Indraneel Bhattacharya At Film Appreciation Certificate Course 2024
पणजी: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात चित्रपट बनविले जातात, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक पाहतातही. आपल्याकडे उत्तम दर्जाचेही चित्रपट बनविले जातात, परंतु ते पाश्चात्त्यांना तेवढेसे समजत नसल्याने मागे राहतात, असे मत भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेचे प्रा. डॉ. इंद्रनील भट्टाचार्य यांनी मांडले.
आपल्याकडील बहुतांशी चित्रपटांमध्ये नवरसांचाही समावेश असतो, परंतु पाश्चात्त्य चित्रपट एका विशिष्ट विषयाला धरून निर्माण केलेले असतात. परंतु आता अशा विशिष्ट विषय घेऊन चित्रपट भारतातही बनविले जात आहेत. खासकरून तरुणाईची जागतिक चित्रपट रुची वाढत असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.
पत्र सूचना कार्यालय आणि भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित चित्रपट परीक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. प्रा. अमलान चक्रवर्ती व प्रा. मालिनी देसाई यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.
चित्रपटात एखादे वस्तु किंवा घटना विशिष्ट ठिकाणी किंवा काळात घडते ती अकस्मित घडत नाही. चित्रपटात सर्व काही ठरवून केले जाते, त्यामुळे कथा, संकल्पना, अभिनय, सादरीकरण या सर्व गोष्टींवर अतिशय सुक्ष्मपणे काम केलेले असते. त्यामुळे चित्रपटाचे निरीक्षण करताना या विविधांगी अंगाचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रा. भट्टाचार्य यांनी सांगितले.
प्रा. भट्टाचार्य पुढे म्हणाले की, ज्यावेळी चित्रपट पाहण्याची डिजिटल माध्यमे आली त्यावेळी सिनेसृष्टीला धोका निर्माण झाल्याचे बोलले जात होते. परंतु यातून सिनेसृष्टी स्थिरावली असून सिनेसृष्टीचे भविष्यही उज्ज्वलच असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.