पणजी: करंझाळे बीचवर (Caranzalem Beach) जाण्यासाठी धनदांडग्यांची सोय व्हावी यासाठी करण्यात आलेल्या बेकायदा रस्त्यावरून शहरातील राजकारण (Politics) पेटले. रस्त्यांचा (Damaged Road) हा वाद पेटल्यानंतर सोमवारी आम आदमी पक्ष (AAP), कॉंग्रेस (Congress) आणि दस्तूरखुद्द महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरोत यांनी या वादग्रस्त रस्त्यावर वृक्षारोपण केले. यावेळी एकमेकांवर चिखलफेक करण्याची संधी सर्वांनीच साधली. हा वादग्रस्त रस्ता होऊ नये, अशीच सगळ्यांची आपेक्षा आहे.
एका प्रतिथयश हॉटेलमधील पर्यटकांच्या सोयीसाठी करंझाळे बीचला जाण्यासाठी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. पारंपरिक पायवाटेचा रस्ता करून त्याठिकाणाच्या सुरूच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या या विध्वंसावर शहरातील नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरोत यांनी सकाळी त्या रस्त्यावर वृक्षारोपण करीत आपला या प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला.
त्यानंतर आपच्या सिसील रॉड्रीग्स यांनी त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. सायंकाळी कॉंग्रेसने वृक्षारोपण करून पर्यावरण बचावचा संदेश दिला. विशेष म्हणजे, आप आणि कॉंग्रेसने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तात्काळ मोन्सेरोत यांनी वृक्षारोपण केले. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले. आप आणि कॉंग्रेसने भाजप सरकारवर यावरून तोंडसुख घेतले.
दरम्यान, एकाच वादग्रस्त रस्त्यावर विविध पक्षांनी वृक्षारोपण केल्याने राजकीय वातावरण मात्र तापले आहे. विशेषतः मंत्री मोन्सेरोत यांनीच पुढाकार घेतल्यामुळे आरोपी कोण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सगळ्यांनीच केली आहे; पण कारवाई करायची तर कुणावर हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
करंजाळे रस्ता हा मोन्सेरोत कुटुंबियांचे पाप आहे. आमदार, मंत्री, महापौर घरात असताना यांना याची कल्पना नसते, हे अशक्यच आहे. वृक्षारोपण करून केवळ नौटंकी केली जात आहे. आप या विषयावर गंभीर असून कोणत्याही स्थितीत राज्यातील पर्यावरणाला धक्का लागू देणार नाही.
- सिसिल रॉड्रिग्स, राष्ट्रीय युवा उपाध्यक्षा (आप)
शहराच्या उद्ध्वस्तीरणाचा भाजपच्या नेत्यांनी जणू विडाच उचलला. त्याचीच प्रचिती या बेकायदेशीर रस्त्याच्या माध्यमातून येत आहे. शहराला धोक्याच्या खाईत लोटण्यासाठी तत्पर असणाऱ्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. पण, त्यापूर्वी आम्ही आमचे पर्यावरण वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे.
- उदय मडकईकर, (कॉंग्रेस नेते)
ताळगावात येणाऱ्या या प्रदेशातील किनाऱ्यावरील रस्ता कुणी केला माहित नाही. हा प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. हा रस्ता झाला पाहीजे असे ज्यांना वाटते, त्यांचा आम्ही निषेध करतो. या बाबीचे आम्हाला राजकारण करायचे नाही.
- जेनिफर मोन्सेरोत, महसूल मंत्री
आप मोन्सेरोत आमने-सामने
आपने आधीच या वादग्रस्त रस्त्यावर झाडे लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला असतांना मंत्री जेनिफर मोन्सेरोत वृक्षारोपणासाठी तेथे पोहचल्या. त्याचवेळी तेथे ‘आप’ च्या सिसिल रॉड्रिग्स आणि वाल्मिकी नाईक त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. पण, मोन्सेरोत यांनी तेथून काढता पाय घेत वाद टाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिसिल यांनी मोन्सेरोत यांचा खरपूस समाचार घेतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.