गोवा: गोव्यातील खाणी गेली दहा वर्षे बंद आहेत. त्यामागील खरे कारण काय तेही सर्वांना चांगलेच माहीत आहे. तरीपण त्याकडे दुर्लक्ष करून वर्षभर तसेच ऐन निवडणुकीच्या काळात खाण अवलंबित व इतरांना भडकविण्याचे काम काही मंडळी पध्दतशीरपणे करत असतात. काही वेळा तर ती असे चित्र उभे करतात की खाणपट्ट्यात राज्यकर्त्यांना जबर हादरा बसणार, पण ताजा निवडणूक निकाल वेगळेच सांगत आहे. (Goa Mines News)
त्या लोकांना एकतर भाजपच ही समस्या सोडविल असे वाटते किंवा खाणी पूर्ववत सुरू होण्याची आशा त्यांनी सोडून दिली आहे, पण निवडणुकीत हा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला नाही एवढे खरे. कदाचित लोकांना खाणी चालून प्रदूषण वाढण्यापेक्षा त्या बंद असलेल्याच बऱ्या असे वाटत नसावे ना?
‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त
निवडणूक झाल्यानंतर सरकारने ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता निर्णय घेतला म्हणून फार नुकसान होणार नाही. कारण मतदान होऊन निकाल लागला आणि जर हाच सिनेमा भर निवडणूक काळात झळकला असता तर खरंच सरकार असंच वागलं असतं की बोटचेपे धोरण अवलंबून मत मिळविण्यासाठी मूग गिळून गप्प बसले असते असा सूर ऐकू येत आहे.
काही असो चांगला निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली असून अशाच प्रकारच्या अनेक गोष्टीचा सरकारने विचार करावा. कारण मतदान झाले म्हणून सिनेमा करमुक्त केला असा समज लोकांत पसरवू नये यासाठी भविष्यात अशाच गोष्टी घडल्या तरी सरकार जागृत राहणार की गळचेपी धोरण स्वीकारणार ते दिसून येईल.
पोलिस बजरंग दलाला घाबरते का?
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे पोस्टर आयनॉक्सच्या आवारात का लावले नाही या मुद्यावरून आयनॉक्स कर्मचाऱ्यांना धमकावणारा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तो बजरंग दलाचा नेता जयेश नाईक होता हे सर्वांना माहीत असूनही फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
त्यानंतर लगेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केला. हे सगळे पाहता पोलिस बजरंग दलाला घाबरते का असा सवाल निर्माण होतो. की आता भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे असले काहीही प्रकार केले तर ते चालतील असा संदेश त्यातून ते देऊ पाहत आहेत. काही कळत नाही बुवा!
चर्चिलचा कंपू भाजपच्या वाटेवर?
धर्मांध भाजपला रोखण्यासाठी मी तृणमूलमध्ये सामील झालो असे सांगत असलेल्या चर्चिल आलेमाव यांना आता पडल्यावर पुन्हा आपले जुने मित्र असलेल्या भाजपची आठवण येऊ लागल्याचे समजते. मागची 5 वर्षे फक्त भाजपचीच तळी उचलून धरणाऱ्या चर्चिल यांनी निवडणुकीच्यावेळी आपण भाजपविरोधी हे सोंग वठविले असले तरी आता पराभूत झाल्यावर आपले राजकीय इप्सित साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाला जवळ राहण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव बाणावलीच्या इर्मावला झाल्याने त्यांनी पुन्हा भाजपलाच मिठी मारायचे ठरविले आहे. सुरवातीला त्यांचे पाठीराखे भाजपात जाणार असून त्यानंतर स्वतः आलेमाव कमळाच्या तळ्यात जाणार आहेत. येत्या काही दिवसांत चर्चिल आलेमाव यांनी तृणमूलचा राजीनामा दिल्यास कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये बरे का!
माघारीचे दरवाजे बंद?
काँग्रेसमधून भाजपात गेलेल्यांना, काही अपवाद वगळल्यास मतदारांनी चांगलाच धडा शिकवला आहे. काहींकडे कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याची हिंमत नव्हती, तर बाकीच्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली. क्लाफासबाब तर कमळावर पराभूत झाले. आता या सर्वांसमोर पुढे काय हा प्रश्न उभा ठाकला आहे. भाजपात जाऊन उपयोग नाही व काँग्रेसकडील दरवाजे बंद झालेले. त्यामुळे काणकोणचे इजिदोर असो, फिलीपबाब असो वा बाबाशान. आता काय करावयाचे या विवंचनेत आहेत. चर्चिल व मिकी पाशेको यांची स्थितीही वेगळी नाही. आता ही सर्व मंडळी पुन्हा काँग्रेसचे दरवाजे तर ठोठावणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
घनःश्याम नेमका कुठे?
