Goa Ferryboat Accident, Dhavji Ferryboat Accident  Dainik Gomantak
गोवा

Dhavaji Ferryboat: गोव्यात पुन्हा थरार! धावजी येथे इंजिन बंद पडून फेरीबोट भरकटली; मोठा अपघात टळला

Dhavji Ferryboat Accident: डण येथे फेरीबोट नांगरून ठेवलेल्या ठिकाणीच बुडाल्याच्या घटनेला ४८ तास उलटण्याच्या आत आज टोलटो-धावजी जलमार्गावरील फेरीबोटीचे इंजिन बंद पडले.

Sameer Panditrao

खांडोळा: चोडण येथे फेरीबोट नांगरून ठेवलेल्या ठिकाणीच बुडाल्याच्या घटनेला ४८ तास उलटण्याच्या आत आज टोलटो-धावजी जलमार्गावरील फेरीबोटीचे इंजिन बंद पडले आणि ती मांडवीत भरकटली. त्या फेरीबोटीला बार्जची धडक बसणार होती. मात्र, लोकांनी केलेल्या आरडाओरडीमुळे ती टळली. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

या घटनेमुळे राज्यभरातील जलमार्गावर फेरीबोटीतून दररोज प्रवास करणाऱ्या तिसेक हजार प्रवाशांत घबराटीचे वातावरण आहे. टोलटो धक्क्यावरून सकाळी १० वाजता ‘मुरगाव’ ही फेरीबोट सुटली आणि धावजी येथे फेरीधक्याला लावतेवेळी फेरीबोटीचे इंजिन अचानक बंद पडल्याने ती कुंभारजुवेच्या बाजूने प्रवाहाबरोबर वाहू लागली. हे सर्व अचानक घडल्याने फेरीबोटीतील कर्मचारी आणि फेरीबोटीत दुचाकीसह असलेल्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान ओळखून कर्मचाऱ्यांनी नांगर टाकला.

धावजी येथे धक्क्याला लावतेवेळी ‘मुरगाव’ या फेरीबोटीचे इंजीन अचानक बंद पडल्याने ती कुंभारजुवेच्या बाजूने प्रवाहाबरोबर वाहू लागली. त्याचवेळी खनिज वाहतूक करणारी बार्ज मुरगाव बंदरात जाण्यासाठी निघाली होती. त्या बार्जची या फेरीबोटीला धडक बसणे ठरून गेलेले होते. ते पाहून किनाऱ्यावर असलेल्या नागरिकांनी मोठ्याने आरडाओरड करून ‘बार्ज थांबवा’ असे सांगितले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बार्जचालक सावध झाला. मात्र, भरतीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे बार्ज एका जागी थांबवणे शक्य होत नव्हते.

अखेरीस बार्जच्या चालकाने किनाऱ्यालगत असलेल्या पाणथळ भागाकडे बार्ज वळवली. त्यावेळी उथळ पाण्यातील झुडूपे मोडत फेरीबोटीजवळून ती बार्ज गेली. तो थरार फेरीबोटीतील सर्वांनी अनुभवला.

असे करताना एक वृक्ष तुटून बार्जमध्येही पडला. बार्ज निघून गेल्यानंतर अर्ध्या तासाने नदी परिवहन खात्याने सुटकेसाठी जुने गोवे येथून पाठवलेली दुसरी फेरीबोट पोचली. त्या फेरीबोटीला इंजीन बंद पडलेली फेरीबोट दोरखंडाने बांधून धक्क्यावर आणण्यात आली. बंद पडलेली फेरीबोट अखेर दुपारी ४ वाजता दुरुस्त होऊन कार्यरत झाली. तोपर्यंत दुसरी फेरीबोट प्रवाशांना ने-आण करीत होती.

दुसऱ्या बोटीच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता

मिळालेल्या माहितीनुसार, टोलटो- धावजी या जलमार्गावरील ‘मुरगाव’ या फेरीबोटीचे इंजिन वारंवार नादुरुस्त होत असे. म्हणून या जलमार्गावर दुसरी फेरीबोट पाठवा, असे कर्मचाऱ्यांनी नदी परिवहन खात्याला याआधीच कळविले होते. त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज इंजिनच बंद पडून ही फेरीबोट भरकटली.

मंत्र्यांकडून खात्याचा अवमान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, खुद्द मंत्र्यांनी विधान केले आहे की, माझ्याकडे चिल्लर खाते दिले आहे आणि ते मी सांभाळतो. ही वागणूकच दुर्लक्षिततेचे द्योतक आहे. रोज जवळपास ३० हजार लोक फेरीबोटीतून प्रवास करत आहेत आणि त्यांना ‘चिल्लर’ असे मंत्र्यांनी संबोधणे अयोग्य आहे. त्यामुळे लोकांनी आपण कोण आहोत याचा विचार करावा, असे देखील त्यांनी सुचविले.

संचालकांना येत होते फोनवर फोन

पत्रकारांशी संवाद साधताना पाटकर म्हणाले, जो प्रकार घडला तो अतिशय गंभीर असून सरकार त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही संचालकांसमोर बसलो असताना संचालकांना दोन वेळा फोन आला आणि ते सतत ‘सर सर’ म्हणत होते. तो फोन मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांचा असावा, असा दावा पाटकर यांनी केला.

एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न

अलीकडेच चोडण येथे घडलेल्या फेरीबोट दुर्घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सरकार या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे नदी जलवाहतूक खात्यावर मोर्चा नेण्यात येईल. आज नदी परिवहन खात्याच्या संचालकांची भेट घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पाटकर म्हणाले की, नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह भोसले यांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण १८ फेरी पॉईंट असून ३० फेरीबोटी सध्या कार्यरत आहेत. काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी चार फेरीबोट्स चालतात. दररोज सुमारे ३० हजार लोक या फेरीबोट सेवेचा वापर करतात. हे हजारो प्रवासी काय चिल्लर आहेत का? सरकार त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का, याचा पुन्हा एकदा गोमंतकीयांनी विचार करावा, असे आवाहन पाटकर यांनी केले.

सतर्कतेचा इशारा

पाटकर यांनी सांगितले की, आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. यापुढे जर लोकांना हानी पोहोचली, तर त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकू. या संपूर्ण प्रकरणावरून सरकारच्या प्रशासनिक यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर आला असून, जनतेत याबाबत तीव्र नाराजी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT