खांडोळा/फोंडा: गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविल्यानंतर त्यांच्या प्रियोळ मतदारसंघातच मूळ भाजप व मगोपच्या कार्यकर्त्यांकडून आव्हान निर्माण केले जात आहे. गावडे समर्थक सरपंचांच्या ताब्यातील ग्रामपंचायती काढून घेण्यासाठी अविश्वास ठराव मांडण्याचे घाटत असून, आज बेतकी-खांडोळा सरपंच विशांत नाईक यांच्याविरोधात फोंडा गटविकास कार्यालयात तसा ठराव दाखल करण्यात आला.
भोम-अडकोण पंचायतीमध्येही ‘अविश्वास’ आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रियोळ मतदारसंघात बेतकी-खांडोळा, तिवरे-वरगाव, भोम-अडकोण, वेलिंग-प्रियोळ, केरी, सावईवेरे, वळवई अशा सात पंचायती असून, त्यापैकी पाच पंचायतींवर गावडे समर्थक सरपंच आहेत.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले गोविंद गावडे २०२२ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले.
त्यामुळेच गावडे समर्थकांच्या हाती असलेल्या पंचायतींवर भाजपचाच झेंडा आहे; परंतु मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर गावडे यांनी केलेली बंडाची भाषा मूळ भाजप कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे गावडे समर्थकांकडून पंचायती हस्तगत करून मूळ भाजपच्या सदस्यांना सरपंचपदी संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्यात मगोपच्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे. अर्थात, त्यासंदर्भात उघडपणे कोणी बोलत नसेल तरी मतदारसंघात तशी चर्चा आहे. दुसरीकडे प्रियोळचे माजी आमदार तथा माजी सभापती विश्वास सतरकर यांना भाजपचे उपाध्यक्ष करून ‘बळ’ वाढविण्यात आले आहे.
येत्या २०२७ च्या निवडणुकीवेळी मगोप आणि भाजपची युती कायम राहिली तर प्रियोळ मतदारसंघ कुणाला मिळणार, यासंबंधी जोरदार खल मतदारांकडून होत आहे. यावेळेला गोविंद गावडे सत्तेत अर्थातच मंत्रिपदी नसल्याने त्यांना मतदारांची मर्जी राखण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. त्यातच गोविंद गावडे यांच्या वक्तव्यावरून ते आगामी काळात कोणता निर्णय घेतात, त्यावर सर्व काही निर्भर आहे.
यावेळेला प्रियोळ मतदारसंघ ‘मगोप’ला आणि फोंडा मतदारसंघ भाजपला, असे समीकरण होऊ शकते. अर्थातच प्रियोळ ‘मगोप’ला सोडल्यास दीपक ढवळीकर यांना संधी आहे. मात्र, फोंडा भाजपसाठी सोडल्यास फोंड्यात ‘मगोप’चे केतन भाटीकर यांना धक्का बसू शकतो. अर्थातच या जर-तरच्या गोष्टी असून निवडणूक जवळ येताच सर्व काही स्पष्ट होणार आहे.
भोम-अडकोण, तिवरे- वरगाव (माशेल) पंचायत पातळीवरही विद्यमान सरपंचांवर अविश्वास ठरावाबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मगोपचे नेते दीपक ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून काढून टाकण्यावर भाष्य करण्यास नकार दिला. ही भाजपची अंतर्गत बाब आहे आणि मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही, असे ते म्हणाले.
१बेतकी-खांडोळाचे सरपंच विशांत नाईक यांच्याविरोधात आज, ९ पैकी ५ सदस्यांनी फोंडा गटविकास कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. तेथे सरपंच बदलाचे वारे काही महिन्यांपासून वाहू लागले होते.
२ विरोधक योग्य संधीची वाटच पाहात होते. बुधवारी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर प्रियोळात आतषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या धूमधडाक्यात रात्रीच पंचायतीत बदलासाठी हालचाली सुरू झाल्या.
३पंच मनोज गावकर, दिलीप नाईक, उदय नाईक, रमिता गावडे, निकिता फडते यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सरपंचांच्या विरोधात तक्रार सादर केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.