मडगावात दिगंबर कामत यांच्या विरुध्द दंड थोपटण्याचा आव आणलेले नगरसेवक महेश आमोणकर यांची अखेर पळता भुई थोडी झाली व आता तर त्यांनी तृणमूललाही सोडचिठ्ठी दिली आहे. ते जरी त्या पक्षाने शेवटच्या टप्प्यात वाऱ्यावर सोडले असे म्हणत असले, तरी मडगावचे राजकारण ज्यांना जवळून माहीत आहे त्यांनी अगोदरच हे अनुमान केले होते, पण मुद्दा महेशचा नाही तर त्यांच्यापूर्वी तृणमूलचे उमेदवार म्हणून नाव घेतले जात असलेल्या घनःश्याम शिरोडकर यांचा आहे.
मडगावात नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांचा होता, पण त्यासाठी दिगंबर यांनी साथ न दिल्याने नाराज होऊन त्याचा वचपा म्हणून मडगावातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली व भाजपशी संधान साधले, पण प्रतिसाद न मिळाल्याने ते तृणमूलकडे गेले. त्या पक्षाने महेशला पसंती दिली. तेव्हापासून घनःश्यामचा पत्ता नाही. कदाचित त्यांच्या कुंडलीत राजयोग नसावा की ते अजूनही कामत यांनाच जवळ आहेत?
हेच का ते डबल इंजिन?
गेल्या सुमारे दहा-पंधरा दिवसांपासून म्हापशात प्रतिदिन किमान दहा-बारा वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यासंदर्भात तक्रार दाखल केल्यास फोन करीपर्यंत अवघ्या पाच मिनिटांतच वीजपुवठा सुरळीत होतो अन् पुन्हा दहा-पंधरा मिनिटांनंतर वीज खंडित होते हे तर सांगायलाच नको! पण, असे असले तरी प्रत्येक दिवशी अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण तसे गुलदस्त्यातच आहे.
यासंदर्भात म्हापसा येथील वीज कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन तर सातत्याने व्यस्तच असतात. अशा प्रसंगी स्वत:ची कैफियत नेमकी कुणासमोर मांडावी, असाही प्रश्न वीजग्राहकांना पडतो. आता निवडणुका झाल्यानंतर स्थानिक आमदार ज्योशुआ डिसोझा हे नेहमीच ‘व्हेरी व्हेरी बिझी’ असल्याने ते सर्वसामान्यांच्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ शकतच नाहीत, हे समजून घेता येईल. असे असले तरी निदान वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी लोकांच्या कैफियती ऐकून घेऊन त्यासंदर्भातील समस्या वेळच्या वेळी सोडवण्याच्या दृष्टीने नेहमीच सज्ज असावे, अशी अपेक्षा ठेवून असलेले वीजग्राहक ‘हेच काय ते डबल इंजिन सरकार’ असा सवाल करीत असल्याचे ऐकिवात आहे.
कौन बनेगा मिनिस्टर?
विस्कळित काँग्रेसला अधिकच खिळखिळे करत भाजपने गोव्यात 20 जागा मिळविल्या तरी आता याच वाढलेल्या जागा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू पाहात आहे. कारण जे जिंकून आले आहेत ते बहुतेक सगळेच अनुभवी असल्याने त्यापैकी आता कुणाला मंत्री करावे आणि कुणाला बाहेर ठेवावे हा प्रश्न उभा राहणार आहे. आता सुभाष फळदेसाई आणि गणेश गावकर यांनीच नव्हे, तर पहिल्यांदाच निवडून आलेले उल्हास तुयेकर यांनीही मंत्रिपद मिळण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे येणारे काही दिवस तरी गोव्यात कौन होगा मिनिस्टर याचे बरेच खेळ होणार असेच वाटते.
‘मी पुन्हा येणार!’
