World Table Tennis वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेतचा चीनचा सतरा वर्षीय लिन शिदाँग जायंट किलर ठरला, पण पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत रविवारी नव्या दमाच्या खेळाडूला देशवासीय लिआंग जिंगकुन याचा अनुभव भारी ठरला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील खेळाडूने 59 मिनिटांच्या चिवट झुंजीनंतर 4-2 फरकाने विजय मिळवून कारकिर्दीतील चौथे डब्ल्यूटीटी विजेतेपद मिळविले. एकेरीत चिनी खेळाडूंनी दबदबा राखला.
ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम लढतीत 26 वर्षीय जिंगकुन सुरवातीस 1-2 गेम्सने पिछाडीवर होता, नंतर अनुभव पणास लावत त्याने यावर्षीचे पहिले डब्ल्यूटीटी एकेरी विजेतेपद प्राप्त केले. जिंगकुन याने सामना 11-6, 9-11, 10-12, 12-10, 12-10, 11-9 असा जिंकला. लिन शिदाँग जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानी आहे.
त्याने चौथ्या गेममध्ये 7-4अशी आघाडी घेत मुसंडी मारण्याची प्रयत्न केला, मात्र जिंगकुन याने गुण मिळवत सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. नंतर दोन्ही गेम जिंकताना त्याने शिदाँगला मोक्याच्या क्षणी चुका करण्यास भाग पाडले. जिंगकुन याने यापूर्वी डब्ल्यूटीटी स्पर्धेत 2021 मध्ये दोन वेळा, तर 2022 एक विजेतेपद मिळविले होते.
चिनी खेळाडूचे वर्चस्व
महिला गटातही चिनी खेळाडूचे वर्चस्व राहिले. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या वँग यिदी हिने तैवानच्या चेंग आय-चिंग हिला 37 मिनिटांत 4-0 (11-6, 11-6, 11-8, 11-4) असे सहजपणे नमविले. गतवर्षी आशिया कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या वँग हिने चतुरस्त्र खेळ आघाडी वाढवत नेली.
चौथ्या गेममध्ये ती 0-3 अशी मागे पडली, पण वेळीच सावरत तैवानची खेळाडू डोके वर काढणार नाही याची दक्षता घेतली. गेल्या वर्षी बुडापेस्ट येथे विजेतेपद मिळविलेल्या वँग हिचे हे सलग दुसरे डब्ल्यूटीटी एकेरी जेतेपद ठरले.
कोरियन जोडी पुरुष दुहेरीत विजयी
पुरुष दुहेरीत कोरियाच्या ॲन जेएह्यून व चो सेऊंगमिन जोडीने विजेतेपद मिळविले. त्यांनी जपानच्या उदा युकिया टोगामी शुनसुके जोडीवर 3-1 (11-3, 9-11, 12-10, 11-4) अशी मात केली.
चौदा वर्षीय खेळाडूचे यश
जपानची 14 वर्षीय मिवा हारिमोटो हिने महिलांच्या दुहेरीत वीस वर्षीय मिया नागासाकी हिच्या साथीत विजेतेपद मिळविले. त्यांनी तैवानच्या लि या-झून व चेंग आय-चिंग जोडीवर 3-0 (11-9, 11-7, 11-6) अशी मात केली. मिवा हिने टोगामी शुनसुके याच्या साथीत मिश्र दुहेरीतही अंतिम फेरी गाठली होती, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.