Kerala Youth Sahil V.S. Donates Organs: मरावे परी किर्ती रुपे उरावे अशीच काहीशी प्रचिशी मंगळवारी (4 फेब्रुवारी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आली. केरळमधील 22 वर्षीय साहील व्ही. एस. या तरुणाने मृत्यूनंतर अवयवदान करुन अनेकांना नवजीवन दिले. 2025 मधील गोव्यातील हे तिसरे अवयवदान असल्याचे सांगितले जात आहे.
साहिल हा मोपा विमानतळावर (Mopa Airport) ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत होता. 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी (3 फेब्रुवारी) त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. साहीलच्या कुटुंबीयांनी दु:खाच्या क्षणी दाखवलेल्या धाडसाचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी कौतुक केले. 2025 मध्ये आतापर्यंत तीन अवयवदान झाले असून, त्यामुळे एकूण 11 रुग्णांना नवजीवन मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साहीलच्या अवयवदानातून दोन रुग्णांना मूत्रपिंड (किडनी) गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. या लाभार्थ्यांपैकी एक 33 वर्षीय पुरुष आणि दुसरा 24 वर्षीय पुरुष आहे. तसेच, त्याचे यकृत (लिव्हर) एमजीएम रुग्णालय, संभाजीनगर येथे प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील (Goa Medical College) न्यूरोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सनत भाटकर आणि जनरल मेडिसिन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. मरीना वाझ यांनी ब्रेन-स्टेम मृत्यू प्रमाणित केला.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने साहीलचे पार्थिव केरळमधील त्याच्या मूळ गावी अंतिम संस्कारासाठी पाठवण्याची व्यवस्था केली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सर्व नागरिकांना अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरुन अधिकाधिक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकेल. सोट्टो गोवाच्या सहकार्याने हे अवयवदान यशस्वीपणे पार पडले. यासाठी गोवा वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला, ज्यामुळे अवयव वेळेत आणि सुरक्षितरित्या निर्धारित ठिकाणी पोहोचवण्यात आले.
यावर्षी, गोव्यात झालेल्या अवयवदानांपैकी ही तिसरी केस आहे. पहिले अवयवदान म्हापसा बसस्थानकाजवळ अपघातग्रस्त रुग्णाचे झाले होते, ज्याच्या जवळपास सर्व अवयवांचा उपयोग करण्यात आला. दुसरे अवयवदान मणिपाल येथील एका कर्मचाऱ्याचे झाले असून, त्याच्या किडनी आणि यकृताचा उपयोग करण्यात आला.
सोट्टो गोवा 2019 पासून कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत 16 मूत्रपिंड, 4 हृदये, 7 यकृत आणि 2 फुफ्फुसे गरजू रुग्णांसाठी रोट्टो (Regional Organ & Tissue Transplant Organization) व नोट्टो (National Organ & Tissue Transplant Organization) च्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.