Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: पक्षांतर्गत मनोमीलन किती फायद्याचे?

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसमधील अमित पाटकर आणि गिरीश चोडणकर यांच्या गटांचे झालेले मनोमीलन पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेला किती फायदेशीर ठरणार, हे त्या-त्यावेळीच दिसून येईल. परंतु गोवा प्रभारी म्हणून ताबा घेणाऱ्या मणिकम टागोर आणि प्रदेशाध्यक्ष पाटकर यांची कसोटी या निवडणुकीत लागणार एवढे निश्‍चित आहे.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून लोकांना बरोबर घेण्यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ हा उपक्रम सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेविषयीचे महत्त्व लोकांना पटवून दिले जात आहे.

त्याशिवाय लोकांच्या काही सूचना आहेत, समस्या आहेत त्याही मागविल्या जात आहेत. अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या युरी आलेमाव यांच्यावर पक्षाचा चेहरा कसा असावा, याची भिस्त आहे.

त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबुतीने बांधावा लागणार आहे. रायपूर येथे झालेल्या 85 व्या अधिवेशनात काँग्रेसमधील दोन्ही अमित पाटकर आणि गिरीश चोडणकर या गटांचे कार्यकर्ते एकत्रित होते. टागोर यांनी दोन्ही नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या उपायकारक ठरल्याचे आता बोलले जात आहे.

पक्षांतर्गत काही हेवेदावे असले तरी उघडपणे ते आणू नयेत, याची जाणीव नेतृत्वाला झाली. त्यामुळेच पाटकर व चोडणकर यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे नेत्यांना दिसून आले. राहुल गांधी यांच्याशी चोडणकर यांची जवळीक असूनही पाटकर यांच्याकडे नेतृत्व दिल्याचे काहीजणांच्या गळी उतरले नाही.

पक्षाचे निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले, त्यामुळेही नेतृत्वावर प्रश्‍न उपस्थित झाले. चोडणकर यांच्या काळात गोवा प्रभारी असलेले तत्कालीन दिनेश गुंडू राव यांच्याबद्दलही पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीनंतर प्रश्‍न उपस्थित केले.

हेवेदावे विसरून एकत्र राज्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी नव्या नेतृत्वाकडे धुरा द्यायची म्हणून अमित पाटकर यांच्याकडे ती सूत्रे आली.

त्याशिवाय राव यांच्या जागी टागोर यांची काँग्रेसने नियुक्ती करून 2024 साठी पक्ष पूर्ण ताकदीने उभारण्याची जबाबदारी सोपविली आहे.

त्यानुसार बदल दिसून आला तो चोडणकर यांच्यासह त्यांचे समर्थकही पाटकरांच्या शेजारी दिसू लागले. वेळीच नेतृत्वाने पक्षाची गरज ओळखून हेव्यादाव्यांना बाजूला सारले, हे महत्त्वाचे ठरले आहे.

गोव्यात कॉंग्रेसला जनसमर्थन नेहमीच मिळाले आहे. परंतु, काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक जिंकून केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे. कोटी रुपयांची आमिषे धुडकावून आम्ही तीन आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.

‘हाथ से हाथ जोडो’ अभियानांत लोकांकडून आम्हाला सहानभूती मिळत आहे. जनता आमच्या विधानसभेतील कामगिरीवर समाधानी आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नक्कीच फायदा होणार.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

सध्याची परिस्थिती पाहिलीतर काँग्रेसला दोन्ही ठिकाणी फारसा स्कोप दिसत नाही. उत्तर किंवा दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार कोण ठरणार यावर काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली नाहीतर भंडारी समाज नाराज होईल आणि त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होईल. सध्या जरी काँग्रेसमधील नेते एकत्र आल्याचे दिसत असले तरी अजूनतरी ते एकसंघ झालेले दिसत नाहीत.

- ॲड. क्लिओफात कुतिन्हो-आल्मेदा, राजकीय विश्‍लेषक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT