यशवंत पाटील
Goa News: ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा ठरलेला सिद्धार्थ जाधव यांचा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम आज ‘रेड कार्पेट’वर अवतरली आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
‘इफ्फी’मध्ये गाला प्रिमिअर आणि रेड कार्पेटचा सन्मान या चित्रपटाला मिळाल्याने सिनेरसिकांना आज सकाळपासूनच या चित्रपटातील कलाकारांना पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी सकाळी ठीक ११.१५ वाजता या चित्रपट निर्मितीतील सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार यांच्यासह सर्व टीम रेड कार्पेटवर अवतरली. एमआयबीचे सचिव संजय जाजू यांनी त्यांना ‘रेड कार्पेट’वर आणले.
यावेळी अभिनेत्री प्राजक्ता दातार हिला मूळ शोले सिनेमातील ‘बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना’ हा डायलॉग म्हणायला लावला आणि तिने तो खुबीने पेशही केला. परंतु तिला हाच डॉयलॉग मराठीत म्हणायला लावला. यावेळी प्राजक्ताने तो डायलॉग मराठीत म्हणायला सुरवात केली. ते ऐकण्यासाठी अनेकांचे कान टवकारले होते आणि ‘बसंती, या कुत्र्यांसमोर नाचू नकोस’ असे तिने म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला आणि हास्यकल्लोळ उमटला.
आज या चित्रपटाचा प्रिमिअर झाला आणि हा सोहळा चित्रपटाच्या निर्मिती टीमसाठी एक महत्त्वाची व ऐतिहासिक घटना ठरली. रमेश शिप्पी निर्मित आणि अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, हेमामालिनी, जया बच्चन या दिग्गज कलाकारांनी सुपर डुपर ठरविलेल्या ‘शोले’ या हिंदी चित्रपटाच्या सन्मानार्थ ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडविला. आजही त्या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा अनोख्या अंदाजातील चित्रपट आहे. त्यात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, समीर धर्माधिकारी, आनंद इंगळे, श्रीरंग महाजन यांचे प्रमुख योगदान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.