

पणजी: गोव्यात नुकतीच जिल्हा पंचायतीची निवडणुक पार पडली. सत्ताधारी भाजपने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले. भाजपने 29 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. यातच आता गोव्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या समर्थित उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर यांची, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ गावस देसाई यांची निवड झाली.
उत्तर गोवा (North Goa) जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रेश्मा बांदोडकर यांनी बाजी मारली. त्यांची निवड होताच समर्थकांनी मोठा जल्लोष केला. त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष पदासाठी नामदेव च्यारी यांची निवड करण्यात आली. उत्तर गोव्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे नवीन नेतृत्व कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी सांगितले.
तसेच, दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा पंचायतीमध्येही भाजपने आपले वर्चस्व राखले. भाजपचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ गावस देसाई यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांच्या निवडीमुळे दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उपाध्यक्ष पदासाठी अंजली वेळीप यांची निवड करण्यात आली असून महिला प्रतिनिधीला मिळालेल्या या संधीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये नवीन अध्यक्षांची निवड झाल्यामुळे आता जिल्हा स्तरावरील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा पंचायतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.