पणजी: पर्वरी येथील श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित गोपाळ नाईक हा मोबाईल वापरत नसल्याने तो पोलिसांना इतके दिवस गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या निकटवर्तींयांवर पाळत ठेवली आणि बुधवारी रात्री तो कुळे येथे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. गोपाळ साधूचा वेश धारण करून कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटकेत असलेल्या ८ पैकी तिघांनी गोपाळच्या सांगण्यावरून नायक यांच्यावर गोळीबार केल्याचे म्हटले होते. त्यामुळे गोपाळचा शोध घेणे पोलिसांनी सुरूच ठेवले होते. तो कधी कोलकाता येथे तर कधी वाराणशी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. जगन्नाथपुरी येथेही तो असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती.
नंतर माहितीच मिळणे बंद झाल्याने गोपाळ गोव्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी गोपाळला कोण मदत करू शकते, याचा अंदाज घेत त्यांच्यावर पाळत ठेवली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
त्याला आज म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने गोवा-कर्नाटक सीमेवरून गोपाळ नाईकला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. पर्वरी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एफआयआर’अंतर्गत ही कारवाई केली आहे. याअगोदर गुन्हे शाखेने या प्रकरणात ८ संशयितांना अटक केली आहे.
कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिकबाहेर काही हल्लेखोरांनी ३ ते ४ फेऱ्या झाडून गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यातून श्रीनिवास नायक वाचले, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाने प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने पसार झाले होते.
घटना घडलेले ठिकाण पर्वरी पोलिस ठाणे आणि विधानसभा संकुलापासून हाकेच्या अंतरावर असल्याने या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास पर्वरी पोलिसांकडून काढून गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तपासादरम्यान मिळालेली तांत्रिक माहिती आणि सखोल चौकशीनंतर गुन्हे शाखेने यापूर्वी सतीश शिंदे याला अटक केली होती. सतीश शिंदेच्या चौकशीत कुंडई येथील रहिवासी असलेल्या गोपाळ नाईकचे नाव समोर आले, ज्याच्या आधारे पोलिसांनी गोवा-कर्नाटक सीमेवर सापळा रचून त्याला जेरबंद केले.
संशयित गोपाळ ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असल्याने या गोळीबारामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, गुन्ह्याचा उद्देश काय होता आणि यात वापरलेली हत्यारे कुठे दडवली आहेत, याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना दिला होता चकमा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार झाल्यानंतर तपास पुढे सरकत गेला, तशी संशयाची सुई गोपाळ नाईक याच्या दिशेने वळली होती. तो कुंडई येथील रहिवासी असला तरी कित्येक दिवस तो घरी फिरकलाच नव्हता. कुटुंबीयांशीही त्याचा कोणत्याही मार्गाने संपर्क नव्हता. विशेष म्हणजे, त्याने एटीएमचाही वापर केला नव्हता. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.