मडगाव: नव्याने स्थापन झालेल्या कुशावती जिल्ह्यातील भाडेकरूंसह हॉटेल व इतर आस्थापनांत असणाऱ्या व्यक्तींचे ओळखपत्र घ्यावे आणि पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिला आहे.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्याकडे कुशावती जिल्ह्याचा अतिरिक्त ताबा आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या कामगारांची हॉटेल आस्थापनांनी पथिक या ''सॉफ्टवेअर’मध्ये माहिती भरावी. भाडेकरूंची नोंदणी न करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
राज्याबाहेरून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या वास्तव्यामुळे गुन्हे वाढत असून सुरक्षिततेची चिंता व्यक्त करण्यात येते. त्यानुसार कोणालाही वास्तव्यास ठेवताना ओळखपत्र व इतर माहिती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अनेकदा हॉटेल मालक आणि घरमालकांनी आधी भाडेकरूच्या पार्श्वभूमीची पुष्टी न करता त्यांची जागा भाड्याने दिलेली असते.
कुणालाही भाड्याने जागा देताना घरमालक, हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, गेस्ट हाऊस, धार्मिक ठिकाणची निवासी व्यवस्था करताना मतदानकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना व इतर ओळखपत्रांची तपासणी करावी. पर्यटकांची माहिती पथिक या पोर्टलवर भरावी.राज्यात येणाऱ्या व्यक्तींकडून सादर केलेल्या खोट्या माहितीमुळे गुन्हेगारांची ओळख पटवण्यात कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या अडचणींवर लक्ष वेधण्यात आले.
जागेचा मालक आणि हॉटेल चालकांनी अभ्यागतांच्या डेटाच्या सत्यतेवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि पुष्टी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्याची गरज आहे. अनेकदा गुन्हेगारांची ओळख पटवण्यात अडचण येते कारण गुन्हेगारांनी हॉटेल आणि घरमालकांना दिलेली माहिती खोटी आणि बनावट असल्याचे पोलिसांना आढळून आल्याने ही दक्षता घेण्यास सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशात कुशावती व दक्षिण गोव्यातील हॉटेल मालकांना आणि जागा मालकांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या इतर प्राधिकरणांना आवश्यकतेनुसार तपासणीसाठी मदत करण्यास सांगितले आहे.
जिल्ह्यात कार्यरत राष्ट्रीय बँकांना त्यांच्या एटीएममध्ये सतत सुरक्षा पाळत ठेवण्याचे निर्देश दिले. एटीएमच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करणे आणि सीसीटीव्ही, पॅनिक बटनासह इलेक्ट्रॉनिक सर्व्हे सिस्टिम बसवणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
घरमालक आणि हॉटेल मालकांनी पोलिसांच्या पथिक या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरणे आवश्यक आहे.
दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना भाडेकरूंची नोंद नसलेली प्रकरणे व नियमांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानुसार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी क्लिटस यांनी बीएनएसएस २०२ ३च्या कलम १६३ नुसार सदर व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या आहेत. हा आदेश ५ जानेवारीपासून ६० दिवसांसाठी लागू असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.