Late announcement of Ramakant Khalap's candidature for North Goa benefited Shripad Naik
Late announcement of Ramakant Khalap's candidature for North Goa benefited Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

North Goa Constituency: उत्तर गोव्याची उमेदवारी उशिरा जाहीर करणं काँग्रेसला पडलं महागात; भाजपच्या नाईकांना फायदा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरू केलेला प्रचार, भाजप पक्षश्रेष्‍ठींनी उमेदवारांच्या पहिल्या यादीत दिलेले स्थान तसेच काँग्रेसने उमेदवारी अर्ज सादर करण्यास अवघे चार दिवस बाकी असताना ॲड. रमाकांत खलप यांना जाहीर केलेली उमेदवारी हे सारे भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या पथ्यावर पडले आणि त्यांनी तब्‍बल सव्वा लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला.

उत्तर गोव्यात कार्लुस फेरेरा (हळदोणे) आणि वीरेश बोरकर (सांतआंद्रे) हे दोनच आमदार विरोधकांकडे असल्याने २० पैकी १८ मतदारसंघांत नाईक यांना मताधिक्य मिळेल, असे चित्र होते. प्रत्यक्षात तसे झाले नसले तरी त्या-त्या मतदारसंघांत भाजपला चांगली मते पडली. पर्ये, वाळपई आणि साखळी मतदारसंघात मिळालेले मताधिक्य नाईक यांना विजयापर्यंत व विक्रमी मताधिक्‍यापर्यंत घेऊन गेले. नाईक यांनी शिस्तबद्ध प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार जाहीर होईपर्यंत नाईक यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती.

पर्वरीत ५७०० मताधिक्य

कळंगुट, हळदोणे, सांताक्रुझ आणि सांतआंद्रेमध्ये नाईक यांना मताधिक्य मिळाले नाही. पण पर्वरीत ५,७०० मताधिक्य मिळाले. कळंगुट येथे भाजपचे मायकल तर सांताक्रुझमध्ये रुडॉल्फ आमदार आहेत. कळंगुटमध्ये माजी आमदार आग्नेल यांनी तर सांताक्रुझमध्ये ‘आप’चे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर आणि कॉंग्रेसचे नेते मोहन धोंड यांनी आपली ताकद दाखवून दिली. विद्यमान आमदारांसाठी ती धोक्याची घंटा ठरली आहे. सांतआंद्रेचे माजी आमदार सिल्वेरा हे नोकरी देऊनही भाजपला मताधिक्य मिळवून देऊ शकले नाहीत.

भंडारी समाजाचा पाठिंबा

हरवळे येथील श्री देव रुद्रेश्वर मंदिरात पालखी प्रकरण उद्‍भवले; पण त्याप्रकरणी श्रीपाद नाईक यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. ते या प्रकरणी अंग चोरत असल्याचा समज भंडारी समाजाने करून घेतला होता. विशेष म्हणजे दोन भंडारी नेते दयानंद सोपटे व दिलीप परुळेकर यांनी उमेदवारीवर दावा केला होता.नंतर पक्षासाठी काम केले,तरी दरवेळी श्रीपादच का, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरच्या टप्प्यात भंडारी समाजाचे नेते प्रचारासाठी बाहेर पडले आणि श्रीपाद नाईक यांचा विजय त्यांनी सुकर केला.

साखळीतील मताधिक्य

साखळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक सोडली तर प्रचारच केला नव्हता. त्यांच्या पत्नी आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी साखळीचा किल्ला यशस्वीपणे लढवला. मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत राहिले आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी सारी कमान सांभाळली. यामुळे नाईक यांना साखळीतूनही मताधिक्य मिळू शकले.

‘आरजी’चा प्रभाव

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी ४८ हजार मते घेऊन अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. स्वयंसेवकांच्या बळावर त्यांनी तिसरा पर्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पणजी, साखळी वगळता इतर १७ मतदारसंघांत त्यांनी चार आकडी मतसंख्या गाठली. पेडण्यात ४,६००, थिवी ३,२००, शिवोलीत ३,५००, सांतआंद्रेत ३,४००, वाळपईत २,३०० आणि प्रियोळात ४, ७०० मते मिळवून विधानसभेत पक्ष बाजी मारू शकतो, असे संकेत दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: आक्रमक पवित्र्यामुळे ‘मोपा’वरील टॅक्सी पार्किंग दरवाढ मागे

Venzy Viegas: महिलेला मारहाणीसह मानहानी करणाऱ्या PSI च्या निलंबनाची वेन्झीची मागणी

Koo App: देसी ट्विटर 'कू' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकाने लिंक्डइनवर पोस्ट करत दिली माहिती

CRZ Goa: पर्यावरणमंत्र्यांच्‍याच जागेत ‘सीआरझेड’चे उल्‍लंघन करून बांधकाम; करमणेतील स्‍थानिकांचा दावा

Valpoi News: ताडपत्रीच्या आधारावर भरतो बाजार, सर्वत्र खड्डेच खड्डे, रस्त्यांवर सांडपाणी

SCROLL FOR NEXT