म्हापसा: मागील काही दिवसांपासून, चोरट्यांनी राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जबरी चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांत मोठी वाढ होताना दिसत आहे. काबाडकष्ट करून जमा केलेली आयुष्यभराची पुंजी तसेच मौल्यवान वस्तूंवर चोरटे डल्ला मारत आहेत.
याबाबत नागरिकांनी सतर्कता तसेच वेळीच खबरदारी घेतल्यास, अशा धाडसी चोऱ्या रोखता येऊ शकतात. याचे उदाहरण म्हणजे, ओखा-एर्नाकुलम जेएन एक्सप्रेस १६३३७ या प्रवासी रेल्वेगाडीत दोघा तिकीट कलेक्टरांच्या सतर्कतेमुळे तसेच प्रवाशांनी दाखविलेल्या धाडसामुळे वरील रेल्वेत होणारी धाडसी चोरी रोखता आली. ही रेल्वे गुजरातहून, कोची-केरळच्या दिशेने जात होती.
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठ ते दहा चोरट्यांनी ओखा-एर्नाकुलम जेएन एक्सप्रेस १६३३७ ही रेल्वे लक्ष्य केली.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील विन्हेरे स्टेशनवर पहाटे २.३० वा.च्या सुमारास क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबली असताना, चोरट्यांनी काही बोगी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु रेल्वेमधील तिकीट कलेक्टरांनी प्रवाशांना अगोदरच सर्तक करुन ठेवले होते. परिणामी लोकांनी धाडस केल्याने वरील चोरांचा डाव फसला.
याविषयी तिकीट कलेक्टर महेश पेंडसे (५९) यांनी ‘गोमन्तक’ला माहिती दिली की, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे तीस ते चाळीस वयोगटातील बुरखाधारी चोरट्यांनी ओखा-एर्नाकुलम रेल्वेस लक्ष्य केले. विशेष म्हणजे या घटनेच्या आठवडाभरापूर्वी चोरट्यांनी याच रेल्वेला लक्ष्य करून दोन ते तीन बोगीमधून लोकांचे मोबाईल फोन, किमती वस्तू लंपास केले होते. त्यानुसार, आम्ही रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना आधीच सतर्क केले होते. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरटे पुन्हा लक्ष्य करू शकतात, असे प्रवाशांना सूचित केले होते. त्यानुसार सर्व बोगींच्या खिडक्या लावून घेतल्या. जेणेकरून बाहेरून कोणी प्रवाशांना हानी पोहोचवणार नाही तसेच दारे आतून बंद केली होती. याशिवाय सर्व प्रवासी जागेच होते.
रेल्वेगाडी क्रॉसिंगसाठी थांबली असताना आठ ते दहाजण बुरखाधारी चोरटे स्टेशननजीक आले. प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेने घनदाट जंगल असल्याने हे चोरटे काळोखाचा फायदा घेत होते. या चोरांपैकी काहींनी चेहऱ्याला काळे फासले होते, तर काहींनी मास्क परिधान केले होते. जेणेकरून संबंधितांची ओळख पटवता येऊ नये. सहसा चोरटे आठवडाभरात पुन्हा चोरी करत नसतात. तरीही आम्ही प्रवाशांना सतर्क करून, बोगींच्या खिडक्या व दारे आतून लावून घेतली होती. रेल्वेतील प्रवासी जागे असल्याची चाहूल चोरट्यांना लागल्याने हे चोरटे माघारी फिरले. त्यामुळे सर्वांची खबरदारी, सहकार्यामुळे चोरांचा प्रयत्न फसला, असे पेंडसे यांनी सांगितले. यावेळी रेल्वेत पेंडसे यांच्यासह त्यांचे सहकारी तिकिट कलेक्टर रामचरण मीना (५२) हेसुद्धा उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.