चंद्रावर जायचे कशासाठी?  Dainik Gomantak
गोवा

Chandryan 3 चंद्रावर जायचे कशासाठी?

नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव. बरोबर 54 वर्षांपूर्वी चांद्रभूमीवर त्याचा उमटलेला पायाचा ठसा अजूनही तसाच आहे

दैनिक गोमन्तक

नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव. बरोबर 54 वर्षांपूर्वी चांद्रभूमीवर त्याचा उमटलेला पायाचा ठसा अजूनही तसाच आहे... कारण पृथ्वीप्रमाणे वातावरण चंद्रावर नाही. त्यामुळे तेथील पृष्ठभाग लाखो वर्षे कोणत्याही बदलाशिवाय राहू शकतो. त्यामुळे भूवैज्ञानिकदृष्ट्या संपूर्ण चंद्र हा ‘कालकुपी’ ठरला आहे.

सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळात, सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी अनेक धूमकेतू आणि महाकाय उल्कांचा पृथ्वीसह अनेक ग्रहांवर अत्यंत वेगाने वर्षाव झाला. या वर्षावामुळे निर्माण झालेल्या बहुतांश दऱ्या आता दिसूनही येत नाहीत. याचे कारण म्हणजे वारा, पाणी यामुळे पृष्ठभागाची झालेली झीज परंतु, चंद्रावर अशी कोणतीच प्रक्रिया न झाल्याने तेथील पृष्ठभाग अब्जावधी वर्षांपासून आहे तसाच आहे.

भडीमाराच्या याच कालावधीत पृथ्वीवर जीवसृष्टीची सुरुवात झाली असे म्हटले जाते. पृथ्वीवर आदळलेल्या महाकाय उल्का आणि धूमकेतूंद्वारेच पृथ्वीवर पाणी आणि इतर जैविक घटक येथे आले असावेत, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सूर्यमाला तयार होत असताना नेमके काय घडले असावे, याचा अंदाज घ्यायचा असेल तर चांद्रभूमीचा, तेथील दऱ्या-डोंगरांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

सूर्यमालेतील मंगळ, बुध आणि इतर ग्रहांवरील चंद्रावरील वैशिष्ट्यांच्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी चंद्राचा उपयोग संदर्भाप्रमाणे शास्त्रज्ञ करतात. पृथ्वी अथवा शुक्राप्रमाणे तेथील भूगर्भात मोठ्या घडामोडी घडल्याची नोंद नाही. म्हणजेच चंद्राच्या गर्भातील रचना अब्जावधी वर्षांपासून तशीच असू शकते.

चंद्राच्या कायम प्रकाशात नसणाऱ्या किंवा त्याच्या ध्रुवीय प्रदेशातील भागाचा अभ्यास केला, तर तेथील आवरण कसे आहे, कशाने बनलेले आहे आदी गोष्टींची माहिती मिळू शकते. चंद्राच्या ध्रुवीय भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचा शोध भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने लावला आहे. यासाठी अर्थात कारणीभूत ठरली ती ‘चांद्रयान-१’ने पाठविलेली छायाचित्रे. भविष्यातील मानवी मोहिमांच्यावेळी या भागातून पिण्यायोग्य पाणी, श्वासोच्छवासासाठी प्राणवायू आणि यानांसाठीचे इंधन मिळविले तर आश्चर्य वाटायला नको.

अंतराळात दीर्घकाळ राहायचे असेल तर अवकाशातील किरणांचे उत्सर्जन आणि सूक्ष्म उल्कापाताचा अवकाशवीरांवर काय परिणाम होतो, हे पाहायचे असेल तर चंद्रासारखी दुसरी प्रयोगशाळा नाही. आपण ज्यावेळी मंगळ आणि इतर ग्रहांच्या मोहिमांचा विचार करतो, त्यावेळी या प्रयोगांचे महत्त्व अधिक वाढते.

अमेरिकेच्या अपोलो मोहिमांतून १९६९ ते १९७२ या कालावधीत १२ अवकाशवीर चंद्रावर उतरले. या सर्वांनी मिळून ३८२ किलो एवढी माती तेथून पृथ्वीवर आणली. तर सोव्हिएट रशियाने १९७० ते १९७६ या कालावधीत यांत्रिक हातांद्वारे ३०० ग्रॅम माती पृथ्वीवर आणली. या मातीचे विश्लेषण इतक्या वर्षांत करून झाले आहे. त्यातून भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या साम्य शोधण्याचा प्रयत्न केला गेला. ही माहिती फारच तुटपुंजी असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

चंद्रावरील असा बराच भाग आहे, जेथपर्यंत याने अजून पोहोचू शकलेली नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाची फारच थोडी माहिती मिळू शकली आहे. या भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे भारताच्याच चांद्रयानाने शोधून काढले आहे. अमेरिकेच्या `नासा`नेही त्याची पुष्टी केली आहे.

हे पाणी खोल दऱ्यांच्या भागात भूपृष्ठाखाली खूप खोलवर आहे. नासाने आपल्या पुढच्या मोहिमेसाठी चंद्रावर उतरण्याच्या संभाव्य १३ जागा निवडल्या आहेत. त्या सर्व दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशातील आहेत. आर्टिमिस ३ यान अवकाशवीरांसह या १३ पैकीच एका जागेवर उतरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दशकांमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झाला असला तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या भागात, उणे दीडशे अंशांहूनही अधिक असलेल्या तापमानात, अवकाश यानांनी आणि त्यावरील उपकरणांनी तग धरून राहणे हीही मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे.

कितीही अत्याधुनिक उपकरणे पाठविली गेली, तरी उपकरणांनी नमुने गोळा करणे व मानवाने प्रत्यक्ष तेथे जाऊन नमुने गोळा करणे यात फरक राहणारच. हेही मानवी चांद्रमोहिमांचे एक कारण आहे.

अवकाशातील उड्डाण तळ

सूर्यमालेतील इतर ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी उड्डाण तळ म्हणूनही चांद्रभूमीचा वापर भविष्यात होऊ शकेल. पृथ्वीपासून चंद्र जेवढ्या अंतरावर आहे, त्यापेक्षा किमान दोनशेपट अंतरावर मंगळ आहे.

त्यामुळे मंगळावर माणूस पाठवायचा तर अनेक मोठी आव्हाने आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर विविध किरणांच्या उत्सर्जनापासून मानवाचा बचाव करण्याचे देता येईल. मंगळावर जाण्यासाठी `लाँच विंडो` साधारणतः दोन वर्षांतून एकदाच उपलब्ध होऊ शकते.

अर्थात पृथ्वीच्या जवळ मंगळ असतो, तेव्हाच यान पाठविणे योग्य ठरते. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी मानवाला मंगळावर पाठविण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत चंद्राचा वापर मंगळासाठीचा प्रक्षेपण तळ म्हणून करता येऊ शकेल का याचीही चाचपणी विविध देशांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT