गंगाराम आवणे
पणजी: गोवा मुक्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पोर्तुगीज सत्तेविरुद्ध आवाज उठवून पोर्तुगिजांना सळो की पळो करणारे माझे वडील वीर हुतात्मा बाळा राया मापारी यांच्याबाबत मी आईला विचारायचे त्यावेळी ती मला सांगायची, तुझ्या वडिलांना पाखल्यांनी गाडीला बांधून ओढून नेले, त्यांचे हाल केले; परंतु तुझे बाबा वीर होते, अशा आठवणी वीर बाळा राया मापारी यांची मुलगी लक्ष्मी आगरवाडेकर यांनी साश्रू नयनांनी सांगितल्या.
केवळ माझे वडीलच नव्हे तर माझ्या काकांनादेखील हौताम्य पत्करावे लागले, त्यामुळे आम्हा मापारी कुटुंबीयाचे गोवा मुक्तिलढ्यात महत्त्वाचे योगदान आहे, हे कोणी नाकारू शकत नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
ज्यावेळी बाळा मापारी यांना पोर्तुगिजांनी पकडले त्यावेळी ही माहिती आझाद दलाच्या आपल्या इतर साथीदारांना देण्यासाठी त्यांचे बंधू रोहिदास मापारी जात असताना त्यांना शिवोलीत पकडून रस्त्यावरून पकडून नेण्यात आले. त्यानंतर बाळा मापारींना गाडीला बांधून ओढून नेण्यात आले व सहाव्या दिवशी चिरून मारण्यात आले, असे हुतात्मा रोहिदास मापारी यांचे पुत्र ज्ञानेश्वर मापारी यांनी सांगितले. आपले वडील रोहिदास मापारी यांना तुरुंगात सतत मारहाण केल्याने हौतात्म्य आले. आपल्या मापारी कुटुंबीयांनी अतोनात त्रास सहन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याकाळी जर एखादा पोर्तुगीज पोलिस दिसला तर प्रत्येकजण आपल्या घराची दारे बंद करत होते. आमच्या घरी त्यावेळी कोणीच येत नव्हते. कारण आम्हा मापारी कुटुंबीयांशी संबंध आहेत किंवा भेटल्याचे समजल्यास त्यांना त्रास दिला जायचा, त्यामुळे आमच्याशी तसा कोणी संबंध ठेवत नव्हते, असे ज्ञानेश्वर मापारी यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.