पेडणे
इतरत्र वाड्यावर ठराविक समाजाच्या तसेच काही वाड्यांच्या व कुटुंबीयांच्या स्मशानभूमी आहेत, पण दोन स्मशानभूमी वगळल्या, तर इतर स्मशानभूमी या उघड्यावर आहेत.
या स्मशानभूमींना वरती छप्पर नाही, लाकडे नाहीत, वीज, पाणी अशा सोयीसुविधा नाहीत. अशा बहुतांश स्मशानभूमी या रानात डोंगरावर वैगेरे आहेत.
बऱ्याच अशा बऱ्याच स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. मृत्यू पावलेल्या व्यक्तीला तिरडी खांद्यावर घेऊन पायवाटेने चालावे लागते.
पावसाळ्यात एकाद्या मृत्यू आलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे असले, तर स्मशानभूमीला छप्पर नसल्याने तसेच रस्ता नसल्याने बऱ्याच समस्या निर्माण होतात.
त्यामानाने ग्रामपंचायतीच्या किंवा मुरमुसे विकास मंचच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा आहेत, पण मृतदेह नेण्यासाठी शववाहिका नाही.
पक्क्या स्वरूपाच्या स्मशानभूमी बांधायच्या, तर जमिनीसाठी जमिनदाराचा ना हरकत दाखला पाहिजे असतो. असा दाखला सहजासहजी मिळत नसल्याने पुढच्या प्रक्रिया होऊ शकत नाहीत.
काही ठिकाणी स्मशानभूमीचा विषय कुणी गांभीर्याने घेत नाहीत. एका ठिकाणी उघड्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात असे चालत आलेले आहे.
ग्रामपंचायतीची स्मशानभूमी
तत्कालीन सरपंच उल्हास नाईक यांच्या कालावधीत भोमवाडा येथे सरकारी जमिनीत स्मशानभूमी झाली. या स्मशानभूमीचे भूमीपूजन तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते झाले व त्यांचे सहकार्य लाभले.
ही स्मशानभूमी ग्रामीण विकास यंत्रणा योजनेअंतर्गत झाली. या स्मशानभूमीवर छप्पर, मृतदेह ठेवण्यासाठी दोन चबुतरे, अंत्यविधीसाठीची लाकडे ठेवण्यासाठी स्वतंत्र शेड तसेच लोकांना बसण्यासाठीची सोय अशी स्मशानभूमी गावात प्रथमच उपलब्ध झाली.
मात्र, या स्मशानभूमीत वीज व पाण्यासाठी नळ नाही. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जातीपातीचे कसलेही बंधन नाही. स्मशानभूमी सर्वांसाठी खुली आहे.
मुरमुसे विकास मंचची स्मशानभूमी
मुरमुसे येथे चांगल्या सोयीसुविधा असलेली मुरमुसे विकास मंच या संस्थेने बांधलेली स्मशानभूमी आहे. सरकारी जमीन असलेल्या या जमिनीत अगोदर उघड्यावर अंत्यसंस्कार होत असत. मदन हरमलकर, नकुळ चोडणकर, दीनानाथ देसाई, दशरथ शेटगावकर, मेघश्याम हळर्णकर, प्रकाश कान्नाइक, सत्यवान नाईक, दयानंद मांद्रेकर, सुभाष हळदणकर, गुरु पुनाजी, रावजी जाधव हे सर्वजण एकत्र आले व त्यांनी मुरमुसे विकास मंचची स्थापना केली. अध्यक्षपदी मेघश्याम हळर्णकर यांची निवड झाली आणि सर्वप्रथम त्यांनी स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला. त्यात अंत्यसंस्कारासाठी एक चबुतरा, लाकडे ठेवण्यासाठी शेड, बसण्यासाठी निवारा शेड बांधली. तत्कालीन आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे अंत्यसंस्कारासाठी आणखी एक चबुतरा, पत्र्याचे छप्पर, सभोवताली दगडी कुंपण या सगळ्या गोष्टी केल्या. याच स्मशानभूमीत मृत्यू आलेल्या लहान मुल, गरोदरपणात मृत्यू आलेली महिला यासाठी दफन करण्याचीही सोय आहे. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जात, समाज, स्थानिक, परप्रांतीय असे कसलेही भेदभाव नाहीत. लाकडांची रक्कम भरून अंत्यसंस्कार करता येतात. तालुक्यात अंत्यसंस्कारासाठी जेव्हा काही समस्या झाल्या तेव्हा या स्मशानभूमीचा उपयोग झाला.
आमच्या तुये ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी चांगली सोय आहे. येथून अन्य दूर अंतरावर असलेल्यांना मृतदेह आणणे शक्य होत नाही, पण शववाहिका वैगेरे उपलब्ध झाली, तर काहीजण या स्मशानभूमीत मृतदेह घेऊन येतात. या स्मशानभूमीच्या जवळ स्ट्रीट लाइट आहे. त्याचा उजेड स्मशानभूमीत मिळतो. असे असले तरी ग्रामपंचायतीतर्फे स्मशानभूमीत वीज व पाण्याची सोय करण्याचा ग्राम पंचायतीचा विचार आहे.सुहास नाईक (सरपंच तुये)
तुये हा भाग औद्योगिक वसाहतीमुळे यापुढे विकसीत होत रहाणार आहे. याच परिसरात सरकारी इस्पितळ आहे. यामुळे भविष्यात तुये गावाची लोकसंख्या बरीच वाढणार आहे. याचा विचार करून संस्था अंत्यसंस्काराच्या संख्येत वाढ करणार आहे. तसेच पाणी, वीज आदी सोयी उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.मेघश्याम हळर्णकर (अध्यक्ष, मुरमुसे विकास मंच)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.