पणजी: राजधानी पणजीत सुरू असलेली स्मार्ट सिटी बस सेवा सध्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वेळापत्रक असूनही बस वेळेवर येत नाही, अचानक मार्ग बदलले जातात आणि याची कोणतीही पूर्वसूचना प्रवाशांना दिली जात नाही. परिणामी, शाळा, नोकरी किंवा अन्य ठिकाणी वेळेत पोहोचवण्याचा प्रवाशांचा दिनक्रमच कोलमडतो आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, बसच्या वेळा आणि मार्ग स्पष्ट असले तरी प्रत्यक्षात ते पाळले जात नाहीत. आज मार्ग 'ए' आहे तर उद्या तो अचानक 'बी' होतो, कोणतीही सूचना न देता हे चालूच आहे. विशेषतः जे प्रवासी मासिक पास किंवा ट्रान्झिट कार्ड वापरतात, त्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. नियोजित वेळेत पोहोचवण्याचा त्यांचा हक्क या गोंधळामुळे धूसर झाला आहे.
ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांना अधिकच चिडवणारे ठरत आहे. ना वेळेचे पालन, ना सूचना देणे, ना ग्राहक सेवा, या साऱ्या त्रुटींमुळे प्रवासी अक्षरश: हताश झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेचा उद्देश सोपा, शिस्तबद्ध वाहतूक सेवा देणे होता; पण सध्याची स्थिती या उद्देशाला हरताळ फासणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी अल्पना केरकर यांनी दिली.
प्रवाशांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी कदंब महामंडळाचे अधिकारी फोन उचलत नाही. काही वेळा फोन 'बिझी' तर काही वेळा थेट 'नो रिस्पॉन्स'. आम्हाला वाटले की स्मार्ट सिटी बसने प्रवास सुलभ होईल, पण आता हीच सेवा आमच्या अडचणी वाढवत आहे, असे एका नियमित प्रवाशाने सांगितले.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू करण्यात आलेली ही सेवा सध्या नियोजनशून्य वाटत असून, प्रवाशांच्या दृष्टिकोनातून त्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा पूर्ण अभाव आहे. दोन वेळा मार्ग बदलल्याने मला कामावर उशीर झाला. माझ्याकडे कार्ड आहे, पण या सेवेमुळे आता माझे नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया एका प्रवासी महिलेने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.