Urak Dainik Gomantak
गोवा

Urak : हुर्राक; गोव्याचे खास उन्हाळी पेय

हुर्राक पिणे मला एखाद्या विधी प्रमाणे वाटते. प्रत्येकाची हुर्राक पिण्याची शैली वेगळी आहे. पण एक सामायिक आणि सर्वांत पसंत केली जाणारी पद्धतही आहे.

Manaswini Prabhune-Nayak

Urak : तूबदल आता शरीराला जाणवू लागलाय. हवेतला गारवा संपून उन्हाच्या गरमगरम झळा लागायला सुरुवात झाली आहे. होळीचा काळ हा ऋतूबदलाचा काळ हे आम्हाला आमच्या बालपणात शिकवलेले आणि त्याची सूचकता ‘होळी जळाली, थंडी पळाली’ हे होळीभोवती फेर धरून म्हणताना व्हायची.

होळीचा काळ म्हणजे हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचे दिवस असे फिट्ट डोक्यात बसले होते. हे दिवस म्हणजे वसंत ऋतूत न्हाऊनमाखून घेण्याचे, उन्हातान्हात फिरताना कैऱ्या - आंबा - फणस - काजू - कलिंगड- करवंद खाण्याचे दिवस. यातील प्रत्येक फळ आपला स्वतःचा रंग आणि सुगंध घेऊन येते. या दिवसात मुद्दाम पेडणे - सत्तरी - सांगे - काणकोण भागांत गेलात तर या भागातील गावांमधील छोट्या छोट्या रस्त्यांवरून फिरताना काजूचा सुवास तुम्हांला भर रस्त्यात घेरतो.

पिकलेली काजूची फळे तुम्हांला आकर्षित करतात. मग गाडी थांबवून खाली उतरावेच लागते. पिकलेल्या काजू बोंडांचा रस प्यायल्याशिवाय रसना तृप्त होत नाही. छान पिकलेले लाल रंगाचे काजूचे बोंड तोडून हलक्या हाताने काजूची बी काढून, काजू बोंडाला असलेला डिंक कपड्यांवर पडू न देता, तोंडाला लागू न देता मोठी कसरत करत त्याचा सुमधुर रस पिण्यात एक वेगळीच मजा असते! अशाच होळीच्या काळात डोक्यावर चढणाऱ्या उन्हाच्या तिरपेत झाडावरची काजूची फळे तोडून त्यांचे रसपान करण्याचा आनंद घेता आला.

रसपान तर होतेच पण काजूच्या रसरशीत बोंडाचे छान सलाड, कोशिंबीर, भाजीदेखील करतात. तीदेखील अप्रतिम लागते. मध्य भारतात, महाराष्ट्रातील खान्देश, मराठवाडा - विदर्भ भागातील अनेकांशी जेव्हा बोलणे झाले, तेव्हा त्यांनी काजूचे झाड कधीच बघितले नाही हे समजले. यातील काहींनी तर कधी काजू खाऊन बघितला नाही.

जसे गोव्यातल्या लोकांना महुआचे झाड माहीत नाही आणि महुआचा बहर त्यांना कधी बघायला मिळाला नाही तसेच काजूच्याबाबतीत म्हणावे लागेल. पण आता पर्यटक मुद्दाम काजूच्या हंगामात येतात. त्यांना काजूची लागवड बघायची असते आणि त्याहीपेक्षा याच काळात मिळणारा ‘हुर्राक’ त्यांना पिऊन बघायचा असतो.

‘हुर्राका’बद्दल असलेली उत्सुकता त्यांच्या बोलण्यातून लपत नाही. सध्या इथल्या कोणत्याही स्थानिक व्यक्तीला तुम्ही ‘हुर्राक’बद्दल विचारा तो त्यावर तुमच्याशी भरभरून बोलेल. मीदेखील इथे येण्यापूर्वी काजूच्या फेणीबद्दल भरपूर ऐकून होते. पण ’हुर्राक’बद्दल काहीच माहीत नव्हते. पण काजूचा हंगाम सुरू होताच ‘हुर्राक’चा गंध लपून राहत नाही.

हुर्राक हे उन्हाळा सुसह्य करण्याचे गोमंतकीयांचे पेय आहे. यात आठ टक्क्यांपासून ते पंधरा टक्क्यांपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते. काजूपासून फेणी बनवताना काजूचा रसाचे तीन ते चार वेळा बाष्पीभवन प्रक्रिया करावी लागते. त्यातून जो रस मिळतो ती फेणी. पण हुर्राक बनवताना यातील एकच फेरी करतात. या एकाच बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत काजूच्या रसापासून ‘हुर्राक’ बनतो.

हुर्राक म्हणजे गोमंतकीयांसाठी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने ’विधिवत सोहळा’ आहे असे मला वाटते. कोणतीही गोष्ट जिला सांस्कृतिक संदर्भ असतो, ती करताना जसे त्यातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हावी याकडे कटाक्ष असतो. तसेच ‘हुर्राक’बाबत घडते. या काळात मुद्दाम कोणालाही विचारून बघा की तू हुर्राक कुठून आणतोस? मग त्यावर तो मी आणतो तो माणूस कसा खात्रीलायक आहे, तो कसा जगातली सर्वोत्तम हुर्राक बनवतो हे छातीठोकपणे सांगतो. मग आणखी एकजण ‘ह्यॅ हे काहीच नाही, माझ्या ओळखीचा एकजण आहे तो फार थोड्या लोकांसाठी हुर्राक बनवतो. एकदम सेंद्रिय पद्धतीची’ असे सांगू लागतो.

कोणाची हुर्राक उच्च दर्जाची यावरून एकदम चढाओढच सुरू होते. प्रत्येकाचा हुर्राक देणारा माणूस ठरलेला असतो. देवावर नाही इतकी त्याच्यावर गाढ श्रद्धा असते आणि म्हणूनच याच्याकडच्या हुर्राकसारखी दुसरी हुर्राक कुठेच नाही असा शिक्का बसून जातो. हुर्राकवरची चर्चा ऐकणेदेखील फार मोठे मनोरंजनाचे साधन असते. हुर्राकाची प्रत्येकाची ‘पोथी’ वेगळी असते.

मुद्दामच पोथी म्हणतेय कारण पारायण करावे तशी मोठ्या गोडीने सामूहिक पद्धतीने चर्चा घडत असते. चव आणि वास यावरून हुर्राकचा दर्जा ठरतो. सध्या पेडण्यातील हुर्राकला मोठी मागणी आहे. अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी या दिवसात पक्के गोयंकर दुसऱ्या कुठल्या पेयाला हात लावणार नाहीत. एक अलिखित परंपरा असल्यासारखे प्रत्येकजण ती जपण्याचा अटोकाट प्रयत्न करतात. हुर्राकचा सीझन फक्त तीन महिन्यांचा.

मार्च ते मे. कारण याच काळात काजूची फळे उपलब्ध असतात. ताज्या फळांपासून काढलेल्या रसाची हुर्राक प्रकृतीसाठी चांगली. रस काढून ठेवता येत नाही. अशा रसाची चव लगेच बदलते. लगेच आंबते आणि म्हणूनच हुर्राकदेखील फ्रीजमध्ये ठेवावी लागते. हुर्राक पिणे मला एखाद्या विधीप्रमाणे वाटते. प्रत्येकाची हुर्राक पिण्याची शैली वेगळी आहे.

पण एक सामायिक आणि सर्वांत पसंत केली जाणारी पद्धत मी बघितली आहे. पाच चमचे हुर्राकमध्ये (माझ्या चमच्याच्या मोजमापाला अस्सल गोमंतकीय मंडळी हसणार आहेत) अर्धा ग्लास सोडा आणि अर्ध्या ग्लासपेक्षा कमी लिम्का घालून त्यात एक लिंबाची फोड, एक कच्ची हिरवी मिरची (पोट फोडून), खडे मीठ आणि असल्यास थोडीशी पुदिन्याची पाने त्यात घातली की हुर्राक तयार.

तुरट - आंबट - तिखट अशा तीन वेगवेगळ्या चवींचा एकत्रित अनुभव यात असतो. हे तयार करतानादेखील यासर्व साहित्याचा सुवास कोणापासूनच लपून राहत नाही आणि यासोबत ‘खळातली तोरे’ (खारवलेल्या कैऱ्या), लिंबाचे लोणचे, डांगर (गावठी पापड) हे हवेच. हे एवढे सगळे साग्रसंगीत करणे एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी आहे का?

तुम्ही हुर्राक प्या अगर पिऊ नका, पण हुर्राक बनवण्याचा सोहळा नक्की अनुभवा. जगात जिथे जिथे काजूची लागवड होते तिथे सर्वत्र त्या त्या भागाला अनुकूल अशी फेणी बनते. पण हुर्राकसारखे हलकेफुलके पेय कदाचित फक्त गोव्यातच बनत असावे. माझे या विषयातले ज्ञान अगदी त्रोटक आहे.

मी जे अनुभवले, जे बघितले, जे ऐकले त्यावरून लिहिलेय. जशा गावागावांत वेगवेगळ्या मौखिक मिथक कथा असतात तशा हुर्राकबाबत निश्चितच वेगवेगळ्या गोष्टी असणार. कधी तरी त्यासुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT