Dudhsagar Waterfall GTDC Counter Row
फोंडा: दूधसागर पर्यटनासंबंधीचा वाद सध्या सुरू असून हा वाद पर्यटनाला निश्चितच मारक आहे, याप्रकरणी जास्त ओढाताण न करता सरकार आणि टूर ऑपरेटर या दोन्ही घटकांनी सामंजस्याची भूमिका घेत तोडगा काढण्याची खरी गरज आहे आणि हा तोडगा मुख्यमंत्र्यांनी काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.
आधीच राज्यातील विविध आंदोलनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होऊ पाहत आहे, त्यातच पर्यटनाला एखादा डाग लागला, तर ती गोष्ट राज्याच्या दृष्टीने निश्चितच हानिकारक सिद्ध होऊ शकते, म्हणून हा तोडगा शक्य तेवढ्या लवकर निघायला हवा.
आता सरकारची भूमिका ही शंकांचे निरसन करण्याएवढी निश्चितच असायला हवी. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वादासंबंधी बैठकही घेतली, पण अजून तोडगा निघालेला नाही. शेवटी व्यवहार पारदर्शक व्हायला हवा. जीटीडीसी अर्थातच सरकारचे म्हणणे आणि जीपवाल्यांचे म्हणणे यांच्यातूनच हा सुवर्णमध्य निघायला हवा.
दूधसागर पर्यटनासाठी लाखो पर्यटक येतात, आणि अजून पर्यटन हंगाम सुरू झालेला नसल्यामुळे या पर्यटकांत सध्या चुळबूळ सुरू आहे, जीपवाल्यांचाही धंदा बुडत आहे, सरकारलाही नुकसानी सहन करावी लागत आहे, त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्थानिक आमदार तसेच जीपवाल्यांच्या समक्षच काय तो तोडगा काढावा, काय ‘निगेटिव्ह'' आणि काय ‘पॉझिटिव्ह''यावर एकदाच खल होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील खनिज खाणी बंद झाल्यानंतर मोले-कुळे भागातील बहुतांश लोकांची रोजीरोटी ही दूधसागर पर्यटनावर चालते. आतापर्यंत खाण व्यवसायावरच चालले, पण गेली बारा वर्षे खाण व्यवसाय बंद असल्यामुळे लोकांचे अतिशय हाल झाले आहेत. तरीपण मोले कुळेतील स्थानिकांच्या रोजगाराचे माध्यम दूधसागर बनले आहे, पण दूधसागर तर बंदच आहे, त्यामुळेच स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होत आहे.
दूधसागर पर्यटनाच्या वादात विद्यमान आमदार गणेश गावकर तसेच माजी आमदार दीपक पाऊसकर तसेच विनय तेंडुलकर पडले आहेत. खरे म्हणजे हा प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता त्यातून तोडगा निघायला हवा, आणि ते फक्त मुख्यमंत्रीच करू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.