राजकारणी कोण कुठे आणि कसा सरकारी तिजोरीतील पैसा गायब करतील हे आता काही लपून राहत नाही, पण त्यातूनही काही चलाख राजकारणी मात्र भ्रष्टाचार करतानाही अत्यंत नियोजनबद्धरीतीने म्हणजे या हाताचे कर्म दुसऱ्या हातालाही कळू देत नाहीत. तर काहीजण बकासुरासारखे एखाद्या कामाला मंजूर झालेला निधीच गायब करतात आणि तो प्रकल्प केवळ कागदावरच असतो. आता कुडका येथे लक्ष्मी मंदिराचा मंडप उभारणीसाठी म्हणे साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले. मंडप काही उभारला गेला नाही, पण ते पैसे कुठे गेले याचा शोध आता तेथील नागरिक घेत आहेत. काहीजणांनी आरटीआयच्या माध्यमातून शोध घेण्यास सुरुवात केली आहे, तर काहीजणांना हा पैसा कुठे गेला हे माहीत असले तरी कागदोपत्री पुरावे नसल्याने गप्प आहेत. पुरावे हाती लागल्यानंतर मंडपही शोधला जाईल आणि ते साडेसहा कोटीही कोणाच्या खिशात गेले, हेही समजेल असे या आरटीआय कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे या मंडपाचे काय झाले, हे पाहण्यासाठी काही काळ धीर धरायलाच हवा. ∙∙∙
पेडणे मतदारसंघात आपण पाचव्यांदा निवडून येऊ शकतो असा बाबू आजगावकर यांना आत्मविश्वास आहे. त्या जोरावरच त्यांनी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना जाहीरपणे ललकारणे सुरू केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपण आजगावकर व आर्लेकर यांना समज दिल्याचे जाहीरपणे सांगितले असले, तरी दामू यांच्या समजाला आपण किती किंमत देतो हे बाबू यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी आपली प्रतिमा जाळणाऱ्यांवर कारवाई करा असे मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्यालाच आव्हान दिले आहे. आपल्यावर कारवाई करण्याची हिंमत भाजपचे प्रदेश पातळीवरील नेतृत्व दाखवणार नाही याची कल्पना असल्यानेच बाबू यांनी आपल्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत. ∙∙∙
पणजीत राहणाऱ्या नेपाळी नागरिकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. त्याच दरम्यान नेपाळी टीव्हीवर गोव्यातील बातम्या दाखवल्या जात असल्याचीही माहिती समोर आली. नेपाळी नागरिकांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येत असल्याचा आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला होता. त्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्याचा दाखला त्यांनी दिला होता. त्याची दखल घेत महसूल खात्याकडून पणजी मतदारसंघात नव्याने नेमलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मतदार अधिकारी कार्यालयाने हटवले होते. त्यानंतर नेपाळी नागरिक दामू यांना भेटले आहेत. अर्थात यावर उत्पल यांची नजर असून त्यांचे कार्यकर्ते सध्या कोणत्या मतदान केंद्रात नव्याने किती नावे समाविष्ट केली याची माहिती मिळवत आहेत.∙∙∙
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे असे सभापती रमेश तवडकर सांगू लागले आहेत. आदिवासी समाजातील गोविंद गावडे यांचा मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर आदिवासी समाजातील तवडकर यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. खुद्द तवडकर यांनाही तसे वाटत असावे. यामुळेच मध्यंतरी आपण मंत्रिपदासाठी इच्छुक नाही असे जाहीरपणे सांगणारे तवडकर यांच्या तोंडातील भाषा बदलली असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे असे ते बोलू लागले आहेत. ते सध्या सभापती या घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे पक्षाने त्यापेक्षा मोठी म्हणजे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी म्हणजेच मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे या न्यायाने द्यायला हवे. मंत्रिपद हे सभापतिपदाखालोखाल पद आहे. त्यामुळे तवडकर पक्षाकडे वरचे पद मागण्याऐवजी खालचे पद का मागतील असे त्यांच्या समर्थकांना वाटते. ∙∙∙