महाराष्ट्रातील देवेंद्रसाहेबांमुळे गाजलेली ही उक्ती आता आमच्या फातोर्ड्यात या दिवसांत ऐकू येऊ लागली आहे. फातोर्ड्यात पराभवाची हॅट्ट्रिक करणाऱ्या दामूच्या समर्थकांनीच ती व्हायरल केली आहे. समाज माध्यमांवर तर त्याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक खटपटी - लटपटी करूनही सलग तीनदा पराभव झाल्यावरही भाजपवाले सुधारणार नसतील, तर फातोर्ड्यात भगवा कसा फडकणार असे सवाल आता केले जात आहेत. ∙∙∙
रेजिनाल्ड बनले हिरो
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आलेक्स रेजिनाल्ड सर्वाधिक वादग्रस्त प्रकरण बनले होते, सुरवातीलाच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत आपमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधींच्या फोनमुळे आपमध्ये जाणे टाळत कार्याध्यक्षपद पदरात पाडून घेतले. मात्र, त्यानंतर तृणमूल काँग्रेसची वाट धरली. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी तृणमूललाही बाय बाय केले आणि परत काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने त्यांना नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली ती त्यांच्या पत्त्यावर पडली. आता भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ते मंत्री बनणार अशी हवा आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसने नाकारल्याचा फायदा झाल्याची चर्चा दक्षिण गोव्यात आहे. नशीब एखाद्याचे, सर्वांनी नाकारून हिरो बनण्याचे असे लोक म्हणत आहेत. या सर्वांमुळे रेजिनाल्ड मात्र सुखावले आहेत.
मगोचा पाठिंबा आणि भाजप
विधानसभा निवडणुकीमध्ये मगो पक्षाने मोठा गाजावाजा करत तृणमूलबरोबर युती करत १३ जागा लढविल्या होत्या, यातील 7 ते 9 निवडून येणार अशी हवा झाली होती. त्यात देशभरातील चॅनेल जनमत चाचण्यांमध्ये राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असा वारा दिल्याने आपला अधिक फायदा होईल असा अंदाज बांधत पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत स्वप्नाळू मजले बांधले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावरचे का असेना बहुमत मिळवत मगोच्या स्वप्नांना सुरूंग लावला. आता दिलेला बिनशर्त पाठिंबा ही भाजपला नको झाला आहे. 80 टक्के आमदारांनी हा पाठिंबा घेण्याला विरोध केला आहे. त्यामुळे उरलीसुरली लाजही संपल्यात जमा आहे.
निवडणुकीचे कवित्व
निवडणूक संपून निकाल जाहीर झाले, तरी या निवडणुकीचे कवित्व काही संपलेले नाही. विशेष म्हणजे नव्यानेच राजकारणात उतरून थेट विधानसभेत प्रवेश केलेल्या ‘आरजी’चीच चर्चा जोरात सुरू आहे. आता ही चर्चा राजकारण्यांपुरती मर्यादित राहिली नसून भाजप, कॉंग्रेससारख्या बड्या पक्षांच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात होत आहे हे नक्की. कारण आरजीवाल्यांनी मिळवलेल्या मतांनी या लोकांची झोपच उडवली आहे. ∙∙∙
आरजीचा ‘उजो’ आता पंचायतीतही
कुणीही खिजगणतीत न ठेवलेल्या, पण विधानसभा निवडणुकीत अक्षरशः ‘उजो’ घातलेल्या आरजीचे सर्व सैनिक आता पंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. गोव्यात सगळीकडे पक्ष पोहोचविण्यासाठी त्यांच्यासाठी पंचायत निवडणूक हे योग्य माध्यम ठरणार आहे. आता त्यांचा हा ‘उजो’ गोव्यातील तळागाळात पोहोचणार की नाही ते ही निवडणूकच स्पष्ट करणार आहे. पंचायत निवडणुकीत जर त्यांनी चांगली कामगिरी केली, तर 2024 मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. सध्या गोव्यात विस्कळित झालेल्या काँग्रेससाठी हा ‘उजो’ पेलणे शक्य होणार का? ∙∙∙
‘आप’चा नुसताच गाजावाजा
विधानसभा निवडणुकीमध्ये आपने मोठा गाजावाजा करत 40 उमेदवार उभे करत आश्वासनाचा बारा पॉईंट अजेंडा देऊनसुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत 37 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, तर केवळ दोन उमेदवार मतविभागणीचा फायदा मिळवत विजयी झाले आहेत याची जाणीव आज अखेर प्रदेश संयोजकांना झाली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत अधिक जोमाने उतरू असे म्हणत नवा व्हिडिओ जारी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.