

Amit Patkar Criticizes Sawant Government: गोव्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांवरुन आता राजकीय वातावरण तापले आहे. सातत्याने होणारे दरोडे, खुनाचे प्रकार आणि दिवसाढवळ्या होणारे हल्ले यामुळे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या शक्यतेवर बोलताना पाटकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
पाटकर यांनी गोव्यात नुकत्याच घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनांचा क्रम मांडला. गेल्या काही महिन्यांत दोन मोठ्या दरोड्याच्या घटना घडल्या. दिवसाढवळ्या एका कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नावेली येथे एका तरुणावर झालेल्या हल्ल्याची घटना. साळीगाव येथे दुहेरी खुनाची धक्कादायक घटना. बायणा येथे दरोडा आणि सांताक्रुझ येथे घरफोडीच्या आणखी दोन गंभीर घटना घडल्या.
पाटकर म्हणाले, "गोव्यातील ही गुन्हेगारीची वाढती मालिका अत्यंत धोकादायक आहे. हे गंभीर गुन्हे दर्शवतात की, गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नाही."
गोव्यात सध्या पर्यटनाचा महत्त्वाचा काळ सुरु आहे. अनेक सण आणि उत्सव जवळ येत असताना गुन्हेगारी वाढत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. पाटकर म्हणाले की, ही वाढती गुन्हेगारी केवळ स्थानिक समस्या नाही, तर यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी चिंता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गोवा हे एक सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. जर अशा घटना सातत्याने घडत राहिल्या, तर गोव्याची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा धोक्यात येईल.
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू करण्याच्या पर्यायाबद्दल बोलताना अमित पाटकर यांनी भाजप सरकारवर थेट हल्ला चढवला. पाटकर म्हणाले, "केवळ राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याने ही समस्या सुटणार नाही. कारण हा कायदा शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांशी निगडीत आहे." "जेव्हा सरकारला NSA लागू करण्याची वेळ येते, तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे की, राज्याची संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे," असे पाटकर म्हणाले.
NSA लागू करणे हे सरकारचे अपयश दर्शवते. सरकारने गुन्हेगारी थांबवण्यासाठी मूलभूत पोलिसिंग, गुप्तचर यंत्रणा मजबूत करणे आणि आवश्यक मनुष्यबळ पुरवणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली. पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची जबाबदारी असल्याचे नमूद केले आणि गोव्यातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली. काँग्रेस पक्ष लवकरच या गंभीर परिस्थितीवर पुढील कृती आराखडा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.