काणकोण: गोकर्ण पर्तगाळी मठाच्या मठानुयायांनी तब्बल ५५० दिवसांत केलेल्या ५५० कोटी राम नाम जपाची नोंद ‘आशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’सह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली आहे. त्याची घोषणा आज झालेल्या धर्मसभेत श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांनी केली.
‘आशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’च्या संचालकांनी ही नोंद स्वामींच्या नावावर करण्याची शिफारस केली होती. मात्र, स्वामींनी सांगितले, की ही नोंद माझ्या नावावर नको. राम नाम जप गौड सारस्वत समाजाच्या समाज बांधवांनी १२० जप केंद्रे आणि १०४ उपकेंद्रांतून केला आहे. त्याचे श्रेय त्यांना जाते.
मी केवळ एक मार्गदर्शक आहे. तुम्हाला नोंद करायचीच असेल तर ती ‘जीएसबी’च्या (गौड सारस्वत ब्राह्मण समाज) नावावर करा, अशी सूचना केली. ती सूचना मानून तशी नोंद त्यांनी केली आहे, असे स्वामींनी सांगितले. हा विक्रम एक लौकीक आहे. तुमचा राम नाम जप ‘वैकुंठ बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाला आहे. श्रीराम चरणी तो रूजू झाला असल्याचे स्वामींनी सांगितले.
या धर्मसभेच्या सूत्रसंचालकांनी सांगितले, की मठ समितीने अयोध्या, पुणे आणि तिरूपती येथे मठ स्थापन करण्यासाठी जमीन संपादन केली आहे. त्याचप्रमाणे गोकर्ण येथे मठाचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. परिसरात पाठशाळेचा जीर्णोद्धार करून विद्यार्थी आणि गुरूवर्यांसाठी निवासी सदनिका उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.
या धर्मसभेच्या व्यासपीठावर मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, उपाध्यक्ष शिवानंद साळगावकर, आर. आर. कामत आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वामींच्या हस्ते थ्रीडी मॅपिंगचे उदघाटन करण्यात आले.
गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठात श्रीराम नामजप यज्ञात मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी सपत्नीक भाग घेतला. आज श्री राम नाम जपाचा मठात चौथा सांगता दिवस होता. या अनुषंगाने श्रीराम नामयज्ञ हवन झाले. दरदिवशी सुमारे दोनशे मठानुयायी या हवनामध्ये सहभागी होत आहेत. या विधीसाठी मठ परिसरात कुशावती नदीतीरी भव्य यज्ञहवन मंडप उभारला आहे. या मंडपाचे छप्पर पारंपरिकरित्या माडाच्या झावळ्यांनी शाकारले आहे. मंत्रघोषात हा हवन विधी पार पाडण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.