मंत्र्याला कामाच्या बदल्यात पैसे दिल्याचे जाहीरपणे सांगणारे व नंतर ते म्हणणे चुकीच्या माहितीवर होते असे घूमजाव करणारे माजी मंत्री पांडुरंग मडकईकर या मुद्यावर एकाकी पडल्याचे दिसते. भाजपच्या कोणत्याही नेत्याने त्यांच्या समर्थनार्थ एकही शब्द अलीकडे उच्चारलेला नाही. आता न्यायालयाची पायरी या संदर्भातील खटल्यासाठी चढावी लागणार असल्याने मडकईकर यांना एकाकी लढा द्यावा लागेल असे दिसते. कुंभारजुवेतील राजकारण कूस बदलणार आहे. सध्याचे आमदार राजेश फळदेसाई भाजपसोबत असले तरी २०२७ चा उमेदवार ठरण्यास बराच अवधी आहे. सिद्धेश नाईक यांनाही डावलणे भाजपला तसे शक्य होणार नाही. त्यामुळे मडकईकर हे भाजपसाठी किती उपयोगी पडतील या भाजपच्या अंदाजावरच या प्रकरणात भाजप त्यांना किती मदत करेल हे ठरणार आहे. तूर्त भाजपने यापासून अंतर राखल्याची चर्चा आहे.∙∙∙
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलावून घेतले तरी आपला समावेश मंत्रिमंडळात होईल की नाही याविषयी मायकल लोबोंना खात्री नाही. पत्नी व शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्या नावाचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो असे त्यांना वाटते. विधानसभा निवडणुकीला दीडेक वर्ष बाकी असताना जो कोणी मंत्री होईल त्याला पक्षासाठी भरपूर काम करावे लागेल याची लोबो यांना जाणीव आहे. त्याचमुळे ते या विषयावर अती सावधपणे बोलतात. मंत्रिमंडळ फेररचना विधानसभा अधिवेशनानंतर होणार असा अंदाज व्यक्त करतानाच त्यांनी आजवर शहा यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. कदाचित एक वर्ष ८ महिन्यांनी शहा यांनी दिल्लीला का बोलावून घेतले या प्रश्नाचे नीट उत्तर त्यांना मिळाले नसावे. ∙∙∙
मांद्रे मतदारसंघात मध्यंतरी मायकल लोबो आपल्या पुत्राला निवडणूक रिंगणात उतरवणार अशी चर्चा होती. त्याबाबत नंतर त्यांनी फारसे काही सांगितले नसले तरी मांद्रेचा विषय त्यांच्या डोक्यातून गेलेला नाही. अलीकडे ते मांद्रे मतदारसंघात एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिले होते. स्मशानभूमीकडे जाताना गुडघाभर चिखलातून जात उघड्या स्मशानभूमीत भर पावसात मृतदेहास अग्नी कसा द्यावा लागतो हे त्यांनी पाहिले. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पहिले मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, शिक्षण राज्यमंत्री परत मुख्यमंत्री आदींनी केले. त्या मतदारसंघात गावागावांत साधी स्मशानाची चांगली सोय नसावी ही खंत त्यांना भेडसावत आहे. त्याचमुळे मांद्रेत आपल्याला लक्ष घाला अशी विनंती स्थानिक करत आहेत असे कारण त्यांनी पुढे करणे सुरू केले आहे. ∙∙∙
राजकीय हालचालींची, मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असली तरी सावर्डेचे आमदार गणेश गावकर निवांत आहेत. गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर गावकर यांना मंत्री करावे असे त्यांच्या समर्थकांना वाटते. मध्यंतरी या मागणीच्या समर्थनार्थ सावर्डे मतदारसंघातील सरपंच, पंचांनी थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी योग्यवेळी विचार करू असे सांगून मुख्यमंत्र्यांनीच प्रश्न निकाली काढला होता. आता त्यांचे समर्थक गावकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या असे सांगू लागले आहेत. गोवा लोकसेवा आयोगाची परीक्षा त्यांनी तरुणपणी उत्तीर्ण केली होती. यावरून त्यांची हुशारी लक्षात येते. ते स्वतःहून सध्या कोणतीही राजकीय हालचाल करत नसल्याने त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याची वेगळी राजकीय चर्चा आहे. ∙∙∙
कार्यक्रम कोणताही असो, माजी मंत्री गोविंद गावडे वेळेपूर्वीच हजर असतात. कोणालाही ताटकळत ठेवत नाहीत, हा त्यांचा एक चांगला गुण आहे, अशी चर्चा संगीतप्रेमींत सुरू होती, पण गोविंद येऊनसुद्धा कार्यक्रमाचे उद्घाटन एक तास रखडले, इतर मंत्री, आमदार आलेच नाहीत. त्यामुळे गावडेंच्या हस्ते अखेर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि भारत बलवल्ली यांची मैफलही उशिरा सुरू झाली. त्यामुळे आयोजनातील ढिसाळपणाबाबतची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती. माशेल पंचक्रोशीत चिखलकाला महोत्सवाची माहिती देणारे फलक लावण्यात आले, त्यात प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार गणेश गावकर, पर्यटन सचिव संजीव अहुजा येणार असल्याची चर्चा होती. पण गोविंदाशिवाय कोणीच आले नाहीत. पावसाचा परिणाम की चिखलाची भीती हे काहीच कळले नाही. या मान्यवरांचे दर्शन फक्त फलकावरच झाले! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.