पुरी, ओडिशातील १२ व्या शतकातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे, रत्नभांडारचे दरवाजे आज सुमारे ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले. खजिन्यातील दागिने व इतर मौल्यवान वस्तूंची यादी तसेच दुरुस्तीसाठी रत्नभांडार पुन्हा खुले केले. यापूर्वी, १९७८ मध्ये रत्नभांडार खुले केले होते.
याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आज सकाळी बारा वाजता मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर, धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी एक वाजून २८ मिनिटांनी रत्नभांडार उघडले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नभांडारचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आला होता.
रत्नभांडारच्या किल्ल्या गहाळ झाल्यावरुनही तेव्हा सत्तेवर असलेल्या बिजू जनता दलाला भाजपने लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे, ओडिशात सत्तेवर आल्यास खजिना पुन्हा उघडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले होते. या पार्श्वभूमीवर, आज रत्नभांडार खुले करण्यात आले.
या वेळी ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डी.बी. गडनायक आणि पुरीचे राजा गजपती महाराज यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाढी म्हणाले, की मंदिराचा खजिना पुन्हा उघडण्यात आला असला तरी मौल्यवान वस्तूंची यादी त्वरित केली जाणार नाही.
दागिन्यांसाठी विशेष पेट्या :
खजिन्यातील दागिने व मौल्यवान वस्तू लाकडाच्या तात्पुरत्या ‘स्ट्राँग रुम’मध्ये हलविल्या जातील. या खास बनविलेल्या पेट्यांची आतील बाजू पितळी असून त्यांची लांबी ४.५ फूट, उंची व रुंदी २.५ फूट इतकी आहे. या लाकडी पेट्यांच्या स्ट्राँग रुमसाठी सीसीटीव्हीसह इतर आवश्यक व्यवस्थाही करण्यात आली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.