पणजी : कर्नाटक सीमेवरील तिलारीच्या धरणा बुडून गोव्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हार्दिक प्रवीण परमार असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो एसजी बाळेकुंद्री इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीचा विद्यार्थी होता. (Goan Student Drown in Tilari Waterfall)
बेळगावमधून हार्दिक त्याच्या मित्रांसह रविवारच्या सुट्टीनिमित्त मौजमजेसाठी तिलारी धरण परिसरात आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मूळचा दक्षिण गोव्यातील हा विद्यार्थी एस.जी. बाळेकुंद्री महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा हार्दिक आपल्या चार मित्रांसह फिरण्यासाठी आला होता आणि तिथेच त्याचा घात झाला.
काहीवेळ फिरल्यानंतर सर्व मित्र तिलारीच्या पायथ्याजवळ असलेल्या अडक्याच्या वझर या धबधब्यावर पोहोचले. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर काही वेळाने पाण्याचा अंदाज न आल्याने हार्दिक हा तरुण पाण्यात बुडाला. अन्य मित्र काठालगतच पोहत होते, मात्र हार्दिकने पाण्याच्या आत जाण्यास सुरुवात केली. मित्रांनी समजावल्यानंतरही आत गेलेल्या हार्दिकला आपल्या चुकीची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. मित्रांचं म्हणणं न ऐकता पाण्याच्या मधोमध गेल्याने आणि पाण्याच्या खोलीचं अंदाज न आल्याने तरुण बुडाला आहे.
दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच बेळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.