पणजी: राज्यात बेकायदा वाळू उपसा होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांपूर्वी नियमावली मंजूर करून राज्य सरकारला निर्देश दिले होते. त्याचे पालन होत आहे का?, असा प्रश्न उगवे येथील गोळीबारानंतर उपस्थित होत आहे.
गोळीबार प्रकरणात स्थानिकांनाही गंुतवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. जखमींच्या जबानीनंतर नेमके कारण स्पष्ट होईल. परंतु प्रकरणाला वाळू उत्खननाची किनार असल्याचे मानले जात आहे. पेडणे येथील उगवे परिसरातील तेरेखोल नदीकिनारी मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास झालेल्या गोळीबारात दोन वाळूउपसा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अवैध वाळू उपशाशी संबंधित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामरिशी रामराज पासवान (५४, व्यवसाय मजूर, मूळ बिहार, सध्या पोरोसकडे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, त्यावेळी रामरिशी पासवान आणि त्यांचा सहकारी लालबहादूर गोंड (३७, मूळ बिहार, सध्या पोरोसकडे) हे काही मजुरांसह नदीत कामासाठी गेले होते.
त्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने दोघांवर गोळीबार केला. या गोळीबारात रामरिशी पासवान यांच्या मानेवर गोळी लागली, तर लालबहादूर गोंड यांच्या उजव्या हातावर आणि पोटाच्या बाजूला गोळी लागली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले की, गोव्यातील वाद आता थेट गुन्ह्यांच्या स्वरूपात बदलत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. भाजप सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्यात पूर्ण अपयश पत्करले आहे. ‘गँग्स ऑफ गोवा’सारखे टोळके तयार होण्याआधी सरकारने जागे व्हावे. आज गोवा कोणासाठीच सुरक्षित राहिलेला नाही.
१.तालुका स्तरावर उड्डाण पथक ः प्रत्येक तालुक्यात नव्याने गठित उड्डाण पथकाचे नेतृत्व उपजिल्हाधिकारी करणार आहेत. त्यांना मामलेदार, पोलिस, बंदर कप्तान संचालनालय, खाण व भूविज्ञान संचालनालय, वाहतूक व जलसंपदा विभागांचे साहाय्य दिले जाईल.
२.‘वॉर रूम’साठी व्हॉट्सॲप ग्रुप ः परस्पर समन्वय वाढविण्यासाठी आणि तत्काळ कृतीसाठी पथकातील अधिकाऱ्यांना व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
३.रात्रीची गस्त ः अवैध उपसा मुख्यत्वे रात्री होतो, म्हणून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत किनारी पोलिसांना नदी परिसरात गस्त घालण्याचे व आकस्मिक तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याकडे सध्या ५ एचडीपीई बोटी व १५ मीटर लांबीची एक एफआयबी बोट असून आणखी नौका विकत घेण्याची माहिती सरकारने दिली आहे.
४.वाळू वाहतुकीवर देखरेख ः वाळूच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. पहाटे ३ ते सकाळी १० या वेळेत तेरेखोल, शापोरा, मांडवी व झुआरी नद्यांलगतच्या मार्गांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. परवानगीशिवाय वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर जप्तीची कारवाई होईल आणि त्यांच्या परवानग्या रद्द केल्या जातील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.