State Bank Theft : एटीएम समजून पासबूक प्रिटिंग मशीन चोरणाऱ्याला फोंडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे खांडेपार येथील स्टेट बँकेत आदल्या रात्री चोरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच बँकेतील एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी तो आला होता.
गौतमकुमार रंजनकुमार रे (29, रा. बिहार) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो सध्या खांडेपार येथेच चौगुले वर्कशॉपच्या मागे भाड्याच्या खोलीत राहतो. 10 एप्रिल रोजी ही चोरी झाली होती. संशयिताने स्टेट बँकेतून एटीएम मशीन समजून पासबूक प्रिंटर मशीन चोरून नेले होते. या मशीनची किंमत दीड लाख रुपये होती.
पोलिसांची कामगिरी
या चोरीचा छडा लावण्यासाठी फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी उपनिरीक्षक आदित्य वेळीप, हेडकॉन्स्टेबल केदार जल्मी व आदित्य नाईक यांच्या सहकार्याने तपास केला.
पेहराव, चपलेवरून पाेलिसांनी ओळखले
गौतमकुमार सोमवारी मध्यरात्री चोरी करून घरी गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा एकदा खांडेपार येथीलच त्या एटीएम कक्षात पैसे काढण्यासाठी आला. यावेळी तेथे उपस्थित फोंडा पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. सीसीटीव्हीत गौतमकुमारने आपला चेहरा झाकला होता. पण त्याचा पेहराव, देहबोली आणि पायातील चप्पल यामुळे पोलिसांना त्याला ओळखणे सोपे झाले. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.