Goa News: ओपा - खांडेपार तिठ्यावरील रस्त्याच्या कडेला बसथांबा निवारा शेड बांधकाम रखडत चालल्याने याची दखल अखेर गोवा राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली. (बुधवारी) सकाळी या नियोजित बसथांबा निवारा शेड बांधण्याच्या जागेची पाहणी केली.
यावेळी फोंड्याचे मामलेदार विमोद दलाल, पोलिस अधिकारी तसेच कुर्टी खांडेपार पंचायत सचिव, पंचसदस्य, एमआयबीके विद्यालय पीटीए अध्यक्ष सूरज गरड, सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर व इतर नागरिक उपस्थित होते.
आधीच अरुंद असलेल्या या तिठ्यावर कायम अपघात होत असून चार महिन्यांपूर्वी अपघातात एक विद्यार्थी जखमी झाला होता. या तिठ्यावर अतिक्रमण झाले असून त्यामुळे बसथांबा निवारा शेड उभारणे मुश्किलीचे ठरले आहे. खांडेपार येथील एमआयबीके विद्यालयात शिकणारे विद्यार्थी बस साठी याच तिठ्यावर थांबतात, विद्यार्थ्यांची इथे गर्दी होते.
मात्र, एका बाजूला उतरण असल्याने या महामार्गावरून वाहने भरधाव येत असल्याने या विद्यार्थ्यांना मोठा धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी बस निवारा शेड बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
सदर प्रकरण आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर यांनी पुढे रेटले होते, पण सरकारी यंत्रणेकडून दिरंगाई झाल्याने अखेर बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जिस यांनी दखल घेऊन मामलेदार तसेच संबंधित पंचायतीला सोबत घेऊन पाहणी केली.
दरम्यान, या प्रकरणी सोक्षमोक्ष लावण्यासाठी मंगळवारी 14 रोजी पंचायत बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पंचायतीतर्फे सांगण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.