पणजी: राज्यात बुधवारी रात्री अचानक ढगफुटी झाल्याप्रमाणे जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री अविश्रांतपणे कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील सखल भागांत पाणी साचले. नद्यांच्या पातळीत वाढ झाली. गुरुवारी सकाळी जनजीवन विस्कळीत झाले.
राज्यातील अनेक पूल, रस्ते पाण्याखाली आले. वाहतूक ठप्प झाली. आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली. साखळी, डिचोली आणि सत्तरी भागात साखरझोपेत असलेल्या लोकांची सकाळी घरासमोर तळे साचलेले पाहून धांदल उडाली.
विद्यार्थ्यांना अशा पावसात शाळेत पाठवावे की नाही, याची धाकधूक लागली असतानाही काही शाळांमध्ये परीक्षा असल्याने पालकांनी धाडस करून विद्यार्थ्यांना पाठविले; परंतु अनेक प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा लवकर सोडल्या. दुपारी १२ नंतर काही अंशी पावसाने जोर मंदावला आणि पाण्याची पातळी खाली गेली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी हानी सुदैवाने टळली. मात्र, रात्रभर पडलेल्या पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
पावसाचा जोर वाढत असतानाच तिळारी धरणातून जलविसर्ग सुरू झाल्याने शापोरा नदीची पातळी वाढली. त्यामुळे साळसह नदीकाठच्या गावांवर पुराचे सावट आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
साखळीतील वाळवंटी नदीच्या पुरामुळे बंदिरवाडा-विठ्ठलापूर येथे एका घराला वेढा घातल्याने तिघेजण घरातच अडकले होते, तर सातजण सुखरूपपणे बाहेर पडले. मात्र, सायंकाळपर्यंत पुराचे पाणी उतरल्याने धोका टळला. या भागातील दोन कार पाण्यात बुडाल्या. घरांमध्येही पाणी घुसल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
मोपा विमानतळावरील पाणी सोडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा नागझर येथील रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला होता. कामानिमित्त बाहेर पडलेले लोक अडकून पडले होते.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी साखळीतील पूरस्थितीची पाहणी केली. सर्व स्थिती नियंत्रणात असून लोकांनी चिंता करू नये. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून संपर्क क्रमांकही जारी करण्यात आल आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गीते यांनी लोकांना आश्वस्त केले.
पार नदीची पातळी वाढल्याने मयते-अस्नोडा परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी बार्देशचे उपजिल्हाधिकारी कबीर शिरगावकर यांच्यासोबत पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. येथील १२ घरांमध्ये पाणी शिरले होते.
गोवा वेधशाळेने वास्तविक गुरुवारी यलो अलर्ट जारी केला होता. परंतु रात्री आकस्मित वाढलेल्या पावसामुळे रेड अलर्ट जारी केला. गेल्या २४ तासांत राज्यात १३६ मिमी म्हणजेच तब्बल ५.३८ इंच पावसाची नोंद केली. आतापर्यंत राज्यात एकूण ३०९१.६ मिमी म्हणजेच १२१.७१ इंच पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ५५.१ टक्के अधिक पावसाची नोंद केली आहे.
गेल्या २४ तासांत केपेत सर्वाधिक पाऊस २०० मिमी म्हणजेच सुमारे ७.८७ इंच पावसाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून आजपर्यंत राज्यात सर्वाधिक पाऊस वाळपईत झाला आहे. वाळपईत ३८५८.५ मिमी म्हणजेच विक्रमी १५१.५१ इंच पावसाची नोंद केली आहे. पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
वाळपईतील गोशाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मात्र, गुरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. केरी-सत्तरी येथील घोटली क्र. २ येथे वाळवंटी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पुलावरून सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
सत्तरी, पेडणे, डिचोली, धारबांदोडा या तालुक्यांना आज पुराचा फटका बसला. मात्र, मुलांनी आणि पालकांनी परीक्षेची चिंता करू नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य द्यावे. पुरामुळे शाळेत न पोचलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली म्हणून नुकसान होणार नाही, असे सांगत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी विद्यार्थी, पालक यांना दिलासा दिला. त्यामुळे या तालुक्यांतील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित वेळेच्या आधीच सोडण्यात आले.
डिचोली बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. काही दुकानांमध्ये गुडघाभर पाणी शिरले. बागवाडा-पिळगाव येथे पुरामुळे घरात अडकलेल्या नऊजणांची सुखरूप सुटका करण्यात आली. डिचोली अग्निशमन दलाने मदतकार्य केले. यात तीन बालकांसह पाच महिलांचा समावेश होता. बागवाडा शाळेत त्यांना हलविण्यात आले आहे.
यंदाच्या हंगामातील जुलै महिन्यातील पावसाने १२४ वर्षांचे रेकॉर्ड मोडले असून जुलै महिन्यात २१२४.४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये १७७७ मिलीमीटर, १९५३ मध्ये १७४८ मिलीमीटर तर १९३१ मध्ये १७४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मान्सून संशोधक डॉ. एम. रमेशकुमार यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.