Chess Player Bhakti Kulkarni : माझे प्रशिक्षक रघुनंदन गोखले हे स्वतः द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आहेत. लहानपणापासूनचे ते माझे प्रशिक्षक. त्यांच्याप्रमाणेच आपल्या मुलीनेही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार जिंकावी ही माझ्या वडिलांची उत्कट इच्छा होती. त्यामुळे ते नेहमी गोखले सरांना सांगायचे, सर तुम्ही द्रोणाचार्य आहात, आता आमच्या भक्तीला अर्जुन बनवा आणि हो, तो दिवस प्रत्यक्षात आला आहे, अशी भावना अर्जुन पुरस्कारप्राप्त बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हीने व्यक्त केली आहे.
यासोबतच राजभवन पाहण्याचं आणि देशाच्या राष्ट्रपतींना जवळून न्याहाळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नांची पूर्तता होणार या विचाराने खूप उत्साही झाले आहे, अशा शब्दात आपल्या भावना गोव्याची पहिली महिला आणि एकूण तिसरी अर्जुन पुरस्कार विजेती भक्ती कुलकर्णी हिने व्यक्त केल्या.
(Chess Player Bhakti Kulkarni EXCLUSIVE Interview)
द्रौपदी मुर्मू या कणखर महिला आहेत. संकटांवर मात करत प्रखर जिद्दीच्या बळावर आयुष्यात काहीही साध्य करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. साहजिकच त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारण्याची भावना प्रेरणादायी आणि नम्रतेची आहे, अशी प्रतिक्रिया अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळ ऑलिंपियाड ब्राँझपदक विजेत्या भक्तीने 'गोमन्तक'ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली. येत्या 30 नोव्हेंबरला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भक्ती राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारेल. राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आई-वडिलांना अर्पण करत असल्याचे तीस वर्षीय कुशाग्र बुद्धीच्या भक्तीने सांगितले.
आईने खूप त्याग केला…
'माझे वडील प्रदीप बुद्धिबळप्रेमी, स्वतः पट्टीचे बुद्धिबळपटू. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी बुद्धिबळ खेळायला लागले. त्यांनी मला मोठी स्वप्ने पाहण्यास शिकवलं. माझ्या यशात वडिलांचा फार मोलाचा वाटा आहे, त्याचवेळी आई प्रिया हिनेही माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. आईला बुद्धिबळातील काहीही माहीत नव्हते, तरीही आपल्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, वैयक्तिक आवडीनिवडींना मुरड घातली. त्यामुळे सुरुवातीपासून प्रेरणास्त्रोत राहिलेल्या आई-वडिलांना अर्जुन पुरस्कार अर्पण करते, असंही भक्ती म्हणाली.
गोखले सरांचे मार्गदर्शन मौल्यवान
भक्ती म्हणाली, 'माझ्या यशाचे भागीदार अनेकजण आहेत. रघुनंदन गोखले सरांचे मला मार्गदर्शन लाभते, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानते. त्यांचे शिष्यत्व पत्करले तेव्हा मी सात-आठ वर्षांचे होते. माझ्या कारकिर्दीतील त्यांनी अनेक भूमिका वठविल्या आहेत. प्रशिक्षक, वडील, मार्गदर्शक बनून त्यांनी मला उज्ज्वल भविष्य दाखविले. स्पर्धांच्या वेळेस बाहेरगावी असताना ते माझ्यासाठी चवदार भोजन बनवणारे आचारीही बनले.'
अनेकांचे बहुमूल्य पाठबळ
बुद्धिबळ हा खूप खर्चिक खेळ आहे. या खेळात यशप्राप्तीसाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरते. उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी मला 2008 ते 2020 पर्यंत पुरस्कृत केले. त्यामुळे खूप मोठा भार हलका झाला, मी पूर्णतः बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करू शकले. हजेरीपटास महत्त्व न देता माझ्या बुद्धिबळ वाटचालीस नेहमीच पाठिंबा देणारे मडगावचे महिला आणि नूतन विद्यालय, शिक्षकवर्ग यांच्याप्रती मी सदैव ऋणी राहीन. माझी जीवलग मैत्रीण श्रेयस माझी मोठी पाठीराखी आहे, अशी भावना भक्तीने व्यक्त केली आहे.
ऑलिंपियाड ब्राँझ टर्निंग पॉईंट
भक्तीने नेहमीच मोठ्या स्वप्नांचा ध्यास घेतला, त्याविषयी ती म्हणाली, 'वयाच्या चौथ्या वर्षी मी बुद्धिबळ खेळण्यास सुरवात केली. तेव्हा राज्यपातळीवर जिंकण्याचे ध्येय होते, त्यानंतर राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल विजेतेपदांची स्वप्नपूर्ती केली. 2007 साली सिंगापूरमध्ये जागतिक शालेय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. मग आशियाई किताब पटकावला, तेव्हा वाटू लागले, की अर्जुन पुरस्कार मला हवा आहे, पण ते सोपे नव्हते. राष्ट्रीय विजेतीही बनावे लागणार याची जाणीव झाली. हे उद्दिष्ट मी 2018 आणि 2019 मध्ये साध्य केले. त्यानंतर ऑलिंपियाड पदकाचा ध्यास लागला. त्यादृष्टीने कठोर मेहनत सुरू झाली. यावर्षी मला भारतातर्फे खेळताना ऑलिंपियाड सांघिक ब्राँझपदकाची बक्षिसी मिळाली आणि अर्जुन पुरस्काराचे ध्येयही साध्य झाले.``
बुद्धिबळास दीर्घकाळानंतर बहुमान
यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी महिलांत भक्ती कुलकर्णी व पुरुषांत आर. प्रग्नानंद यांची निवड झाली. त्याविषयी भक्ती म्हणाली, 'मला अर्जुन पुरस्कार मिळणे हा केवळ माझा नसून माझे राज्य गोव्याचा आणि बुद्धिबळाचाही बहुमान आहे. यापूर्वी बुद्धिबळात शेवटचा अर्जुन पुरस्कार 2013 साली देण्यात आला होता. दीर्घकाळानंतर आमच्या खेळाचा सन्मान होत असल्याबद्दल खूप आनंदी आहे.'
'मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली, तेव्हा माझ्यासाठी गोव्यात आदर्शवत कोणीच नव्हते. वडिलांनी स्फूर्ती दिली. आता मला वाटते, माझ्या कामगिरीने मी इतरांसाठी प्रेरक बनले आहे, त्यांना खडतर मेहनत आणि यशप्राप्तीसाठी ऊर्जा देऊ शकले याबद्दल भाग्यशाली मानते, अशी भावनाही अर्जुन पुरस्कार विजेती बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णीने व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.