Karmal Ghat Road Widening
काणकोण: बेंदुर्डे ते चाररस्तापर्यंतच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला पर्यावरणाच्या नावाखाली होणारा विरोध मोडून काढण्यासाठी काही नागरिक पुढे सरसावले आहेत. या घाटमार्गात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी चौपदरी रस्ता आवश्यक असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे.
बेंदुर्डे ते चाररस्तापर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन संपादनासाठी ७५.४६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन टप्प्यात भूसंपादन पूर्ण करण्याची सूचना केंद्रीय रस्ता मंत्रालयाने राज्य सरकारला केली आहे. या रस्त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. सध्या असलेल्या रस्त्याचेच रुंदीकरण करण्यात येणार आहे.
त्यासाठी करमलघाटातील चार हजारपेक्षा जास्त झाडे हटवावी लागणार आहेत, त्यामुळे काही पर्यावरणप्रेमींनी हरित लवादाकडे या विरोधात दाद मागितली होती. लवादाने झाडांवरील संकट टाळण्यासाठी भुयारी मार्ग काढण्याचा पर्याय सुचवला होता.
मात्र हा पर्याय जास्त खर्चिक तसेच करमलघाट भुयारी मार्गासाठी योग्य नसल्याने सध्याच्या महामार्गाचे रुंदीकरण करून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे निश्चित झाले आहे. परंतु झाडांची कत्तल व वन्यप्राण्यांच्या विहारात बाधा येणार असल्याने चौपदरीकरणाला पर्यावरणप्रेमी विरोध करीत आहेत.
दरम्यान, हा विरोध मोडून काढण्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी समविचारी नागरिकांच्या बैठका घेण्यात येत आहेत, असे काणकोणचे नगरसेवक धिरज नाईक गावकर यांनी सांगितले.
याबाबत निवृत्त मुख्याध्यापक तथा कोकण रेल्वेच्या समर्थनार्थ उभारलेल्या आंदोलनात सक्रिय पुढाकार घेतलेले शांताजी नाईक गावकर यांना विचारले असता, त्यावेळी याच प्रवृत्तीच्या लोकांनी कोकण रेल्वेला विरोध केला होता. आता करमलघाटातील चारपदरी रस्त्याला विरोध खपवून घेण्यात येणार नाही. या धोकादायक रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत.
करमल घाटातील धोकादायक रस्त्यामुळे आजपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या या रस्त्यावरील वाहतुकीत वाढ झाली आहे, वाहतुकीला रस्ता अुपरा पडत आहे. या रस्त्यावरील जीवित हानी टाळण्यासाठी चौपदरीकरण ही काळाची गरज आहे, असे माजी नगराध्यक्ष श्यामसुंदर नाईक देसाई यांनी सांगितले.
चारपदरी रस्त्यामुळे काही प्रमाणात वृक्ष तोड करावी लागणार आहे. मात्र सरकारने पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास श्रीस्थळ जैवविविधता समिती समविचारी नागरिकांच्या सहकार्याने नवीन वृक्ष लागवड करण्यास तयार असल्याचे जैवविविधता समितीचे सदस्य शिरिष पै यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.