Judge Saee Anil Prabhudessai  Dainik Gomantak
गोवा

Navratri 2023: अभ्यास आणि सचोटीवर नितांत श्रद्धा असलेल्या न्यायमूर्ती सई प्रभुदेसाई

दैनिक गोमन्तक

Judge Saee Anil Prabhudessai: अनेकदा नावाजलेले विधिज्ञ व वरिष्ठ कौन्सिलही कनिष्ठ न्यायालयांमध्ये हजेरी लावतात. त्यांच्यापुढे बसलेल्या वयाने व अनुभवाने कमी न्यायमूर्ती अनेकदा हडबडून जाऊ शकतात.

भारतातील अनेक कनिष्ठ न्यायालयांत असा अनुभव येतो. या न्यायालयांमध्ये काही संवेदनशील आणि राजकीय किनार असलेली प्रकरणेही उपस्थित होतात.

अशावेळी न्यायमूर्तींची कसोटी लागलेली असते. न्यायाची बाजू लंगडी पडता कामा नये, न्यायालयाची प्रतिष्ठा राखतानाच न्यायमूर्तींना अत्यंत प्रामाणिक व सचोटीने न्यायदान करावे लागते.

आता प्रसारमाध्यमेही न्यायालयीन निर्णयाचा सतत अर्थ लावत असतात. निकाल लागल्याबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू होते. समाजमाध्यमांतून बातम्या झळकतात

त्यामुळे न्यायमूर्तींना उच्च न्यायालय किंवा वरिष्ठांनाच तोंड द्यावे लागते, असे नव्हे, तर आपली छबी सांभाळत न्यायदानाची प्रतिष्ठा उंचावत राहील, याची खबरदारी घेणे आवश्‍यक बनले आहे.

न्यायाधिशांना नेहमीच चमकता येते, असे नाही; परंतु ते पवित्र कार्य आहे, असे समजून कार्य केले तर जनतेचा न्यायाप्रति आदर वाढण्यास मदत होते.

गोव्यात अलीकडे अनेक वादग्रस्त प्रकरणे घडली आहेत, त्यांच्याकडे सतत प्रसारमाध्यमांचे लक्ष लागलेले असते.

त्यामुळे जिल्हा न्यायालयापासून ते कनिष्ठ न्यायालयात काम करणाऱ्या न्यायमूर्तींची नावे प्रसारमाध्यमांत झळकतात आणि त्यांच्या कामांची प्रसंगी तारीफ होते, अनेकदा त्यांचे निर्णय वादग्रस्तही ठरतात, उच्च न्यायालयात त्यांच्या कामाची दखल घेतली जाते.

पणजीच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहणाऱ्या न्या. सई प्रभुदेसाई यांनी अत्यंत थोड्या कालावधीत आपली तडफदार आणि बुद्धिमान न्यायाधीश म्हणून प्रतिमा तयार केली आहे.

न्यायाधीशाचे प्रथम काम असते, समोरची व्यक्ती कितीही प्रभावी व्यक्ती असो आणि त्याने उभा केलेला वकील कितीही तरबेज असो, उपस्थित प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने व तेवढ्याच न्यायिकदृष्टीने बघणे. या सचोटीवर न्या. सई प्रभुदेसाई नेमक्या उतरतात व त्यांनी वकील वर्गातही आपला दरारा निर्माण केला आहे.

त्यांचे नुकतेच निवर्तलेले वडील डॉ. अनिल प्रभुदेसाई हे गोव्याचे माजी आमदार. त्यांच्याकडूनच आपल्याला व्यवसायनिष्ठेची प्रेरणा मिळाल्याचे त्या सांगतात. वडिलांना आपल्या मुलीने स्वतंत्र पेशा स्वीकारून त्यात आपला ठसा उमटवावा, असे वाटत असे.

त्यामुळे न्या. सईंनी एकतर वडिलांप्रमाणेच डॉक्टरी किंवा वकिली करावी, असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. न्या. सईंचे एक काका संजय हरी प्रभुदेसाई वकील. लहानपणापासून न्या. सईंना वकिली पेशा आवडत असल्याने त्या आपल्या काकांच्या कार्यालयात जाऊन बसत असत.

तेव्हापासून आपण न्यायाधीश होणार असल्याचे स्वप्न त्यांनी बाळगले होते. २००७ मध्ये ते स्वप्न पूर्ण झाले. सुरवातीला सात वर्षे वकिलीची प्रॅक्टिस केल्यानंतर दिवाणी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली व मे २०२३ मध्ये बढती मिळून त्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बनल्या आहेत.

न्यायाधीशाला समाजात सहज उठबस करता येत नाही. परंतु आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या न्या. सई प्रभुदेसाई लिलया पुऱ्या करतात. घरदार सांभाळताना त्यांनी सतत कायद्याचा अभ्यास चालविला आणि कोणत्याही प्रकरणात मुळाशी जाऊन अभ्यास करणे त्यांना आवडते.

वकिली पेशात खूप काम असते आणि रात्री उशिरापर्यंत जागून कायद्याचा कीस काढणारे वकील अनेक आहेत. तेवढाच अभ्यास न्यायाधिशांनाही करावा लागतो.

न्यायमूर्ती अभ्यास करून आल्या तर वकील त्यांची फिरकी घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे वकील कितीही नावाजलेला असला तरी त्याला निरुत्तर करण्याची ताकद न्यायमूर्तीमध्ये असावी लागते.

गोव्यातील न्यायालयामध्ये काम करणारे अनेक वकील सांगतात, न्यायमूर्ती सई प्रभुदेसाई या न्यायालयीन कामकाजात राहूनही स्वतंत्र अस्तित्व सांभाळून आहेत. गोव्यातील न्यायालयांमध्ये हजारो केसेस प्रलंबित आहेत.

आणि दैनंदिन कामे पुरी करताना त्यांचीही तारांबळ उडत असते. न्या. सई प्रभुदेसाई स्वतः अत्यंत शिस्तप्रिय आहेत. प्रकरणांचा अभ्यास करूनच न्यायालयात पाऊल ठेवावे, हा कटाक्ष त्या पाळतात. त्यामुळे न्यायदान करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची त्यांची प्रतिमा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT