Lok Sabha Dainik Gomantak
गोवा

lok sabha election 2024 : दिगंबर कामतना दक्षिण लोकसभेसाठी पहिली पसंती

बाबू कवळेकरही स्पर्धेत : नरेंद्र सावईकरांचा पत्ता कधीच कट; दामूही बाद, कोणत्याही स्थितीत गड जिंकण्यासाठी रणनीती

दैनिक गोमन्तक

भाजप पक्षश्रेष्ठींनी दक्षिण गोव्याची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली असून तेथे गेल्या आठवड्यापासून उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी दिगंबर कामत आणि बाबू कवळेकर यांच्यात निर्णायक झुंज सुरू आहे.

सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्वत:च्या हिकमतीवर उमेदवार हुडकून काढण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले असून गेल्या निवडणुकीत जे भाजप मतदारसंघ दहा हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने हरले आहेत, असे देशभरातील १६० मतदारसंघ हेरून ते कोणत्याही स्थितीमध्ये जिंकण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा असून २०२४ मध्ये तो कोणत्याही परिस्थितीत हातचा जाऊ द्यायचा नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना बजावण्यात आले आहे.

सध्या कामतांचे पारडे जड

या निवडणुकीत हिंदू मतांच्या ध्रुवीकरणावर भाजप भर देणार असून त्याच दृष्टिकोनातून देशभर समान नागरी कायद्याचे सूत्र सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे ख्रिस्ती व मुस्लिम मते विरोधात जाऊ शकतात. गोव्यात चर्च धर्मसंस्थेने यापूर्वीच भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा समाचार घेणे सुरू केले असून ती लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भूमिका घेऊ शकते.

परंतु कामत हे भाजपचे सौम्य व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्याशी पक्षभेद बाजूला ठेवून ख्रिस्ती व मुस्लिम समाजात चाहतावर्ग आहे. हिंदू समाजात त्यांना बराच मोठा पाठिंबा आहेच. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत कामत यांचेच सध्या तरी पारडे जड ठरले आहे.

बाबू मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

दामू नाईक यांचा पत्ता कापला जाण्यापूर्वीच माजी उमेदवार ॲड. नरेंद्र सावईकर यांनाही आपण या स्पर्धेत - नवीन निकषानुसार मागे पडू याचा अंदाज आला होता. - व ते निराश झाले आहेत. त्यांनी पणजी कार्यालयात येणेही कमी केले असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे. कारण त्यांची स्वत:ची अशी मते नाहीत.

त्या तुलनेत बाबू कवळेकर यांनी दक्षिण गोव्यात स्वत:कडे १८ हजार मते असल्याचा दावा केला आहे. सध्या ते सतत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात आहेत. दक्षिण गोव्याची जागा पक्षश्रेष्ठींसाठी खूप महत्त्वाची असल्याने यंदा पहिल्यांदाच - निवडणुकीला केवळ सहा महिने बाकी असताना - उमेदवाराची निवड झालेली नाही.

...म्हणून सिक्वेरांना विरोध

गोव्यात मंत्रिमंडळातील फार काळ ताटकळलेला बदल हा दिगंबर कामत यांना त्यात स्थान द्यावे की नाही, याच कारणावरून लांबणीवर टाकला जात असून लोकसभा निवडणुकीपर्यंत तो पुढे ढकलण्याचे कारणही कामत यांची परस्पर उमेदवार म्हणून वासलात लावता येते का, हेच पाहण्यासाठी आहे, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

कामत यांनीच पक्षश्रेष्ठींकडे मंत्रिमंडळात आलेक्स सिक्वेरांचा समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे. सिक्वेरांचा समावेश लोकसभा निवडणुकीत पक्षाला लाभदायक ठरणार नाही, असा कामत यांचा दावा आहे.

...त्यामुळे मुख्यमंत्र्यांना समाधान

दिगंबर कामत यांचे या उमेदवारीत पारडे जड असल्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण, स्थानिक राजकारण आहे. - त्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या मंत्रिमंडळात स्थान देण्यास उत्सुक नाहीत. - त्यामुळे ते परस्पर दिल्लीला चालले तर सावंतांना आनंदच होणार आहे.

दामू नाईकांना संधी कमीच

उत्तर गोवा लोकसभेची जागा सहज पदरात पडेल, अशी खात्री भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळे यंदा दक्षिण गोव्यावर संपूर्णत: भर द्या, अशी सूचना नेत्यांना केली आहे.

उत्तर गोव्यात सध्या तरी श्रीपाद नाईक यांनाच प्राधान्य मिळेल, असे दिसते दक्षिणेत ओबीसी उमेदवाराच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडावी, असे कसलेही बंधन उमेदवार निवडताना राहणार नाही; त्यामुळे तेथे दामू नाईक यांना संधी खूप कमी आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नव्या निकषानंतर नवे ‘घोडे’

दक्षिण गोव्यात गत निवडणुकीतील पराभूत उमेदवार ॲड. नरेंद्र सावईकर यांनाच उमेदवारी मिळेल, अशी सहा महिन्यांपर्यंत परिस्थिती होती; परंतु त्यानंतर स्पर्धेत दामू नाईक उतरले आणि गेल्या महिन्याभरात पक्षाने ‘जिंकू शकणारा उमेदवार’ हा नवीन निकष लावल्यानंतर दिगंबर कामत आणि बाबू कवळेकर हे नवे ‘घोडे’ शर्यतीत पुढे आले आहेत.

विरोधकांनाही ‘गुगली’

येत्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट होण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याने पक्षश्रेष्ठी हबकले आहेत व लोकसभेसाठी भाजपची उमेदवारी देताना ‘जिंकू शकणारा उमेदवार’ हाच प्रमुख निकष ठरविला आहे.

त्या १६० मतदारसंघांत हाच निकष लागू करून विरोधकांमध्येही संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; त्यामुळे काही प्रादेशिक पक्षांकडेही भाजप नेत्यांनी मैत्रीचा हात पुढे केला आहे. किमान त्यांनी या निवडणुकीत क्रियाशील राहू नये, असा त्यांचा प्रयत्न राहील.

...या नेत्यांचा पाठिंबा महत्त्वाचा

दक्षिणेचा उमेदवार निश्‍चित करताना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या पाठिंब्याला महत्त्व आहे. दोघांचाही कानोसा घेता, दक्षिणेत सहज जिंकून येणारा मोहरा म्हणून त्यांची दिगंबर कामत यांनाच पसंती आहे.

जरी अनपेक्षितपणे दिल्लीला पाठवले जाणे कामत यांच्या पचनी पडलेले नाही. कामत यांची ‘पोटली’ दिल्लीला पाठवली तर मुख्यमंत्र्यांना मोकळा श्‍वास घेणे शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT