पणजी: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसंदर्भात जारी केलेल्या नियमावलीच्या पहिल्या पृष्ठावर कुंडई येथील वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील एखाद्या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर अशी दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतातील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी व शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी या मंडळाने ‘कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट ॲण्ड डिस्पोजल फॅसिलिटीज’साठी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, मुखपृष्ठावर बायोटिक कुंडई या संस्थेचे छायाचित्र वापरले आहे. गोवा राज्यात कार्यरत असलेली ही संस्था जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापन क्षेत्रात एक आदर्श ठरली आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एकूण जैववैद्यकीय कचऱ्याच्या हाताळणीचे नियोजन, कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन, वाहतूक, प्रक्रिया, विल्हेवाट याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर कामगारांचे आरोग्य, सुरक्षा, नियमांचे पालन व पर्यावरण संरक्षण यावरही भर दिला आहे.
रुग्णालये, क्लिनिक्स, लॅब्स, व इतर आरोग्य संस्थांमधून रोज मोठ्या प्रमाणात जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने सामूहिक जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रे स्थापण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही केंद्रे ही एक अशी संरचना आहे, जिथे अनेक आरोग्य संस्थांकडून गोळा केलेला जैववैद्यकीय कचरा योग्य प्रकारे वेगवेगळ्या प्रक्रियेतून जातो. उदा. निर्जंतुकीकरण, जाळणे, पुनर्वापर न करण्यासारख्या वस्तूंचा नाश इत्यादी. या पद्धतीमुळे संपूर्ण शहर किंवा परिसराचा जैववैद्यकीय कचरा एका ठिकाणी प्रभावीपणे हाताळता येतो.
या सुविधेसाठी जागेची निवड करताना ती रहिवासी भागांपासून दूर असावी, पर्यावरणाला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सूचित केले आहे. शिवाय, या केंद्रात हवा, पाणी आणि माती प्रदूषण टाळण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे असावीत, जसे की इन्सिनरेटर, ऑटोक्लेव, श्रेडर वगैरे.
या केंद्रांचा मुख्य उद्देश म्हणजे, छोट्या आरोग्य संस्थांना कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याची गरज पडू नये आणि एकत्रित केंद्राद्वारे खर्चात बचत व कार्यक्षमतेत वाढ साधावी. हे केंद्र दररोज किमान १ हजार ते १० हजार खाटांच्या आरोग्य संस्थांचा कचरा हाताळण्यास सक्षम असावे, असे नियम सांगितले आहेत.
प्रत्येक अशा केंद्राचे नियोजन करताना स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असते. याशिवाय, केंद्र चालवताना नियमित देखरेख, अहवाल सादरीकरण आणि कर्मचारी प्रशिक्षित असणे अनिवार्य आहे.
या वैशिष्ट्यांमुळेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये या संस्थेचा आदर्श नमुना म्हणून उल्लेख केला आहे आणि मुखपृष्ठावर याचे चित्र स्थान दिले आहे. हे चित्र केवळ सजावटीपुरते नसून, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर संस्था व शासकीय यंत्रणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून समाविष्ट केले आहे.
बायोटिक कुंडई ही संस्था एक कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रिटमेंट फॅसिलिटी म्हणून कार्य करते व अनेक दवाखाने, रुग्णालये, दंत चिकित्सालये यांचा जैववैद्यकीय कचरा संकलित करून शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया करते. पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा वापर, काटेकोर नोंदवही ठेवणे आणि सुरक्षित विल्हेवाट यामध्ये बायोटिक कुंडई आघाडीवर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.