गोव्यात सध्या पर्यटक हंगाम जोरात सुरू आहे. राज्यात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत आहेत. वाढती उष्णता असल्याने परदेशी पर्यटक मुख्यत: समुद्रकिनाऱ्याला भेट देतात, आणि समुद्राच्या पाण्यात जलक्रीडेचा आनंद घेतात. पण, आयर्लंडमधील एक पर्यटक कोलवा येथे समुद्रात जलक्रीडा करायला गेला असता त्याच्यासोबत एक घटना घडली.
आयर्लंडमधील हा पर्यटक कोलवा येथे समुद्रात पोहायला गेला अन् त्याला जेली फिशने दंश केल्याची घटना घडली आहे. कोलवा समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांना जेली फिशचा दंश होण्याच्या घटना अलिकडे वाढल्या आहेत. अशात आणखी एक घटना समोर आली आहे.
राज्यात इतर ठिकाणी किनारी भागात जेली फिशचा दंश होण्याच्या घटना घडल्या आहेत. जेली फिशमुळे मासेमारीत देखील अडथळा येत असल्याच्या तक्रारी मच्छीमारांनी केल्या होत्या.
जेली फिशचा दंश अतिशय वेदनादायक असतो. जीवरक्षक यावर प्रथमोपचार देऊ शकत नाहीत. त्यामुळे दंश झाल्यानंतर काय करावे हे लोकांना कळत नाही. पण, कोमट पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण यावर फायदेशीर ठरते असे स्थानिक सांगतात.
तीन महिन्यांत 850 जणांना दंश
समुद्रकिनाऱ्यांवर जेलिफिश आढळण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. त्याशिवाय या जेलिफिशकडून मागील तीन महिन्यांत 850 जणांना दंश झाल्याची नोंद दृष्टी जीवरक्षक दलाकडे झाली आहे. जेलिफिश हा मासा सहजासहजी जास्त विषारी नसतो, परंतु त्याचा दंश माणसाच्या त्वचेवर खाज आणतो किंवा माणसाला चीडचीड आणणारा ठरतो.
मागील तीन महिन्यांत एकूण 850 जेलिफिशची प्रकरणे नोंदविली, त्यात 140 उत्तर गोव्यात आणि 710 दक्षिण गोव्यामध्ये घडली आहेत. उत्तर गोव्यात कळंगुट, बागा आणि सिकेरी येथे अनुक्रमे 60,60 आणि 20 असे जेलिफिश दंश झाल्याची नोंदणी आहे.
दक्षिण गोव्याच्या संदर्भात सर्वाधिक आकड्यांसोबत (225) बेताळभाटी या समुद्रतटावर जेलिफिशद्वारे चावल्याच्या घटना घडल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.