मडगाव: गोव्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मडगाव शहरात सध्या अवैध जुगाराने पाय पसरले आहेत. मडगाव पालिका प्रशासनाच्या नाकाखाली आणि पालिकेच्याच मालमत्तेत 'गडगडा' हा जुगार खुलेआम सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने, हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव नगरपालिका कार्यालय बंद झाले की सायंकाळच्या सुमारास जुन्या बाजारातील पालिकेच्या तिठ्यावर हा जुगाराचा अड्डा सजतो. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या आमिषाने अनेक कष्टकरी आणि तरुण या जाळ्यात ओढले जात आहेत.
यामुळे कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, 'रावाचे रंक' झालेल्यांची संख्या मोठी आहे. पालिकेकडे वारंवार गाऱ्हाणे मांडूनही केवळ दिखाव्यासाठी कारवाईचे नाटक केले जाते, मात्र प्रत्यक्षात जुगार बंद झालेला नाही.
या अवैध धंद्याला एका बड्या राजकारण्याचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी हा जुगार बाहेर मंडप उभारून चालवला जात होता. तक्रारींनंतर पालिकेने मंडप तर तोडला, पण जुगार बंद करण्याऐवजी तो आता तिठ्याच्या आत सुरक्षितपणे सुरू आहे.
पालिकेची बाजार व्यवस्थापन समिती आणि संबंधित नगरसेवक या अवैध प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या भूमिकेवरही संशयाची सुई जात आहे. समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या जागेत असे प्रकार घडणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे.
गडगड्याच्या या जुगारात लावल्या जाणाऱ्या लाखोंच्या बोलीमुळे खेळाडू आणि आयोजकांमध्ये वारंवार वादाचे प्रसंग उद्भवतात. यापूर्वी अशाच वादातून जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना मडगावात घडल्या आहेत.
उद्या जर पालिकेच्या जागेत सुरू असलेल्या या जुगारापायी कोणाची हत्या झाली, तर त्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. याप्रकरणी मुख्यधिकारी मधु नार्वेकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.