Goa Tourism Suffers as Visa Costs Drive Away British Tourists
मडगाव: भारतात येण्यासाठी व्हिसा शुल्क भरमसाठ असल्याने गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांवर त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. एरवी गोव्याला पसंती देणारा ब्रिटिश पर्यटक गोव्याऐवजी श्रीलंका व फुकेट या देशांना पसंती देऊ लागला आहे. दरम्यान, व्हिसा शुल्क जास्त असूनही रशियन पर्यटकांनी मात्र गोव्यालाच पसंती दिली आहे.
गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला आहे. पर्यटन क्षेत्रात सक्रिय असलेल्या चार्टर विमानांच्या आयोजकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, गोव्याला आता वरील दोन देशांकडून स्पर्धा होऊ लागली आहे. फुकेटमध्ये प्रवेश करण्यासाठी कुठलेही व्हिसा शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे यंदा किमान दोन लाख पर्यटक तेथे जाण्याचा अंदाज आहे.
श्रीलंकेनेही ३६ देशांतील लोकांना व्हिसा शिथिल केला आहे. त्यामुळे श्रीलंकेत यावेळी ७० हजारांच्या आसपास पर्यटक जाण्याची शक्यता आहे. झांझिबार येथेही सुमारे ७० हजार पर्यटक भेट देऊ शकतात. त्यामानाने गोव्यात येणारे विदेशी पर्यटक २० हजारांच्या आसपासच असतील, असा अंदाज या व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
कझाकिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या अलमाटी येथून मागच्या आठवड्यात विदेशी पर्यटकांना घेऊन स्कॅट एअरलाईन्सचे विमान दाबोळी विमानतळावर उतरले होते. आता लवकरच मॉस्कोहून ‘आजूर एअर’चे चार्टर विमान पर्यटकांना घेऊन ‘दाबोळी’वर उतरणार आहे. दर आठवड्याला किमान दोन विमाने ही कंपनी गोव्यात आणणार आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, स्कॅट एअरलाईन्सची विमाने ३१ मार्चपर्यंत गोव्यात येणार असून, ती सर्व ‘दाबोळी’वर उतरतील. प्रत्येक विमानात किमान २०० पर्यटक असतील. ‘आजूर एअर’ची विमाने २७ एप्रिलपर्यंत ‘दाबोळी’वर उतरणार असून या प्रत्येक विमानाची क्षमता ३०० प्रवाशांची आहे. मात्र ब्रिटिश पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर विमाने मोपा विमानतळावर उतरणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मँचेस्टर आणि गॅटविक विमानतळावरून दर आठवड्याला दोन चार्टर विमाने गोव्यात येतील व ती सर्व ‘मोपा’वर उतरतील.
या सर्व पार्श्वभूमीवर रशियन पर्यटकांनी मात्र गोव्यालाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कझाकिस्तान येथूनही पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे, गोव्यातील चार्टर विमाने मोपा विमानतळावर वळविल्यामुळे ‘दाबोळी’वर आंतरराष्ट्रीय पर्यटक येणे कमी झाले होते. मात्र यावेळी कझाकिस्तान व रशिया या देशातील चार्टर विमाने ‘दाबोळी’वर उतरणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.