Khari Kujbuj  Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: उशिरा सुचलेले शहाणपण

गोमन्तक डिजिटल टीम

उशिरा सुचलेले शहाणपण

पक्षबदलू आमदारांना पुन्हा पक्षात घेतले जाणार नाही असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक आहे, पण खरेच त्याची अंमलबजावणी होईल का? अशी शंका काँग्रेसवालेच आता घेऊ लागले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे १९८५ नंतर अशाप्रकारे पक्ष सोडून गेलेल्यांना नंतर पक्षाने परत घेतले. एवढेच नव्हे, तर त्यांना मानाची पदे दिली व त्यातूनच आजची स्थिती ओढवली आहे. युरीबाबाचे काका असलेले चर्चिल आलेमाव यांचे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे असल्याचे ते म्हणतात. त्यांच्यासारख्या अनेकांनी पक्षाचा उपयोग केवळ आपले स्थान बळकट करण्यासाठी केला व त्यामुळेच पक्षात नंतर बेशिस्त माजली. २०२२ मधील निवडणुकीनंतर पक्षातून जे घाऊक पक्षांतर झाले ते अशाच कारणांमुळे. त्यावर कायमची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आता आली आहे. एकप्रकारे पक्षाला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, पण खरेच त्याची अंमलबजावणी होईल की शेवटच्या क्षणी पाय मागे घेतला जाईल अशी विचारणाही होत आहे. ∙∙∙

मंत्रिमंडळ बदल पुन्हा ऐरणीवर

गोव्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार. काही मंत्र्यांना डच्चू देऊन काही आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल असे गेले दोन महिने ऐकू येत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला. कुणाला डच्चू द्यायचा, कुणाची वर्णी लावावी याबद्दलचा माहोल तयार करण्यासाठी राजकीय पटलावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेतच. गणेश चतुर्थीनंतर मंत्रिमंडळात बदल होणार असे ठरले होते. मात्र, खरी वस्तुस्थिती वेगळी आहे असे बोलले जाते. १८ सप्टेंबरला पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस मंत्रिमंडळ बदल होणार नाही असे बोलले जाते. त्यातच मंत्री विश्र्वजीत राणे हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आले आहेत व त्यांनी मंत्रिमंडळ बदलाला खो घातला आहे अशाही बातम्या आहेत. खरे खोटे देव जाणे. ∙∙∙

‘स्मार्ट सिटी’तील घोटाळे

स्मार्ट सिटी योजनेखाली पणजीतील विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तेव्हापासून या कामांवरून घोटाळेबाजी सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले तत्कालीन अधिकारी स्वयंदिप्ता पाल यांच्याविरुद्ध लाखोंच्या घोटाळाप्रकरणी दक्षता खात्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्या काळात त्यांच्यासोबत असलेल्या काही राजकारण्यांचेही धाबे दणाणले आहेत. पाल यांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाल यांची चौकशी सुरू झाल्यावर त्याकाळी असलेल्या काही राजकारण्यांची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पणजी शहरात सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसाठी पुढाकार घेतलेल्या त्या राजकारण्याच्या पायाखालील जमीन सरकू लागली आहे. पाल जितके या घोटाळ्याला जबाबदार आहेत, तेवढेच त्या काळात त्यांच्यासोबत सल्ला देणारे हे राजकारणी अडचणीत येऊ शकतात. पणजी स्मार्ट सिटी घोटाळाप्रकरणी जरी पाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला, तरी त्यामधून जशी चौकशी पुढे जाईल तशी अनेकांची नावेही पुढे येतील हे नक्की. ∙∙∙

कुटबण जेटी कॉलरा बळींचे केंद्र का?

‘कोंबडं झाकलं म्हणजे दिवस उजाडायचा राहत नाही’ अशी एक म्हण आहे. कुटबण भागात कॉलरा पसरला व सुमार दोनशे मच्छीमार कामगार कॉलराचे बाधित झाले. सहा मच्छीमार कामगारांना आपला जीव गमावावा लागला. या सगळ्या गैर कारभारास जबाबदार असलेले मच्छीमार खाते, आरोग्य खाते, पर्यावरण खाते आपली जबाबदारी झटकून एक दुसऱ्यावर दोष ढकलण्याचा प्रयत्न करायला लागले आहेत. मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ म्हणतात, जेटीवर सगळ्या व्यवस्था आहेत. असे आहे तर मग मुख्यमंत्र्यांनी जो गैर कारभार पाहिला ते काय होते? पर्यावरणमंत्री आता लोक मेल्यावर जागे झाले आहेत. जेटीला टाळे ठोकण्याचा इशारा देत आहेत. आलेक्स बाब इशारा काय देताय? कृती करा, असेच आता लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙

सुदिनरावांचे आव्हान!

राज्यातील रस्ता प्रकरण भलतेच तापले आहे. नव्यानेच निवडून आलेल्या खासदार विरियातो फर्नांडिस यांनी रस्ता कामात आमदार कमिशन घेतात, असा जाहीर आरोप केल्याने तो पूर्वीचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या जिव्हारी लागला आहे. मुख्यमंत्री केवळ इशारा देऊन थांबले, पण त्याही पुढे जाऊन सुदिनरावांनी चक्क विरियातोंना असे पैसे घेणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करा असे आव्हानच दिले आहे. एखादे सरकारी काम करायला बऱ्याचदा कंत्राटदारांना आधी पैसेही द्यावे लागतात, नंतर ते ‘रिकव्हर'' होतात, पण आधी खर्च करावे लागतात, असे सुदिनराव म्हणाले. शेवटी जो राजकारणात राहतो ना, त्यालाच त्याची दुखणी माहिती असतात. बरोबर ना..! ∙∙∙

विरियातोंनी लोकांची मने जिंकली

गणेश दर्शनाकरता फोंड्यात आलेल्या खासदार विरियातो फर्नांडिस हे पहिल्या भेटीतच लोकांवर आपला प्रभाव सोडून गेले. फोंडा बाजारातील बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या गणेश दर्शनावेळी तर अनेकांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचला आणि कॅप्टननीही त्यांचे सर्व म्हणणे ऐकून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जाता जाता फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांना आपण या समस्या गांभीर्याने घेतल्या पाहिजे हे सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे राजेशही ‘चार्ज’ झाल्यासारखे वाटले. एकंदरीत ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले याप्रमाणे खासदार लोकांची मने जिंकून गेले एवढे खरे. म्हणूनच तर ते गेल्यानंतरही मंडपात बराच वेळ लोकांत त्यांचीच चर्चा सुरू होती. ∙∙∙

लोकशाही की राष्ट्रपती राजवट?

विरोधी पक्षनेते युरीबाब सध्या समाज माध्यमांवर फार्मात आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनानिमित्त युरीबाबनी समाज माध्यमांवर एक पोस्ट प्रसारित केली. लोकशाही हक्कांचा संदेश देणाऱ्या या पोस्टमधून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावरही भाष्य केले, परंतु या पोस्टमध्ये छायाचित्र मात्र राष्ट्रपती भवनाचे वापरल्याने युरीबाब राष्ट्रपती राजवटीची लोकशाही आणू पाहतात का? असा प्रश्न अनेकांना पडला. काय बरे हे! ∙∙∙

काँग्रेसवाले तेव्हा कुठे होते?

दोन वर्षांपूर्वी १४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसच्या आठ आमदारांनी गद्दारी करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचे दुःख व त्या गद्दारांचा निषेध काँग्रेस पक्ष सध्या करीत आहे. ज्या दिगंबर कामत यांना ते प्रमुख गद्दार म्हणून मानतात त्याच दिगंबरांनी २००५ साली भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार कोसळले होते. यावेळी काँग्रेस विरोधी पक्ष असल्याने सरकार कोसळण्याची पाळी पक्षावर आली नाही. त्याच दिगंबरना नंतर पाच वर्षे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदी आरूढ केले. तेव्हा दिगंबर कोण होते. तेव्हा ते गद्दार नव्हते का? हे राजकारण आहे. राजकारणात कोणीही कोणाचा मित्रही नसतो व वैरीही नसतो. जे तीन आमदार काँग्रेसकडे आहेत. ते पक्ष बदलणार नाहीत कशावरून? पक्षांतर हे सर्वच पक्षांचे नेते आपल्या सोयीप्रमाणे करीत असतात. सध्या लोकशाहीची हीच तर थट्टा सुरू आहे, असे लोक बोलू लागले आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT