मडगाव : गोव्यात वास्तव्य करून राहणारे 40 हजारांपेक्षा अधिक कर्नाटकचे मतदार मतदान करण्यासाठी आपल्या राज्यात गेल्याची घटना वरवर साधी वाटत असली, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणातील कर्नाटकचे हे मतदार गोव्यात कसे हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असून या मतदारांचे गोव्यात आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत ते मतदार नसावेत ना अशी शंका राज्यभर उपस्थित केली जात आहे.
गोवा सरकारच्या भरपगारी सुट्टीच्या निर्णयाने आता अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून समाज माध्यमांवरही हा चर्चेचा विषय बनला आहे. बिर्ला वास्को आणि मडगाव अशा दोन ठिकाणी काल रात्री उशिरापर्यंत हे लोक रस्त्यावर बसची वाट पाहात उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. रात्री काही बसगाड्या वास्कोहून मडगावात न येताच परस्पर फोंडामार्गे निघून गेल्याने काल मडगाव बसस्थानकावर कर्नाटकात जाणारी बस अडवून धरण्याचा प्रकार घडला.
आज सकाळी कारवार येथे जाण्यासाठीही लोकांनी मडगाव बसस्थानकावर गर्दी केली होती. मतदान केल्यास एका मतास 5 हजार रुपये दिले जातील असे आश्वासन मिळाल्याने मतदारांनी कर्नाटकात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात धाव घेतल्याचे समजते.
नागरिक कायदा 1950 नुसार कुठलीही व्यक्ती सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ आपल्या मूळ पत्त्यावर नसल्यास त्याचे नाव त्या मतदार यादीतून आपोआप गाळले जाते आणि नवीन वास्तव्याच्या पत्त्यावर त्याला मतदान करता येते.
कुठलीही व्यक्ती सहा महिन्याच्या कालावधीपेक्षा अधिक काळ त्या पत्त्यावर नसल्यास त्या भागातील बीएलओ तसा अहवाल प्रशासनाला देऊन या मतदाराची नावे मतदार यादीतून गाळणे आवश्यक असते. मात्र, या प्रक्रियेकडे कित्येकवेळा जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते, असे ॲड. आल्मेदा म्हणाले.
‘दुहेरी मतदारांची मतदान कार्डे रद्द करावी’
दोन राज्यांत मतदान करणाऱ्या मतदारांच्या मुद्यावर यापूर्वी आरजी पक्षाने आवाज उठविला होता. गोव्यात असे 50 हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत असा दावा यापूर्वी या पक्षाने केला होता. कर्नाटकात गोव्यातून मोठ्या संख्येने गेलेल्या मतदारांनी आमच्या या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केले, अशी प्रतिक्रीया आरजीचे दक्षिण गोवा उपाध्यक्ष तिओतिनो कॉस्ता यांनी व्यक्त केली. अशा दुहेरी मतदारांची छाननी करून त्यांची मतदान कार्डे रद्द करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गोव्यात कर्नाटक राज्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदार असणे ही अविश्वसनीय अशी बाब आहे. कदाचित या मतदारांची दोन्हीकडे मतदार यादीत नावे असावीत, त्यामुळेच ही संख्या एवढी फुगली असावी.
ॲड. क्लीओफात आल्मेदा कुतिन्हो
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.