Gossip About Alex Reginald Dainik Gomantak
गोवा

ही चूक नव्हे, विश्वासघात..खरी कुजबूज!

तृणमूलकडून योग्य असे व्हिटामिन ‘एम’ मिळाले नाही म्हणून तृणमूलला रामराम ठोकणारे रेजिनाल्ड यांना आता काँग्रेस सोडल्याचा पश्चाताप होतोय.

दैनिक गोमन्तक

ही चूक नव्हे, विश्वासघात!

‘राजे आपण चुकलात, आपल्या चुकीला माफी नसून सजा ही झालीच पाहिजे’, असा ऐतिहासिक नाटकातील संवाद कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना ऐकावा लागत आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन ज्या पक्षाने मोठे केले, त्याच्याशी प्रतारणा करून तृणमूलमध्ये गेलेले आणि नंतर तृणमूलकडून (Goa TMC) योग्य असे व्हिटामिन ‘एम’ मिळाले नाही म्हणून तृणमूलला रामराम ठोकणारे रेजिनाल्ड यांना आता काँग्रेस सोडल्याचा पश्चाताप होतोय. त्यासाठी रेजिनाल्डनी जनतेची माफीही मागितली आहे. मात्र, रेजिनाल्डचे मतदार क्षमा करण्यास तयार नाहीत. क्षमा चुकीला असते, विश्वासघाताला नव्हे, असे कुडतरीकर सांगू लागले आहेत. त्यातच रेजिनाल्डनी प्रायश्‍चित्त भोगण्यासाठी राजकारणातून थेट संन्यास घ्यावा, अशी मागणीही सोशल मीडियावर होऊ लागली आहे. आता रेजिनाल्ड समर्थक म्हणू लागले आहेत, रेजिनाल्ड यु टू? ∙∙∙

टोलवाटोलवी

राज्यात निवडणूक यंत्रणा सक्रिय झाल्यापासून तसेच कोरोनाचे संसर्ग प्रमाण वाढीस लागल्यापासून बहुतेक सरकारी खात्यांत कर्मचारी संख्या कमी झाली आहे. अनेक कार्यालयांतील खुर्च्या या रिक्त दिसून येतात. एक तर कर्मचारी निवडणूक कामासाठी किंवा कोरोना संसर्ग झाल्याने रजेवर आहेत. त्यामुळे प्रशासन कोलमडले आहे. लोक वारंवार हेलपाटे मारूनही त्यांचे धसास लागत नाही. जीव धोक्यात घालून लोक कार्यालयात येतात. मात्र, त्यांना दारावरच रोखण्यात येते. त्यांना आत येऊ दिले जात नाही. काय काम आहे, असे प्रवेशद्वारावरील कर्मचारी विचारतो व अधिकारी निवडणूक कामात गुंतले आहेत. निवडणूक संपल्यानंतर या, असे सुनावतो. निवडणुकीचे कारण सांगून त्याचा गैरफायदा सरकारी कर्मचारी घेत आहेत. कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. ∙∙∙ (Gossip About Alex Reginald)

सांताक्रुझमध्ये टोनींची सावधगिरी

भाजप वगळता इतर राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असल्याने भाजपचे इच्छुक उमेदवार कासावीस झाले आहेत. भाजप उमेदवारीसाठी चढाओढ असल्याने व अंतिम निर्णय भाजपची केंद्रीय निवडणूक समिती घेणार असल्याने अजून काहींना त्यांच्या उमेदवारीबाबत शाश्‍वती नाही. त्यामुळे अनेक भाजपचे (Goa BJP) इच्छुक उमेदवार प्रचारात अद्याप सक्रिय झालेले नाहीत. ही यादी घोषित झाल्यानंतर जे दुखावले गेलेत, ते एक तर अपक्ष किंवा पक्षातच राहून विरोधी उमेदवाराला छुपा पाठिंबा देण्याच्या करामतीला ऊत येणार आहे. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांचे नाव उमेदवारीसाठी पाठवले आहे. मात्र, त्यासोबत आणखी दोन नावेही आहेत. त्यामुळे ते स्वतःच उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंक आहेत. त्यामुळे ते सांताक्रुझमध्ये निवडणूक प्रचाराला लागलेले नाहीत. भाजपतर्फे प्रचार सुरू करून नंतर उमेदवारी नाही मिळाली तर पुढे काय, या चिंतेत असलेले टोनी ही सावधगिरी बाळगत आहेत. ∙∙∙

पक्के मित्र-कट्टर वैरी

मडकई मतदारसंघात (Constituency) यावेळेला मगोपचे सुदिन ढवळीकर आणि काँग्रेसचे लवू मामलेदार आमने-सामने येणार आहेत. एकेकाळचे जिगरी दोस्त आता सत्तेसाठी कट्टर वैरी झाले असून लवू मामलेदार हे सुदिनना आव्हान देत असले तरी मुळात काँग्रेसचे काम मडकई मतदारसंघात किती आहे, याचा आधी विचार करावा लागेल. लवू मामलेदार तसे निर्भीड आणि सडेतोड वृत्तीचे. हे सगळे ठीक आहे हो, पण कार्यकर्ते नकोत का? खरे तर मडकई मतदारसंघाकडे काँग्रेसचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आता लवूंना मडकईत तिकीट देऊन बळीचा बकरा बनवायचे आहे का? असेच काहीजण विचारत आहेत. ∙∙∙

भाजपचे निवडणूक व्यवस्थापन!

बार्देशच्या राजकारणातील तथाकथित सम्राट मायकल लोबो यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने म्हापसा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत आणि येनकेन प्रकारेण विजय मिळवण्याचा चंग सध्या भाजप नेत्यांनी बांधला आहे. त्यामुळेच भाजपने गेल्या आठवडाभरापासून म्हापशात निवडणुकीच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही कसे काय पटवायचे, यादृष्टीने त्या पक्षाकडून व्यूहरचना केली जात आहे. तरीसुद्धा ती मंडळी त्यांच्या आमिषांना बळी पडत नसल्याचे लक्षात आल्याने संबंधितांना व्यक्तिश: बोलावून त्यांच्याशी सुसंवाद साधून, त्यांच्याशी वाटाघाटी करून त्यांना ‘प्रीतिभोजना’चा लाभही देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा व्यवस्थापनाचा कितपत प्रभाव पडू शकतो, हा मुद्दा गौण असला तरी अशा या निवडणूक व्यवस्थापनाबाबत काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे तर खूपच मागे असल्याचे जाणवते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Cooch Behar Trophy 2025: गोव्याच्या लेगस्पिनरची कमाल! टिच्चून मारा करत पटकावले 6 बळी; चंडीगडविरुद्धचा सामना रंगतदार अवस्थेत

Pilgao Mining: 'धडधडीमुळे झोप लागत नाही'! खाणवाहतुकीविरुद्ध ग्रामस्थ संतप्त; रस्त्यावर उतरून अडवले ट्रक Watch Video

Goa ZP Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्‍या! जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी 8,69,356 मतदार बजावणार हक्क; 5 तृतीयपंथीय मतदार रिंगणात

Goa Liberation Day 2025: गोवा मुक्तीचा 'तो' ऐतिहासिक लढा...! संयुक्त राष्ट्रात भारतासाठी रशियाने घेतला संपूर्ण जगाशी पंगा; फेल झाली अमेरिका-ब्रिटनची चाल

SCROLL FOR NEXT