Govind Gaude Sabha Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: मुख्‍यमंत्री, प्रदेशाध्‍यक्षांवर तोंडसुख! मतदारांना साष्टांग दंडवत; गावडेंच्या संवाद सभेचा सविस्तर वृत्तांत..

Govind Gaude Sabha: गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्यानंतर मतदारांसमोर व्यक्त होण्यासाठी त्यांनी प्रियोळ प्रगती मंचतर्फे खांडोळा येथे रविवारी सायंकाळी संवाद सभेचे आयोजन केले होते.

Sameer Panditrao

खांडोळा: २०२२ साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी केंद्रीय नेतृत्वाची भेट घडवून देण्याची वारंवार विनंती केली, तरी माझी त्यांच्याशी कधीच भेट होऊ दिली नाही. त्यामागील नेमके कारण काय? असा सवाल करीत माजी मंत्री गोविंद गावडे यांनी खांडोळा येथील जाहीर सभेत मनात साडेतीन वर्षे साठवून ठेवलेली खदखद प्रियोळ मतदारसंघातील मतदारांसमोर व्यक्त केली.

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्यानंतर मतदारांसमोर व्यक्त होण्यासाठी त्यांनी प्रियोळ प्रगती मंचतर्फे खांडोळा येथे रविवारी सायंकाळी संवाद सभेचे आयोजन केले होते. सभेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करीत ते म्हणाले, मंत्रिमंडळातून हटविल्याची माहिती मला दुबईच्या विमानतळावर उतरल्यावर मिळाली.

एका कार्यक्रमासाठी मी तेथे गेलो होते, तेथून मी तत्काळ शारजा-दोहा असा प्रवास करीत भारतात पोहोचलो. १९ तासांनी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना मी माझे म्हणणे जाणून घ्यावे, अशी विनंती केली आणि त्यांच्याशी १ तास ३५ मिनिटे चर्चा केली. मुख्यमंत्र्यांवर आरोप केले म्हणून मला मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला;

परंतु फोंड्यातील कार्यक्रमात मी जे काही बोललो, त्याचे चित्रीकरण आणि ध्वनिफितही उपलब्ध आहे, मग पक्ष नेतृत्वाने चौकशी का केली नाही?, असा सवालही गावडे यांनी यावेळी केला. ‘मी भाजपमध्‍येच राहणार आहे. गोविंद गावडे सत्य बोलतो म्हणूनच मला डच्चू दिला’, असे नमूद करत त्यांनी व्यासपीठावरून उपस्थित मतदारांना साष्टांग दंडवत घातला.

यापूर्वीच देणार होतो राजीनामा; पण...

२०१९ मध्ये जेव्हा रोहन खंवटे, विनोद पालयेकर आणि जयेश साळगावकर यांना मंत्रिमंडळातून वगळले, तेव्हा मीही राजीनामा देण्याच्या तयारीत होतो. त्याचवेळी मला तिघांनी राजीनामा देण्यापासून रोखले होते. त्यामुळे मी राजीनामा मागे घेतला. कारण मी सहा आमदारांच्या ‘जी-सिक्स’ गटाचा सदस्य होतो.

नाव न घेता प्रदेशाध्यक्षांवर शरसंधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे नाव न घेता गावडे यांनी खरपूस टीका केली. ज्या माणसाला आपल्या पदाचा ‘वालोर’ म्हणजे प्रतिष्ठा समजत नाही, तो माझ्याबद्दल ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे शब्द वापरतो, अशा व्यक्तीविरुद्ध पक्ष काय कारवाई करणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.

आपण कसे वेगळे हे सांगण्याचा प्रयत्न!

1.भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, पक्षाचे एसटी समाजाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांना माझ्या पक्षप्रवेशाची कल्पना दिली आहे काय, असा सवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्षांना मी केला होता. त्यावेळी मला सांगण्यात आले, की ज्या नेत्यांविषयी तू बोलत आहेस, त्यांना भाजपची गरज आहे. परंतु भाजपला गोविंद गावडे यांची गरज आहे, हे त्यांनी दिलेले शब्द स्मरून मी भाजपमध्ये प्रवेश केला.

2.पक्षप्रवेशावेळी मी अट घातली होती, की डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार असेल तर मी भाजपमध्ये अवश्य प्रवेश करेन. आतापर्यंत भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतल्याशिवाय पक्षप्रवेश केलेला नाही; पण मी आजपर्यंत गोव्याच्या इतिहासात केंद्रीय नेतृत्वाची भेट घेतली नसल्याचे, सांगून गावडे यांनी आपण वेगळे आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

माध्‍यमांवर आगपाखड

‘मी गंभीर आरोप केल्‍याचे भासवून माध्‍यमांनी ते चालवले. त्‍या आरोपांमुळे मला हटवले असल्‍यास ते आरोप खरे होते. अन्‍यथा चौकशी झाली असती’, अशी पुस्‍तीही गावडे यांनी जोडली.

पक्ष नेतृत्वाकडे बोट

कला व संस्कृती खात्याचे मंत्री म्हणून मी कलाकारांना सुरू केलेल्या अनुदान निधीत १७ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधानसभेच्या अधिवेशनावेळी सर्वोच्च पदावरील व्यक्तीने केला होता. त्यावेळी मी त्रस्त होऊन पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती; परंतु माझे मित्र सावंत हसले आणि गप्प राहिले. मात्र, हा विषय केंद्रीय समितीकडे गेला नाही, असे गावडे यांनी नेतृत्वाकडे बोट दाखविले.

माझ्यामुळे सावंतांचे आसन बळकट! :

२०१७ च्या निवडणुकीत मनोहर पर्रीकरांच्या शब्दाला मी कसा जागलो, याची आठवण गावडे यांनी सांगितली. मी पाठिंबा दिल्याने त्यावेळी भाजपचे सरकार झाले, हेही सांगत त्यांनी पक्षालाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवाय २०१९ मध्ये शिरोड्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांना निवडून आणण्यासाठी मी जे काम केले, त्यामुळे ते ७० मतांनी निवडून आले आणि सावंत यांची खुर्ची बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदारांना साष्टांग दंडवत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘विकसित भारत २०४७’ घडविण्यासाठी मी त्यांच्यासोबत उभा आहे. मला हटविण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला म्हणून त्यांना ईमेल केला आहे, असे सांगितले. मी आमदारकीचा राजीनामा देणार, भाजप सोडणार, ‘उटा’त फूट पडली, अशा अफवा उठविण्यात आल्या, अशा अफवा उठवणाऱ्यांना त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. गोविंद गावडे सत्य बोलतो म्हणूनच मला डच्चू दिला, असे नमूद करत त्यांनी व्यासपीठावरून उपस्थित मतदारांना साष्टांग दंडवत घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim: गजेश नाईक दोन पिढ्यांपासून बनवतात घुमट, शामेळ; गणेशचतुर्थीत आरती पथकांकडून वाद्यांना मोठी मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; ते 'सायब' खरेच निवडणुकीत उतरणार ?

क्रीडा विश्वात शोककळा, ऑलिंपिक पदक विजेत्या दिग्गज खेळाडूचं निधन; अशी होती त्यांची कारकीर्द

Horoscope: नोकरीत यश, अडकलेले पैसे परत; शनी-बुधाच्या सम सप्तक राजयोगाने 'या 3' राशींना मिळणार बंपर फायदा

Mapusa: म्हापसा पालिकेचं सभागृह 'स्वातंत्र्यदिन समूहगीत' स्पर्धेसाठी पडले अपुरे, ढिसाळ नियोजनमुळे शिक्षकांत नाराजी

SCROLL FOR NEXT