CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्‍यमंत्र्यांचे दौरे वाढले!

CM Pramod Sawant: पक्षश्रेष्ठींचा विश्‍‍वास वाढतोय : संघटनात्मक कामांसाठी अधिक पसंती

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: केंद्रातील बदलत्या राजकारणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे राजकीय वजन कमालीचे वाढले आहे. पक्षनेतृत्वाकडून अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात येत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्‍ये सक्रिय सहभाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री आता लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी राज्याबाहेर दौरे करू लागले आहेत.

दुसरीकडे राज्यातील क्लिष्ट असे विषय केंद्र सरकारकडे नेत एकाच बैठकीत ते सोडवण्याची किमया त्यांनी साधली आहे. भाजपकडे अनेक बड्या राज्यांच्‍या मुख्यमंत्र्यांची फौज असतानाही संघटनात्मक कामासाठी सावंत यांनाच जास्‍त पसंती देऊन नेतृत्‍वाने त्‍यांच्‍यावर विश्‍‍वास दाखविला आहे.

चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री सोमवारी (१९ रोजी) पहाटे गोव्यात पोचले होते. त्‍याच दिवशी दुपारी ते तेलंगणाला रवाना झाले. तेथून ते आज बुधवारी (२१ रोजी) सकाळी केरळमध्ये आणि सायंकाळी पुद्दुचेरीत पोचले.

दक्षिणेकडील राज्यांचे द्वार भाजपसाठी गोव्यातून उघडते हे त्यांनी कृतीतून दाखवणे सुरू केले आहे. अर्थातच ही जबाबदारी त्‍यांच्‍यावर पक्षनेतृत्‍वाने सोपविली असून, ती समर्थपणे पेलत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला.

आपल्‍या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात मुख्‍यमंत्र्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्‍या झटपट भेटी घेतल्या आणि विषय हातावेगळे केले. त्यावरून केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांचे असलेले वजन दिसते. विचार करू, पाहू, बैठका घेऊ अशी पोकळ आश्‍‍वासने घेऊन नव्हे तर प्रश्‍‍न सोडवूनच त्यांनी आपला दौरा यशस्वी केला आहे.

जैवसंवेदनशील विभागातून 40 गावे वगळण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्र सरकार विशेष समिती राज्याच्या दौऱ्यावर पाठवणार आहे. ती गावेही वगळली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी छातीठोकपणे सांगितले असल्‍याचे सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले.

पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केलेल्या गोमंतकीयांना भारतीय पासपोर्ट जमा करण्याची सुविधा, गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात दुरुस्ती, रेती काढण्याचे परवाने देण्यासाठी नियम दुरुस्ती, आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी मतदारसंघ फेररचना आयोग नेमण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू करण्याचे आश्‍‍वासन त्यांनी केंद्रीय मंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळविले आहे.

योगींच्‍या मांडीला मांडी लावून स्‍थान : भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री परिषदेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शेजारीच मुख्यमंत्री सावंत यांची बैठक व्यवस्था होती. यावरून भाजपकडून त्यांना किती महत्त्व दिले जातेय, हे लक्षात येते. शिवाय अयोध्येला भेट देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून केलेल्या नियोजनात उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळानंतर गोव्याच्या मंत्रिमंडळाला श्री रामलल्लाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रचारात हिरिरीने सहभाग

मुख्यमंत्री सावंत याआधी छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश विधानसभा प्रचारात सहभागी झाले होते. काही ठिकाणी त्यांनी प्रचाराचे उद्‍घाटनही केले होते. तामिळनाडूत पसुम्पोन मुथुरामलिंगम थेवर यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी त्‍यांना मिळाली.

स्‍टॅलिन, राहुल गांधींवर शरसंधान

मुख्यमंत्र्यांनीही राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवण्यासाठी चर्चेत राहणे पसंत केल्याचे दिसते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्‍टॅलिन यांनी सनातन हिंदू धर्मावर टीका केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तो राष्ट्रीय मुद्दा ठरला. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीची याप्रश्‍‍नी भूमिका काय, या मुख्यमंत्र्यांच्या प्रश्‍‍नावर तो पक्ष उत्तर देऊ शकला नाही. विधानसभा निवडणूक काळात हा मुद्दा भाजपने उचलून धरला. राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले.

यापूर्वी संयुक्त जनता दल ‘रालोआ’त आणण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती व ती मी यशस्वी केली. पक्षाचा मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. दक्षिण भारताचा दरवाजा भाजपसाठी गोव्यातून उघडला जात आहे, असे म्हणता येईल. -
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री गोव्‍यात पक्षकार्यासाठी नेहमीच वेळ देतात. संघटनात्मक कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. पक्ष वेगळा आणि सरकार वेगळे असे नसते. पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT