याकडून उलगडली जातात.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्र्यांचा साखळी मतदारसंघ पूर्णतः पोखरला गेला होता. तरीही मुख्यमंत्री कसेबसे त्या मतदारसंघातून विजयी झाले.

त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष झाला. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर लगेच नवे सरकार सत्तारूढ होऊ शकले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी आता बुद्धीचातुर्याने त्यावर मात करत आपल्या मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी व्यवस्थित केली असली तरी आता उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक यांना मताधिक्य देण्यावरून राणे आणि सावंत यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. 

पर्वरीतील नेते असंघटित

पर्वरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे करतात. उल्हास अस्नोडकर, कुंदा चोडणकर, किशोर अस्नोडकर, गुरुप्रसाद पावसकर हे भाजपचे नेते या मतदारसंघात असले तरी ते संघटित नसल्याचे चित्र या निवडणुकीदरम्यान प्रकर्षाने जाणवले. पर्वरी मतदारसंघावर खंवटे यांनी पकड मिळविली आहे. तरीही जुन्या भाजप नेते-कार्यकर्त्यांचे हवे तसे मनोमीलन झाल्याचे दिसून येत नाही. खंवटे यांची वर्णी उत्तर गोव्याचे भाजपचे प्रचारप्रमुख म्हणून लावली, यावरून त्यांचे दिल्लीतील वजन लक्षात येते. हे वजन वाढेल की घटेल, याचा फैसला लोकसभा निवडणूक निकालावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याचे राजकीय वर्तुळात सांगण्यात येते.

ताळगावच्या मतांवर करडी नजर

ताळगावमध्ये महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर या आमदार आहेत. या परिसरामध्ये भाजपला किती मते मिळतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. ताळगाववर आपली पकड कायम असल्याचे बाबूश मोन्सेरात यांनी पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.

रुडॉल्फ यांचीही कसोटी

सांताक्रुज मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रुडॉल्फ फर्नांडिस यांची मोठी कसोटी आहे. तेथे भाजपला मताधार आहे, शिवाय आम आदमी पक्षाचे नेते ॲड. अमित पालेकर हेही त्याच परिसरातील आहेत. त्यामुळे मागच्या खेपेला असलेले काँग्रेसचे मतदार आता आपल्या बाजूने वळले आहेत, हे रुडॉल्फ यांना या निवडणुकीत सिद्ध करावे लागणार आहे. त्यावरच त्यांची भाजपमधील पुढील कारकीर्द ठरणार आहे. 

...तर सिल्वेरांना लॉटरी

सांत आंद्रे मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले फ्रान्सिस सिल्वेरा सध्या बरेच सक्रिय झाले आहेत. या मतदारसंघात ‘आरजी’चे वीरेश बोरकर हे आमदार आहेत. सिल्वेरा  या मतदारसंघामध्ये भाजपला आघाडी मिळवून देण्यात यशस्वी झाले तर त्यांना पुढील विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. अन्यथा भाजपला तेथे संघटनात्मक पातळीवर बरेच बदल करावे लागणार आहेत.

कुंभारजुवेत तिघांचे भवितव्य पणाला

 कुंभारजुवे मतदारसंघामध्ये  माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांना पुन्हा सक्रिय करण्यात भाजपला यश आले आहे. श्रीपाद नाईक यांचे पुत्र आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईक हेही या मतदारसंघात सक्रिय आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेश फळदेसाई हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या तिघांपैकी कोण जास्तीत जास्त मते भाजपला देतो, यावरच त्यांचे  राजकीय भवितव्य ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांची उमेदवारी खुद्द पक्षश्रेष्ठींनी ठरविली आहे. त्यामुळे दक्षिण गोव्याची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची असून तेथे सरकारच पणाला लागले आहे, असे म्हणता येते. जर यदाकदाचित दक्षिण गोव्याची जागा भाजपने गमावली, तर राज्यात नेतृत्व बदल होऊ शकतो, अशी राजकीय चर्चा आतापासूनच ऐकू येऊ लागली आहे.

समीर मांद्रेकरांची खडतर वाट

शिवोली मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत लोबो यांची कामगिरी सरस झाली तर विधानसभा निवडणुकीत त्याच भाजपकडून लढतील आणि मांद्रेकर यांचा पत्ता कायमचा कट होईल, असे दिसते. तसे झाले तर समीर मांद्रेकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

जादा मताधिक्य पर्ये की साखळीत?

साखळी मतदारसंघात मी एकही सभा घेतली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, तरीही या मतदारसंघात मोठे मतदान झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पर्ये, वाळपई आणि साखळी मतदारसंघांत  भाजपला मताधिक्य देण्यावरून स्पर्धा आहे. त्यातून कोणाची सरशी होईल, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

राजधानी पणजीत काय घडणार?

पणजीत वेगळीच स्थिती आहे. आपण पणजीतच राहणार असल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी जाहीर करून भाजपला आव्हान दिले आहे. पणजीतील उमेदवारी बदलण्याचा विचार भाजप करू शकत नाही, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उत्पल पर्रीकर इच्छुक आहेत. ते दिल्लीत प्रयत्न करतील, हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी उत्पल यांनी किती मदत केली आणि मोन्सेरात यांची मते किती, हे डोळसपणे भाजपला या निवडणुकीत पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT